वसतिगृहाकडे परत येताना त्यांना अंधारातूनच यावं लागलं. त्याच अंधारातून वाट काढत तो तत्त्वज्ञानाच्या वर्गात जाऊन बसला. त्या कक्षात मशाली तेवत होत्या. अंधारातून वाटचाल करून आल्यामुळं त्याला मशालींचा तो प्रकाश पाहून बरं वाटलं. योगायोगाची गोष्ट अशी की, त्या वर्गाला आचार्य प्रकाशाविषयीच सांगत होते, ‘प्रकाशात काम करणार्या माणसाला त्या प्रकाशाचं जाणीवपूर्वक भान नसतं. तत्त्वज्ञानाच्या विचारांची तशीच गोष्ट आहे. माणूस त्या विचारात वावरत असतो. परंतु त्या विचारांचं त्याला भान नसतं. जाणीवही नसते. परंतु कोणत्याही गोष्टीचं जाणीवपूर्वक ज्ञान झाल्याशिवाय मानवी प्रयत्न सफल होत नाहीत. माणसाला हे ज्ञान तत्त्वज्ञानामुळं प्राप्त होतं. किबहुना ज्ञाननिर्मिती ही तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्याची कसोटी आहे.’
– भा. द. खेर (चाणक्य)