माझे फायदे सगळे करून घेतले त्यानं. आजही करून घेतोय. माझं ऑफिस म्हणजे प्रसिद्धीखातं. तिथं सरसकट माझं नाव वापरून कामं करून घ्यायची. पुन्हा तुमच्या खात्यातल्या लोकांना दारू पाजावी लागते म्हणून ऐकवायचं. कधीकधी इतका संताप होतो ना…खूप शिव्या घालाव्या वाटतात. माझी आजी द्यायची तशा इरसाल शिव्या. पण जमत नाही. वाटतं, की जर अडाणीच राहिले असते अन् नवर्यानं असं वागवलं असतं ना, तर सरळ फारकत घेऊन मोकळी झाली असते. सुखानं एकटी राहिले असते, नाहीतर दुसर्याशी पाट लावला असता. पण आता ? आता असं करून कसं चालेल ? मी शिकलेली आहे. सुसंस्कृत आहे. मध्यमवर्गीय नोकरदार बाई आहे. आज माझी प्रतिष्ठा निराळी आहे. मला असं काही कसं करता येईल ? शिकणं, सुसंस्कृत होणं; या गोष्टीचे परिणाम असे होणार असतील…आपण अधिक भेकड, अधिक भाकड होणार असू…तर खरंच पुनर्विचार केला पाहिजे ना अशा गोष्टींचा…’’
– कविता महाजन (ब्र)