‘‘बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा !’’ एक सल्ला. ‘‘भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं ? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ ? तुम्ही डाळी सोडा !’’-काशीनाथ नाडकर्णी. ‘‘मुख्य म्हणजे साखर सोडा !’’ ‘‘मी सांगू का ? मीठ सोडा !’’ ‘‘लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाईफचं घटलं.’’ ‘‘तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा !’’ – बाबूकाका. ‘‘स्मोकिग सोडा.’’ ‘‘दिवसा झोपणं सोडा.’’ ‘‘खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा ! बसून बसून वजन वाढतं.’’ आणि सगळ्यात कहर म्हणजे भाईसाहेब चौबळ म्हणाले, ‘‘पंत, नोकरी सोडा !’’ ‘‘काय, म्हणता काय ?’’ ‘‘उगीच सांगत नाही. दिवसभर खुर्चीवर बसून बसून वजन वाढत रहातं. फिरतीची नोकरी बघ!’
— पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)
Leave a Reply