नवीन लेखन...

अदृश्यशक्ती

एक अनामिक अदृष्यशक्ती  ! ………. त्याला काही लोक नशीब……. असेही म्हणतात…… बघा काय म्हणणार या गोष्टींना….

गुहागर मुंबई एसटी बस एका ढाब्यावरून जेवण करून निघणार होती. प्रचंड पाऊस पडत होता आणि दोन प्रवासी न चढल्यामुळे कंडक्टर छत्री घेऊन त्यांना शोधायला उतरला होता. केवळ दोघांमुळे संपूर्ण बस निघू शकत नसल्याचे पाहून बाकीचे प्रवासी वैतागलेले होते. “ओ मास्तर चला जाऊद्या, राहूदे त्यांना पावसातच इथे !” एकजण ड्रायव्हरला म्हणाला. “तेच ना, जहागीरदार आहेत हे जसे काही ! एसटी म्हणजे यांच्या बापाचा माल आहे का ?” एक कोकणी हेल चिरकला. पण ड्रायव्हरसाहेब शांत. कारण त्यांच्यासाठी हे सर्व रोजचेच. त्यांनी फक्त सारखा हॉर्न वाजवायला सुरुवात केली. तेवढ्यात कंडक्टरसाहेब त्या दोघांना घेऊन आले. सर्व प्रवासी एखाद्या कैद्याकडे पहावे तसे त्यांच्याकडे पाहू लागले. पण बेल दोनदा वाजली आणि एसटीने कोसळणा-या पावसात मार्गक्रमण करायला सुरुवात केली. मागून एक जीप भरधाव वेगाने एसटीला ओव्हरटेक करून निघून गेली. पण थोड्याच वेळात ती रस्त्यावरून उलटी वळली आणि एसटीच्या दिशेने यायला लागली. नक्कीच काहीतरी वेगळे घडलंय हे ड्रायव्हरला जाणवले. त्यांनी वेग कमी केला अन जीपवल्याला विचारण्याचा प्रयत्न केला. पण ती जीप पुन्हा भरधाव वेगाने उलटी निघून गेली. काहीच मिनिटांनी त्यांच्या लक्षात आले की सावित्री नदीच्या पुलाच्या तोंडावर एक व्यक्ती हात करून थांबण्याचा इशारा करतोय. त्यांनी गाडी जवळ नेऊन थांबवली तर त्या माणसाने सांगितले की पूल मध्यावर तुटलाय आणि दोन एसटी आणि चारपाच गाड्या खाली कोसळून वाहून गेल्यात ! ते ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर सरारून काटा आला. खरे म्हणजे त्या तीनही बस रोज एकापाठोपाठ जातात. पहिल्या दोन निघून गेल्या पण या बसमधल्या दोन प्रवाशांनी गाडीत यायला पाचदहा मिनिटे उशीर लावल्यामुळे सर्वांचा जीव वाचला….. नाहीतर काय झाले असते ? उशीरा येऊन ज्यांनी इतरांच्या शिव्या खाल्ल्या त्यांनीच सर्वांचा जीव वाचवला ! नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?

मुंबईतील एक चाळीत निरुत्तर करणारी एक घटना घडली होती. ती चाळ एका बिल्डरला देण्यात आली. बिल्डरने सर्वाना सांगितले की नियमाप्रमाणे तुम्हाला सध्या जेवढी जागा आहे तेवढी देण्यासाठी मी बांधील आहे. पण चाळीतल्या सर्वच खोल्या शंभर दीडशे फुटाच्या आहेत. नव्या बिल्डिंगमढील सर्व फ्लॅट्स पाचशे फुटाच्या पलीकडे असणार आहेत. तेंव्हा तुम्ही वरच्या स्क्वेअर फुटाचे पैसे द्या म्हणजे तुम्हालाही अधिक जागा वापरायला मिळेल. अर्थातच सर्वांनी ते मान्य केले. पण एका कुटुंबाकडे तेवढे पैसे नव्हते. कारण त्यांचा मुलगा मतिमंद होता. त्यांनी पै पै जमा केली होती ती त्याच्या भविष्यासाठी ! बिल्डर म्हणाला की ठीक आहे. तुम्हाला तुमच्या जागेची बाजारभावाने येणारी किंमत देतो, तुम्ही जागेचा ताबा सोडा. पण ही जागा सोडून मुंबईत ते कुठे जाणार ? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्या दांपत्याची अवस्था झाली होती. आणि अचानक एक घटना घडली. एक दिवस बिल्डरचा मुलगा चाळीसमोरच्या रस्त्याने गाडीने जात असताना त्याच्या गाडीखाली सापडून एक मुलगा मृत्युमुखी पडला. तो नेमका या दाम्पत्याचा मतिमंद मुलगा होता ! सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बिल्डरने या दाम्पत्यासमोर हात जोडून प्रस्ताव ठेवला की कृपया केस मागे घ्या. मी तुम्हाला एक फ्लॅट फुकट देतो. त्या दुर्दैवी मातापित्याला प्रश्न पडला की मुलगा जिवंत होता तोपर्यंत फ्लॅट घेणे अशक्य होते. आता त्याच्या मृत्युमुळेच फ्लॅट मिळतोय ! मग या जागेचा आनंद व्यक्त करायचा की दुःख ? नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?

आणखी एक सत्य घटना सांगावीशी वाटते. दिल्लीत एक मराठी वकील रहात होते. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती म्हणून ते दुस-या स्थळाच्या शोधात होते. एक विधवा स्त्रीचे स्थळ सांगून आले आणि तिच्याशी त्यांचे लग्न झाले. पण त्यांच्या लक्षात आहे की दर पंधरा दिवसांनी त्यांची पत्नी ऑफिसच्या कामासाठी म्हणून विमानाने पुण्याला जाते. ते पेशाने वकील ! त्यामुळे त्यांना शंका आली म्हणून त्यांनी तिच्या नकळत शोध घेतला तेंव्हा समजले की त्यांच्या पत्नीला पहिल्या पतीपासून झालेली एक मुलगी आहे. आणि पदरी मुलगी असेल तर आपल्याशी कोणी लग्न करणार नाही असे वाटले म्हणून पत्नीने ही बाब त्यांच्यापासून दडवून ठेवली आहे. ती मुलगी तिच्या मावशीकडे वाढत होती ! हे कळल्यावर त्या महोदयांनी काय केले असेल ? काही दिवसातच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यांनी सरळ पुण्याला येऊन त्या चिमुरडीला बरोबर घेतले आणि थेट दिल्लीला आणून पत्नीसमोर उभे केले…. तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून ! असा पती आणि असा बाप मिळणे नशिबातच असावे लागते, नाही का ? नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?

नशीब, प्राक्तन, चमत्कार या तीनही शब्दांना हल्ली फक्त टीकेचे धनी व्हावे लागते. आजचे जग विज्ञानवादी आहे त्यामुळे जे दिसत नाही, जे सिद्ध करता येत नाही ते अनेकजण खरे मानत नाहीत. पण अफाट अशा अंतराळातील पृथ्वी हा एक इवलासा ग्रह आहे. त्यात असणा-या लाखो प्रकारच्या जीवांपैकी मानव हा अतिशय क्षुद्र प्राणी आहे. ज्याच्या हातात स्वतःचा जन्मही नसतो आणि मृत्यूही. पण हा प्राणी स्वतःला अतिशय श्रेष्ठ समजतो. आपण फार म्हणजे फारच प्रगती केली आहे असे त्याला वाटते. नशीब, प्राक्तन, चमत्कार या गोष्टींना तो अंधश्रद्धा संबोधून मोकळा होतो. त्याला जणू “अहं” ची बाधा झालेली आहे. त्यामुळे माणसाच्या आधी अनेक गोष्टी होत्या आणि नंतरही अनेक गोष्टी आहेत हे त्याला कळतच नाही.

मला सांगा, दोन एसटी बसचा कपाळमोक्ष होऊनसुद्धा केवळ पाच मिनिटांच्या फरकामुळे तिसरी बस वाचते हा चमत्कारच नव्हे का ? मुलाच्या जिवंतपणात मरण अनुभवणा-या आईबापाला तो मेल्यानंतर चांगले दिवस दिसावेत याला प्राक्तनच म्हणतात ना ? आणि एका पुरुषाने आपल्या सावत्र मुलीला अशा प्रकारे स्वीकारावे ह्याला केवळ नशीबच म्हणायला हवे नाही का ?

