बास्केट बॉलच्या मैदानावर कुणीही नव्हते. सिमेंटचे साफ प्रशस्त मैदान, सर्व बाजूनी गवताची हिरवळ. नुकतेच पाण्याचे फवारे मारल्यामुळे टवटवीत वाटत होते. मी त्या मैदानावर शतपावली करीत होतो. गवताच्या कडेपासून सिमेंटच्या भागांत एक लांब आळी चालली होती. गवतापासून ती बरेच अंतर दूर गेली होती. त्या सिमेंटच्या भागांत तिला कांही खाण्यासारखे असेल असे वाटत नव्हते. तीच्या चालीप्रमाणे पलिकडचा गवताचा भाग बराच दुर अंतरावर दिसला. मी विचार करु लागतो. अन्न शोधण्याच्या प्रयत्न्यात ती आळी मार्ग भटकली असेल. तीला मदत करावी म्हणून एका काडीवर उचलले, व गवताच्या भागापर्यंत घेऊन चाललो.
मनाचाच आवाज ऐकू येऊ लागला.” काय करीत आहेस तू ? तू त्या आळीला मदत करतोस कां तीच्या दैनंदिन जीवनांत बाधा आणतोस ?” मानवाला बुद्धी दिलेली असल्यामुळे तो अन्नाच्या शोघार्थ दाही दिशा भटकत असतो. अन्न कोठे असेल ह्याचे ज्ञान त्याला केव्हांच येवू शकत नाही. अन्न दिसणे, चव घेणे, आणि नंतर समजणे की हे अन्न आहे. ह्या जाणिवांच्या प्रक्रियेतून त्याला जावे लागते. त्या आळ्याना वा किड्याना मेंदू वा बुद्धी अतीशय कमी असते. दुर अंतरावरील असलेले त्यांचे भक्ष ह्याची केवळ वासाने, गंधाच्या लहरीने त्याना जाणीव होत असते. हे इंद्रिय ज्ञान इतके तिव्र वा तिक्ष्ण असते की ते त्या भक्षाचा मागोवा बऱ्याच अंतरावरुन करतात. त्यांचा भक्ष हेरण्याचा मार्ग केव्हांच चुकत नसतो. खरे तर भक्ष कित्येक वेळा सजीव असेल, तर तेही सतत हालचाल करुन जागा बदलत असते. तरी देखील शिकारी भक्षासाठी मार्ग चुकत नसतात. तिक्ष्ण श्वास इंद्रिये व भक्षाचा मागोवा हे निसर्गाने त्याना बहाल केलेली प्रेरणा असते. माणसासारखी त्यांत भटकंती नसते.
कोपऱ्यात गुळाचा खडा ठेवा, थोड्याच वेळांत अनेक मुंगळे वेगवेगळ्या दिशेने त्या गुळाच्या खड्याभोवती जमतात. मधाचा एक थेंब वेगळाच गंध पसरवितो. ज्यामुळे अनेक माश्या उडत त्याच्या जवळ जमा होतात. कोठेतरी पडलेल्या मृत प्राण्या भवती असंख्य किडे आळ्या अशाच पद्धतीने जमा होतात. ते त्यांचे भक्ष असते.
मी माझ्या समजुतीप्रमाणे, त्या आळीच्या दैनंदिनीत बाधा आणत होतो. मी चटकन निर्णय बदलला. ज्या जागेवरुन त्या आळीला उचलले होते, तेथेच नेