नवीन लेखन...

अति तिथं माती

भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला. अखेरीस भगवान विष्णूला हस्तक्षेप करावा लागला आणि एका सुंदर ललनेचं रूप धारण करून भस्मासुराला मोहात पाडावं लागलं व त्याला स्वत:च्या डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडून भस्मसात करावं लागलं, अशा आशयाची ती कथा आहे. युरोपियन लोककथेतील मिडास राजाने ज्या वस्तूला हात लावेल त्या वस्तूचं सोनं होऊ दे, असा वर परमेश्वराकडून मिळवला आणि शेवटी अनेक वस्तूंचं सोन्यात रूपांतर करून-करून थकल्यानंतर जेवायला बसला तर घासही सोन्याचा होऊ लागला व उपाशी राहण्याची पाळी त्याच्यावर आली. अशीच आणखी एक कथा आहे. एका व्यक्तीवर राजा खूश झाला आणि त्याने त्याला सांगितले की, तू संध्याकाळपर्यंत जेथपर्यंत धावत जाऊन परत येशील तेथपर्यंतची जमीन तुझ्या मालकीची! जास्तीत जास्त जमीन पदरात पाडून घेण्यासाठी तो ऊर फाटेपर्यंत धावला आणि शेवटी मरुन पडला.

या सर्व कथांमधून एकच संदेश आपल्याला मिळतो आणि तो हा की, ‘अति तिथे माती!’ तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की, त्याची अखेर सर्वनाशातच होते. भस्मासुर वर देणार्‍या भगवान शंकराच्याच मागे लागला नसता तर कदाचित त्याला प्राप्त झालेल्या शक्तीच्या बळावर मृत्यूपर्यंत संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करु शकला असता, पण त्याने अति हाव करुन त्याला वर देणार्‍या भगवान शंकराच्या अर्धांगिनीवर, पार्वतीवरच वाईट नजर टाकली आणि स्वत:च भस्म झाला. मिडास राजानेही अति लालच केली आणि मनुष्य ज्यासाठी आयुष्यभर धावपळ करतो त्या भोजनासही तो मुकला. त्याचप्रकारे राजा प्रसन्न झालेल्या व्यक्तीनेही अति लालसा धरली नसती तर पुढच्या किती तरी पिढ्यांनाही आयुष्यभर इकडची काडी तिकडे करावी लागली नसती एवढी जमीन तो मिळवू शकला असता. थोडक्यात म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याची माती होणार हे ठरलेलंच असतं! ठायी ठायी तशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत असतात.

अतिरेकाचे तोटे काय असतात हे दर्शविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘अति तिथे माती’ या म्हणीमध्ये कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याला महत्त्व राहत नाही किंवा त्याचा काही उपयोग होत नाही ही वस्तुस्थिती बिंबविण्यासाठी माती या गोष्टीचाच उपयोग का करण्यात आला? कारण मातीला काही किंमतच नसते, असं पूर्वीपासून समजल्या जातं. ( आज मातीचे म्हणजेच पर्यायाने जमिनीचे भाव अस्मानाला भिडले आहेत हा भाग अलहिदा) त्यामुळेच ज्या गोष्टीला किंमत नसते तिला मातीमोल म्हटलं जातं. आता मातीला मोल का नसतं? कारण ती विपुल प्रमाणात उपलब्ध असते. म्हणजेच जी गोष्ट विपुल प्रमाणात उपलब्ध ती गोष्ट स्वस्त आणि जी गोष्ट दुर्मीळ किंवा अलौकिक ती प्रचंड महाग किंवा अनमोल असं साधंसरळ समीकरण आहे.

