देशाची युद्धक्षमता वाढण्याच्या आणि सुधारण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या. अमेरिकेशी झालेल्या करारामुळे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने तसेच आण्विक, जैविक तसेच रासायनिक युद्धाच्या दृष्टीने सैनिकांना आवश्यक कपडे आता आपल्या देशात तयार होतील. त्याशिवाय जपानकडून आपल्याला पाणबुड्यांचे संशोधन आणि निर्मिती यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. त्याशिवाय आपण स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी ५’ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या सर्व गोष्टी आपल्या युद्धक्षमता वाढीच्या निदर्शक मानाव्या लागतील.
स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राची आपण नुकतीच यशस्वी चाचणी केली. अग्नी-५ क्षेपणास्त्राची उंची १७ मीटर आणि वजन ५० टन आहे. अग्नी-५’चा पल्ला पाच हजार किलोमीटर असल्यामुळे संपूर्ण चीन, आशिया आणि युरोप खंडातला बहुतेक भाग तसेच आफ्रिकादेखील अग्नी-५च्या टप्प्यात आला आहे. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या २४ पट जास्त आहे.
‘अग्नी-५’ची चाचणी घेताना टाट्रा ट्रकवरून कॅनिस्टर पद्धतीने त्याला आकाशात प्रक्षेपित करण्यात आले. ‘अग्नी-५’ हे टाट्रा ट्रकवरून फायर करता येते. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात त्याची वाहतूक होऊ शकते. कॅनिस्टर तंत्रज्ञानामुळे या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण रस्त्यावरून वा रेल्वेवरूनही करणे शक्य आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे ‘अग्नी-५’ची गोपनीयता आणि मारक क्षमतादेखील वाढली असल्याने ते अधिक प्रभावी आणि अधिक परिणामकारक ठरणार आहे.
आतापर्यंत लॉंचर प्लॅटफॉर्मवरूनच क्षेपणास्त्र डागण्याची सोय होती. तथापि नव्या तंत्रज्ञानामुळे ‘अग्नी-५’ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहून नेणे सोपे झाले आहे. त्यामुळे हिंदुस्थानने अतिशय महत्त्वाचा पल्ला क्षेपणास्त्र युद्धामध्ये गाठला आहे. त्यासाठी आपण आपल्या शास्त्रज्ञांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.
आज हिंदुस्थान-चीन किंवा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध तीन पद्धतीने होऊ शकते. पहिल्या पद्धतीत दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या माध्यमातून. सध्या चीन पाकिस्तानच्या मदतीने कश्मीरमध्ये गडबड करण्याच्या प्रयत्नात आहे. मध्य हिंदुस्थानमध्ये पसरलेल्या माओवाद्यांना आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदतही चीन करत आहे. दुसरी पद्धत असेल पारंपरिक युद्धाची. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९मध्ये तर चीनशी १९६२मध्ये युद्ध झाले. अशा प्रकारचे युद्ध आता पुन्हा २०२० ते २०२५मध्ये सीमावादामुळे चीनशी होऊ शकते. सध्या आपली शस्त्रे जुनाट आहेत. दारुगोळा कमी आहे. सीमेवर रस्ते आणि रेल्वे मार्गांची कमतरता आहे. विद्यमान सरकारने यावर अनेक पावले उचलायला सुरुवात केली आहे. मात्र या त्रुटी भरून यायला पुढील १० ते १५ वर्षे लागतील. अर्थात या संभाव्य पारंपरिक युद्धामध्ये वापरण्याकरिता आपल्याकडे पृथ्वी, ब्रह्मोस आणि अग्नी-१ आणि २ अशी क्षेपणास्त्रे आहेत.
क्षेपणास्त्र अणुयुद्ध केव्हा होईल याचा अंदाज बांधणे सोपे नाही. १९४५नंतर अणुबॉम्बचा वापर जगात कुठेही झालेला नाही. तरीही पाकिस्तान आणि चीनकडून वेळोवेळी मिळणार्या धमक्यांमुळे आपल्याला अणु तसेच क्षेपणास्त्र युद्धाकरिता जय्यत तयार राहणे आवश्यक आहे. अणुबॉम्ब टाकण्याकरिता दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे अणुबॉम्ब आणि दुसरे म्हणजे त्याला घेऊन जाणारे वाहन (कॅरिअर). आकाशातून अणुबॉम्ब टाकण्याकरिता आपल्या हवाई दलात सुखोई आणि मिराज अशी विमाने सध्या आहेत. सध्यापुरती तरी ती पुरेशी आहेत. मात्र पाणबुडीतून अणुबॉम्ब टाकण्यासाठी जी क्षमता लागते ती आपल्याकडे नाही. त्या सज्जतेसाठी अजून १० ते १५ वर्षे लागू शकतात. जमिनीवरून क्षेपणास्त्र डागण्याकरिता आपल्याकडे पृथ्वी आणि अग्नी ही दोन क्षेपणास्त्रे आहेत. पृथ्वी क्षेपणास्त्राचा पल्ला १०० ते ७५० किलोमीटर आहे. सध्या हे हिंदुस्थानी सैन्यामध्ये कार्यरत आहे.
