नवीन लेखन...

अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

 

उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

खरं म्हणाल तर शेरखान जंगलाचा राजा होता. त्याच्या डरकाळीने जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप व्हायचा. भले मोठे रेडे ही त्याला घाबरायचे. शेरखान जंगलाच्या मध्यभागी असलेल्या तलावाजवळ दबा धरून बसायचा, संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येणार्‍या हरीण, डुक्कर आणि कधी कधी तर एखाद्या रेड्याचा ही शिकार करायचा. असं सुख-समाधानाने आयुष्य जगत होता. अचानक त्याचा सुखाला ग्रहण लागले. महाबली नावाचा एक रेडा जंगलात आला. आधी रेड्यांच्या कळपावर त्याने कब्जा केला नंतर त्याने स्वत:ला जंगलाचा राजा घोषित केले. सर्व शाकाहारी रेड्यांना तो म्हणाला आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे. शेरखान पासून मी सर्वांचे रक्षण करेल. कुणावर शेरखान ने हल्ला केला तर मला आवाज द्या, मी धावत मदतीला येईल. फक्त शेरखान वर लक्ष ठेवा. मी त्याला जंगलातून हाकलून लावेल किंवा आपल्या शिंगांच्या प्रहाराने त्याला यमसदनी पाठवेल. महाबलीने रेड्यांसह जंगलातल्या मध्यवर्ती तलावावर आपला कब्जा केला. शेरखान ने पळून, टेकडी खालच्या गुहेत शरण घेतली. महाबली रेड्याने कित्येकदा रेड्यांसोबत त्याच्या वर हमला केला, नेहमीच टेकडीवर चढून शेरखान आपले प्राण वाचवत असे. तसं म्हणाल तर अधिकांश जंगलावर महाबली रेड्याचा कब्जा झालेला होता. आता शेरखान नुसता नावाचा राजा होता.

एक दिवस सकाळी, तवाकी नावाचा तरस आपल्या बायको व पोरांसह जंगलात आला. एका रेड्याने त्याला बघितले. तो तवाकीला म्हणाला, तरसा या जंगलाचा राजा महाबली रेडा आहे, त्याने तुला बघितले तर तुझे काही खरं नाही. शेरखान सुद्धा त्याला भिउन लपून बसला आहे. मांसाहारी जनावरांना या जंगलात येण्याची सख्त मनाई आहे. त्याचे बोलणे ऐकून तवाकी जोर-जोरात हसूं लागला. तुमच्या सारखे आम रेड्यांना दोघांनी ही मूर्ख बनविले आहे. रेडा म्हणाला: कसं, तवाकी: मूर्ख रेड्या, महाबली कधीच शेरखानला मारणार नाही आणि शेरखान ही हरीण आणि ससे खाऊन आपला मस्त राहील. तवाकी पुढे म्हणाला आम्ही तरस रेड्याना खात नाही, माझ्या परिवार पासून रेड्यांना काहीच भीती नाही. छोटे हरीण,ससे ही गवत खातात, त्यांना मारून आम्ही आपली गुजराण करतो, त्यात तुम्हा रेड्यांचे ही भलंच आहे तुम्हाला जास्त गावात खायला मिळेल. शिवाय तू इथे पहारा देतो आहे आणि महाबली माद्यांबरोबर मजा मारतो आहे. तवाकीचा बाण वर्मी लागला. रेडा म्हणाला खरं, महाबली आल्या पासून मादींकडे ढुंकून ही पाहणे अशक्य. तवाकी म्हणाला मित्र चिंता नको करू, मी राजा झाल्यावर सर्व रेड्यांना, मादीचे सुख मिळेल. उद्या मी दोघांचा वध करून राजा बनणार आहे. फक्त तुम्ही तमाशा पाहत राहा, मधे पडू नका. ही आनंदाची बातमी सर्व रेड्यांना जाऊन सांग.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे, तवाकी आपल्या परिवार सह महाबली समोर उभा ठाकला व त्याला म्हणाला, महाबली आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे, तू जंगल सोडून पळून जा अन्यथा मला तुझा वध करावा लागेल. महाबली, हसून म्हणाला, मूर्ख एका पायेच्या लाथेने तुला तुडवेल, ‘जान प्यारी असेल’, तर आला तिथे परत जा. तवाकी: तुझे दिवस भरले, हिम्मत असेल तर लढ. महाबली म्हणाला: रेड्यांनो, याला हाकलून लावा. पण सर्व रेडे शांत उभे राहिले, कुणीच प्रतिसाद दिला नाही. महाबली म्हणाला तुम्ही शांत का? पळवून लावा त्याला. त्या वर एक रेडा म्हणाला: महाबली, तवाकी पासून आम्हाला काहीच भीती नाही, उलट तो राजा झाला तर आमच भलंच होईल. तुझ्या जाचा पासून तरी मुक्ती मिळेल. महाबली उतरला: असं होय. आधी याला संपवतो, नंतर तुम्हाला बघतो.