जगात हिर्‍यांची काही कमतरता आहे काय? नाही. जगात लाखो-करोडोंच्या संख्येने हिरे आहेत, पण तरीही कोहिनूर हिरा अनमोल समजल्या जातो. कारण तो दुर्मीळ आहे. त्याच्यासारखा दुसरा हिराच नाही. त्या सम तोच! बरं, कोहिनूर हा काही जगातला सर्वात मोठा हिरा आहे का? तसंही नाही. आकाराने कोहिनूरपेक्षाही मोठे असलेले काही हिरे जगात आहेत आणि त्यांचं मूल्य निर्धारणही करण्यात आलं आहे. मग कोहिनूरच अनमोल का? कारण तो ब्रिटनच्या राणीच्या राजमुकुटात विराजमान आहे आणि तो विकण्याची पाळी ब्रिटिश राजघराण्यावर निकटच्या भविष्यात तरी येण्याची सूतराम शक्यता नाही. कदाचित कधीच येणार नाही. त्यामुळे कोहिनूर इतरांसाठी दुर्मीळ आहे आणि म्हणूनच तो अनमोल आहे.

जे कोहिनूरसारख्या रत्नाच्या बाबतीत तेच मनुष्याच्याही बाबतीत! आज 100 कोटीपेक्षाही जास्त माणसं भारतात राहतात, पण त्यापैकी फारच थोडे असे आहेत की ज्यांची काही ओळख आहे, स्वतंत्र स्थान आहे. आणि त्यातही नूतन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा डॉ. विजय भटकरांसारखे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक आहेत ज्यांचं कर्तृत्व अगदी वादातीत आहे! मनुष्य प्राण्यातील कोहिनूर म्हणूनच आज या व्यक्तींची ओळख करून दिली जाते, कारण त्यांचं कर्तृत्व अलौकिक आहे. त्यांच्यासारखं कर्तृत्व यापूर्वी कुणी दाखवलं नाही आणि नजीकच्या भविष्यात कुणी दाखविण्याची शक्यताही नाही. थोडक्यात काय तर त्यांच्यासारखे तेच! दुसरं कुणी नाही!!

अशाचप्रकारे काही पदांना जाणीवपूर्वक एक गरिमा प्राप्त करुन दिलेली असते. त्या पदावरील व्यक्तीचे वेगळेपण उठून दिसावे यासाठी ते करण्यात येतं. भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान व्यक्ती तब्बल 350 दालनांच्या प्रासादात राहते. कुण्या व्यक्तीचे कुटुंब कितीही मोठं असलं तरी तिला 350 खोल्यांचं घर लागू शकतं का? अर्थातच नाही, पण भारताचा राष्ट्रपती ही एक अतिविशिष्ट व्यक्ती आहे, कुणी सामान्य किंवा ऐरागैरा नाही हे ठसविण्यासाठी, इतर राष्ट्रांच्या प्रमुखांपुढे भारताची एक प्रतिमा निर्माण करण्यासाठी विशिष्ट पदांना काही विशिष्ट अधिकार देण्यात आले आहेत, त्यांचा जामानिमा देण्यात आला आहे, त्यांच्या लवाजम्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. ती पदं भूषविणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट किंवा अतिविशिष्ट व्यक्ती (व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी) म्हणून संबोधल्या जातं. त्यांना काही विशेष हक्क देण्यात आले आहेत, जे इतर जनसामान्यांना नसतात.
मात्र आज अशा विशिष्ट किंवा अतिविशिष्ट व्यक्तींनी त्यांचे महत्त्व अबाधीत राखले आहे काय, असा प्रश्न केल्यास बहुतांश प्रकरणांमध्ये त्याचं उत्तर नकारार्थीच येईल. पूर्वी पोलिस म्हटला की, त्याचा केवढा दरारा असायचा, केवढा धाक असायचा! रडणाऱ्या लहान मुलांना पोलिसाच्या सुपूर्द करण्याचा धाक दाखवून चूप बसविल्या जायचं. शाळकरी मुलांना कोपऱ्यावर पोलिस उभा आहे, असं दिसलं की त्यांचे पाय लटपटायला लागायचे. आणि आज? आजकाल पोलिस शिपाईच काय, पण पोलिस अधिकारीही कुण्याही सोम्यागोम्याच्या खांद्यावर हात ठेवून एखाद्या पानटपरीवर गुटखा चघळताना किंवा तोंडातून धूर काढताना सर्रास दिसतात. तंबाखूची सय आली की कुणापुढेही हात पसरतात. भ्रष्टाचार पूर्वीही होताच, नाही असे नाही, पण प्रमाण खूप कमी होते आणि सर्व व्यवहार अगदी लपून छपून चालत असे. आज तर चौकाचौकात पांढऱ्या डगल्यातील पोलिसदादा उघडउघड पाच अन् दहा रुपये घेताना दिसतात. मग कोण आणि कशाला घाबरेल त्यांना? जे पोलिसांचं तेच शिक्षकांचंही! पूर्वी मात्यापित्याएवढाच किंबहुना कांकणभर जास्तच मान गुरूला दिल्या जात असे. पूर्वीच्या गुरूंची ‘छडी लागे छमछम अन् विद्या येई घमघम’ या तत्त्वावर ठाम विश्वास असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनांही शिक्षकांचा प्रचंड धाक वाटत असे. कालांतराने शिक्षकांचं ते आवडतं तत्त्व मागे पडलं आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मित्रत्वाची वागणूक द्यावी, अशी नवीच टूम पुढे आली. पुढे त्या तत्त्वाचा एवढा अतिरेक झाला की, काही प्राध्यापक आजकाल विद्यार्थ्यांसोबतच धुम्रपान, मद्यपान करताना दिसतात. त्यामुळे शिक्षकांचा धाक तर कधीचाच संपला पण आता तर आदरही संपला!

