संध्याकाळ झाली होती. बाहेर कावळ्यांनी ओरडून ओरडून गर्गशा घातला होता. गुरांच्या गळ्यातल्या घंटांचे आवाज ऐकू येत होते. खिडकीच्या काचेतून पोरांना बाहेरच्या सुंदर जगाचा एक छोटासा तुकडा दिसत होता. पोरांचा आत्मा अगदी अस्वस्थ झाला होता. तेवढ्यात वार्याचा एक मोठा झोत खोलीत शिरला. तावदाने वाजली. खिडक्यांचे पडदे फडफडले आणि नानाकाकांच्या मांडीवरचे पुस्तक दूर उडाले. चटकन नानाकाका स्वतः उठले. त्यांना उठताना आज मुळीच प्रयास झाले नाहीत. न कण्हता पुस्तक उचलण्यासाठी ते खाली वाकले. वार्याचा नवा झोत आला. दांडीवरचे कपडे एखाद्या निशाणासारखे हालले. भितीवर टांगलेल्या पंचांगाने गिरक्या घेतल्या. नानाकाकांचे पुस्तक आणखी काही फुट पलीकडे उडाले. नानाकाकांनी जवळजवळ उडी मारून ते पुस्तक पकडले. त्यांचे गुडघे दुखले नाहीत. त्यांना खोकल्याची उबळ आली नाही. घशात कफ दाटला नाही. पाठीत उसण भरली नाही. पुस्तक घेऊन नानाकाका परत खुर्चीवर जाऊन बसले व हसले !
– पु. भा. भावे (पहिला पाऊस)