एखाद्या बैलगाडीखालून कुत्रे जात असते, त्याला वाटते की आपणच संपूर्ण गाडी आपणच खांद्यावर पेलली आहे. माणसाचे काहीसे तसेच आहे. विज्ञानाच्या साहाय्याने आपण जग चालवतो आहोत असे त्याला वाटते. पण विज्ञान कितीही पुढे गेले तरी मुळच्या गोष्टी अनुत्तरीतच राहतात. आता पहा, H2O म्हणजे पाणी हे सगळ्यांना माहित आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे अणू वेगळे काढता येतात पण हायड्रोजन चे दोन आणि ऑक्सिजन चा एक अणू एकत्र करून पाणी नाही तयार करता येत. झाडे प्राणवायू तयार करतात हे माहित आहे पण तो कसा तयार करतात हे आजवर समजलेले नाही. बाळाच्या जन्माची पद्धत समजली पण प्रयोगशाळेत बाळ तयार करता आले नाही. इतकेच काय पण स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग होऊनच गर्भ तयार होत असेल तर जगातली पहिली स्त्री आणि पहिला पुरुष कसा तयार झाला असेल, कोणी तयार केला असेल याची कल्पनाही आजवर करता आलेली नाही. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाला माती तयार करता आली नाही, हवा निर्माण करता आली नाही. मग मी सर्वकाही करू शकतो अशी दर्पोक्ती का ? कोणीतरी अतींद्रिय शक्ती आहे, जिचा शोध अद्यापही आपल्याला लागला नाही, तीच सर्व जगाचे निर्माण करत असते आणि नियंत्रण करत असते. त्या शक्तीला कोणी परमेश्वर म्हणतो, कोणी विधाता म्हणतो, कोणी चमत्कार म्हणतो, कोणी प्राक्तन म्हणतो तर कोणी नशीब असे संबोधतो. तुम्ही कितीही नास्तिक असा, त्या अज्ञात शक्तीला नाकारुच शकणार नाही. पण ती नाकरण्यातच आपल्याला फुशारकी वाटते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली आहे का की जगात जेवढे म्हणून धर्म आहेत त्या सर्व धर्मात देव आणि दानव तसेच स्वर्ग आणि नरक या एकसारख्याच संकल्पना मांडलेल्या आहेत. प्रत्यक धर्मात स्वर्ग आकाशातच असतो आणि नरक पताळातच असतो. शब्द वेगळे असतील पण संकल्पना एकच मांडणारे कोणीतरी अज्ञात आहे हे निश्चित पण ते नाकारण्याचा करंटेपणा आपण करत आहोत.

मानव सोडून इतर प्रत्येक सजीव निसर्गतःच ती शक्ती मानत असतो. वाळवंटात वादळ होणार हे उंटाला कळते तेंव्हा तो आपली मान वाळूत खुपसतो. कारण वादळात उभे राहण्याची शक्ती आपल्यात नाही हे त्याला माहित असते. काजवा कधीही दिवसा बाहेर पडत नाही कारण सूर्याच्या प्रकाशाच्या शक्तीपुढे आपण फारच यत्किंचित आहोत याची त्याला कल्पना असते. पाण्यात उगवणारी लव्हाळी महापुरात नतमस्तक होतात कारण महापुरातून वाचण्यासाठी तोच एक उपाय आहे हे त्यांना माहित असते. कोकीळा नेहमी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते कारण घरटे बांधण्याची आणि अंडी उबवण्याची शक्ती आपल्यात नाही याची तिला कल्पना असते. फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते कारण फळे देणारा तो विधाता आहे, मी केवळ भारवाही आहे अशी त्याच्याकडे विनम्रता असते. आणि आपण ?…… पुढच्या क्षणी जिवंत असणार की नाही हे माहित नसतानासुद्धा चक्क महिन्याचा नेटपॅक मारतो आपण ! काय गम्मत आहे न ?

— वसंत चरमळ 

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..