आज पाकिस्तानमध्ये १०० ते १२० अणुबॉम्ब असावेत. याशिवाय त्यांच्याकडे शाहीन आणि घौरी ही चीन आणि दक्षिण कोरियाच्या मदतीने तयार केलेली क्षेपणास्त्रे आहेत. ‘शाहीन-२’चा पल्ला २५०० किलोमीटर तर ‘घौरी-२’चा पल्ला १८०० किलोमीटरच्या आसपास आहे. थोडक्यात, मध्य हिंदुस्थान आजच पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र टप्प्यात आहे. सध्या पाकिस्तान नासीर नावाचे ६० किलोमीटर पल्ल्याचे एक क्षेपणास्त्र तयार करत आहे. याचा वापर पारंपरिक युद्धात करता येईल.
चीनकडे २५०च्या आसपास अणुबॉम्ब असावेत. त्यांच्याकडे विमानातून फायर करणारी, जमिनीवरून फायर करणारी आणि समुद्रातून किंवा पाणबुडीतून फायर करणारी क्षेपणास्त्रेही आहेत. अणुबॉम्बच्या युद्धात याला ट्रायेड असे म्हटले जाते. शक्तिशाली देशांकडे जमिनीवरून, पाण्यामधून आणि आकाशातून फायर करण्याची क्षमता असते. ही क्षमता चीनकडे आहे.
हिंदुस्थानकडे ९० ते ११० अणुबॉम्ब असावेत, जे सध्याच्या गरजेला पुरेसे आहेत. अणुबॉम्ब जमिनीवरून फायर करण्याकरिता ‘पृथ्वी-१,२’ (३५० कि.मी.), ‘अग्नी-१’ आणि ‘अग्नी-२’ (२००० कि.मी.), ‘अग्नी-३’ (३००० कि.मी.) आदी क्षेपणास्त्रे हिंदुस्थानी सैन्यात आहेत. ‘अग्नी-४’ची (४००० कि.मी.) मागच्या वर्षी चाचणी घेण्यात आली होती. ते हिंदुस्थानी सैन्यात येण्याकरिता अजून २-३ वर्षे लागू शकतात. ‘अग्नी-५’ची चाचणी यशस्वी झाली असली तरी जमिनीवरून फायर करण्याकरिता (५००० किलोमीटर) या क्षेपणास्त्राला प्रत्यक्ष सैन्यात येण्याकरिता ५-७ वर्षे लागतील.
थोडक्यात आज आपल्याकडे जी क्षेपणास्त्रे आहेत त्यांच्या मदतीने आपण पाकिस्तानशी युद्ध करण्याकरिता सक्षम आहोत. मात्र चीनशी अणुबॉम्ब युद्धात मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी क्षेपणास्त्रे नाहीत. ‘अग्नी-५’च्या यशस्वी चाचणीमुळे ही गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘अग्नी-४’ आणि ‘अग्नी-५’ यांचे उरलेले संशोधन आपल्या शास्त्रज्ञांनी लवकर पूर्ण करावे आणि ही क्षेपणास्त्रे शस्त्र म्हणून आपल्या सैन्याला लवकरात लवकर मिळावीत. कमीत कमी अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे (Minimum Deterrence) तयार करावीत. ९० ते १०० अणुबॉम्ब आणि २५ ते ३० अग्नी क्षेपणास्त्रांची आपल्याला गरज असू शकते. चीन आणि पाकिस्तानशी युद्ध करण्याकरिता आपल्या देशाला सगळ्या प्रकारचे लष्करी सामर्थ्य वाढवणे जरुरीचे आहे, पण गेली १० वर्षे सैन्याचे आधुनिकीकरण पूर्णपणे थांबले होते. आपण लष्करी तयारीत चीनच्या मागे आहोत. आपल्याला शांतता हवी आहे, पण आर्य चाणक्याने म्हटल्याप्रमाणे आपण लढाईकरता सदैव तयार राहणे गरजेचे आहे.
Leave a Reply