अमेरिकेसारख्या प्रगत देशात शास्त्रज्ञांची ,संशोधकांची निर्मिती झपाट्याने होते विज्ञान असो वा तंत्रज्ञान आधि अमेरिकेत निर्माण होतं आणि मग जगात प्रसार होतो. अशी खंत आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा पाश्चात्य देशांचा दृष्टीकोन हा “विकसनशील देश” असाच असला तरी भारतीयांना आपला देश विकसीत आहे असच म्हणावं लागेल. कारण जगात निर्माण होणार्या अनेक सकारात्मक गोष्टींच, अनेक घटकांचं मूळ भारतात आहे. म्हणजेच आयुर्वेद, शेती, फळं, कागद, या आणि यांसारख्या अनेक घटकांची निर्मिती भारतात होते आणि मग जगाकडे निर्यात होते. याचाच अर्थ जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत भारत मागे नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरु नये.
अलिकडे आजच्या ग्लोबल पिढीचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय नव्हेतर स्वत:कडे ही बघण्याचा दृष्टीकोन खर्या अर्थाने बदलतोय. ठाण्यासारख्या सांस्कृतिक केंद्रात अलीकडेच अंदाजे २४-२५ वर्षाच्या जैन सुशिक्षित, पदवीधर तरुणीने साध्वी होण्याचा निर्णय घेतला. आणि ती प्रत्यक्षात साध्वी झाली. साधू किंवा साध्वी होणं हे कुणा ऐरा गैर्याचं काम नाही. त्यासाठी करावा लागणारा त्याग नातलग किंवा भावनिक बंधनातून दूर राहण्यासाठी कायमची स्वत:ची करावी लागणारी उपेक्षा या सगळ्या गोष्टी माहित असुनही जन्मभर साध्वी होऊन जैन धर्माची तत्वे, विचार, आचार आणि त्यातून ओघाने येणारा प्रचार या सगळ्या गोष्टीचा समतोल साधत “साध्वीपण” जोपासणं हे खरचं अवघड आहे. याची पूर्ण कल्पना असुनही तिने साध्वी होणं हा तिचा मोठेपणा आहे. आपण अध्यात्माकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? मनात ज्या विचारांचं आदानप्रदान होतयं त्यात अध्यात्माकडे पहाण्याचा दृष्टीकोन काय असतो? आणि आजची पिढी अध्यात्माकडे कोणत्या माध्यमातुन पहाते? या आणि यांसारखे अनेक प्रश्न मनात उत्पन्न होतात, एकीकडे साध्वी प्रज्ञा की, जिच्यासारख्या नवशिक्षीत तरुणीचा मालेगांव सारख्या बॉम्बस्फोटात हात असल्याचं सिद्ध होतं आणि दुसरीकडे एखादी नवशिक्षीत, सुजाण तरुणी साध्वीपण स्विकारुन आजन्म अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करुन आपलं साध्वीपण निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. दोघी ही सुज्ञान तरुणी पण, एकीच्या मनात हिंसेचा बागुलबुवा असंतोषाने खदखदत असतो तर दुसरीच्या मनात अध्यात्माचा स्विकार करुन परमोच्च आनंद देण्याचा प्रयत्न असतो. दोन्ही ही भिन्न टोकं. आजच्या पिढीला प्रश्न हाच सतावतोय की, आम्ही आदर्श कुणाचा ठेवायचा? किंबहुना आदर्श कुणाला मानायचं?
भारतासारख्या बहुभाषिक, बहुप्रांतिक देशातील तरुण पोरं भारतात शिक्षण घेतात, पदवी मिळवतात आणि आमच्या शिक्षणाचा वापर परदेशात करुन तिथे नोकर्या मिळवतात. कोण म्हणतं की, आमच्या भारतात इंटेलिजन्स नाहीत, कोण म्हणतं आमच्या भारतात इंटेलिजन्सची कमी आहे? आमच्याकडे इंटेलिजन्सचं पिक इतकं भरघोस प्रमाणात येतं की त्याला वाव नाही पण, योग्य दिशा नसल्यामुळे दशा आहे. उत्पन्नाची आणि उत्पादनाची प्रचंड आर्थिक आणि भांडवली साधनं भारतात उपलब्ध असुन ही पिढी परदेशात स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी जाते याचचं जास्त आश्चर्य वाटतं.
अध्यात्म असो वा शिक्षण परिपूर्ण ज्ञान घेऊन त्याचा वापर फार कमी जणांना इथे राहून करावासा वाटतो. माझा विरोध परदेशात जाणार्या आणि रहाणार्या मुलांना अजिबात नाही. पण, इथल्या सामाजिक व्यवस्थेचे, समाजाचे आपण काहीतरी देणं लागत असतो हे मुळीच विसरता कामा नये. समाजाने मला काय दिलं? याही पेक्षा मी समाजाला काय दिलं? हा प्रश्न जेव्हा आजच्या ग्लोबल पिढीला स्वत:ला विचारावासा वाटेल तेव्हाच माझ्या मते, अध्यात्म जनातलं की, मनातलं हा प्रश्न सुटु शकेल.
— प्रकाश बोरडे
Leave a Reply