एक थापा मारणारा माणूस आपल्या मित्राला आपल्या जगावेगळ्या छंदाचे कौतुक करत होता.
‘अरे, कुत्रं अन् मांजर कुणीही पाळील. त्याचं काय एवढं कौतुक ! पण मी एक मासा पाळला होता. पाण्याशिवाय राहायला मी त्याला शिकवलं होतं. मी कुठं निघालो ना, की माझ्या पाठीमागं उड्या मारीत यायचा.’
त्यावर मित्र म्हणाला, ‘असं ? मग हल्ली दिसत नाही कुठं तो ?’
केविलवाणा होऊन थापाड्या म्हणाला, ‘काय करायचं ? दुर्दैव म्हणायचं, दुसरं काय ? दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी फिरायला निघालो असताना तो पाठीमागे उड्या मारत येत होता. पुलावरून जात असताना त्याचा पाय घसरला. तो पाण्यात पडला आणि बुडून मेला !’