उंदीर-मांजराचा खेळ सुरु झाला. महाबली तवाकी वर हल्ला करायचा, तर त्याचे पोरं मागून हल्ला करायचे. दिवसभर त्यांच्या मागे पळत-पळत महाबली दमून गेला. उगाचच याचा नादी लागलो, असे त्याला वाटू लागले. एकट्याने तवाकीच्या परिवाराशी निपटणे शक्य नाही. बाकी रेड्यांची मदत नक्कीच लागेल. नकळत महाबली टेकडी जवळ पोहचला होता. इथे जवळच शेरखान असायला पाहिजे. संध्याकाळ ही होत आली आहे. समोर पाण्यचे डबके दिसले. महाबलीला तहान ही लागली होती, पाणी पिऊन आपण परत फिरले पाहिजे. तवाकीचे काय करायचे, उद्या बघू. महाबलीला तहान लागली आहे, तवाकीने ओळखले उडी मारून तो सरळ महाबली समोर येऊन उभा राहिला व म्हणाला, महाबली कालच शेरखानला मारून मी त्याच्या गुहे वर व या तलावावर अधिकार केला आहे. पाणी पिण्या आधी, माझ्याशी युद्ध करावे लागेल. आता मात्र महाबली भयंकर वैतागला म्हणाला सकाळ पासून ऐकतो आहे, युद्ध कर युद्ध कर, पळपुटा लेकाचा. हिम्मत असेल तर तसाच समोर उभा राहा. या वर तवाकी उतरला, काल शेरखान ही असेच म्हणत होता, शेवट काय झाले, जगातून गेला बिचारा . आज तुझी पाळी आहे, तुझे मरण मला समोर दिसत आहे, ये हल्ला कर आपल्या तीष्ण नखांनी तुला फाडले नाही तर माझे नाव तवाकी नाही. याहून अधिक ऐकणे महाबलीला शक्य नव्हते, आपली खुर आणि शिंग आपटत, तो तवाकी वर चालून गेला. तवाकी आपल्या जागेवरून तिळमात्र ही हलला नाही. महाबली आपल्या शिंगात उचलून तवाकीला फेकणारच, पण आपल्या पाठीवर कुणीतरी झेप घेतली आहे, असे त्याला वाटले, पण क्षणातच त्याची मान शेरखानच्या जबड्यात होती. तवाकी बरोबर वादावादी होत असताना शेरखान हळू हळू सरकत महाबलीच्या मागे पोचला होता आणि त्याने महाबलीच्या मानेवर सटीक हमला केला. त्याच क्षणी तवाकीने ही आपल्या परिवारासह महाबली वर हल्ला चढविला. त्याचा बायको ने महाबलीची शेपटी पकडली, पोरांनी त्याचे पाय पकडले. तवाकीने दोन्ही पंज्यानी त्याचे शिंग पकडले. बेचारा महाबली काहीही करू शकला नाही.

कित्येक महिन्यानंतर, शेरखान ने रेड्यावर यथेच्छ ताव मारला. तवाकीच्या परिवाराला ही त्यात हिस्सा मिळाला. आनंदाने तवाकीने ही शेरखान महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली. शेरखान ने पूर्वी प्रमाणेच डरकाळी फोडली. जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप झाला. रेड्यांना आपण मूर्ख बनलो हे जाणविले. पण आता काही उपयोग नव्हता. शेरखानने आपल्या बुद्धीने हे युद्ध जिंकले होते.

सूतजी म्हणाले हे राजन, कलयुगात जो कुणी या कथेचे मनपूर्वक श्रवण करेल, विपरीत परिस्थितीत ही शेरखानप्रमाणे आपल्या गादीचे रक्षण करण्यास समर्थ ठरेल.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..