त्यातलाच एक फोटो. तुर्की शिपाई जखमी जॉनीला पाणी पाजत आहे. वैराच्या वेळी वैर पण माणुसकी सोडून नव्हे. इथल्या लढाईला ‘वॉर ऑफ जंटलमेन’ म्हटलं गेलं ते उगीच नव्हे. शेजारी कुणा दुर्दैवी जवानाची कवटी ठेवलेली होती. त्याच्या कपाळात घुसलेली गोळी अजून तिथंच होती. एका तुर्की शिपायानं लिहिलेलं पत्र मात्र फारच जिव्हारी लागलं. इस्तंबूलमधलं लॉ-कॉलेज सोडून तो स्वेच्छेनं सैन्यात भरती झाला होता. या भागात तो पहिल्यांदाच येत होता. इथल्या सृष्टिसौंदर्याविषयी आणि स्वतःच्या जीवनलालसेविषयी कविता रूपात त्यानं आपल्या आईला लिहिलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो कामी आला.
— मीना प्रभु (तुर्कनामा)
Leave a Reply