पूर्वी आमदार-खासदार म्हटला की काय भाव असायचा त्या व्यक्तीचा! आज एखाद्या सिनेनटाला किंवा क्रिकेटपटूला बघायला जशी गर्दी होते तशी गर्दी कधीकाळी आमदार-खासदारांनाही बघण्यासाठी होत असे. आता तर आमदार-खासदार सोडाच, पण मंत्रीही एवढे ‘उदंड जहाले’ आहेत की, त्यांनाही बघायला (ऐकायला तर फारच दूरची गोष्ट) कुणी थांबत नाही. महाराष्ट्रात विलासरावांनी मंत्र्यांची संख्या 59 वर नेऊन पोहचविली आहेच आणि एकसष्टीही काही फार दूर नाही! मंत्री वाढल्यामुळे तर लाल दिव्यांच्या गाड्या वाढल्याच, पण राज्यकर्त्यांनी राजकारण्यांना असलेलं लाल दिव्याच्या गाडीचं अप्रूप लक्षात घेऊन लाल दिव्यांच्या गाड्याही खिरापतीसारख्या वाटून टाकल्या आहेत. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांना लाल दिव्याची गाडी, महामंडळांच्या अध्यक्षांना लाल दिव्याची गाडी आणि काही बाबतीत तर महामंडळांच्या उपाध्यक्षांनाही लाल दिव्याची गाडी! त्यामुळे या राजकारण्यांना जरी अजूनही लाल दिव्याच्या गाडीचं अप्रूप असलं तरी सर्वसामान्यांचं ते केव्हाच संपलं आहे आणि म्हणूनच एखादा सायकलस्वार किंवा रिक्षाचालकही आजकाल लाल दिव्याची गाडी येताना दिसली तरी जागा देण्यासाठी घाई करीत नाही.
थोडक्यात काय तर काही पदांवरील व्यक्तींनी अति करून त्या पदांची गरिमा संपविली आहे तर काही बाबतीत त्या पदांचाच अतिरेक करून त्या पदांची गरिमा संपविण्यात आली आहे आणि ‘अति तिथे माती’ ही म्हण सार्थ ठरविण्यात आली आहे. शेवटी स्वत:चं महत्त्व कायम ठेवायचं की संपवायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. नाही का? म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो –
पद से नहीं बल्की तुमसे
पद की शोभा होनी चाहिये
यह तभी होगा
जब तुम्हारे काम महान और अच्छे हो।

— प्रकाश पोहरे

Net read this presentation an arco book arco is a registered trademark of thomson learning, inc

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..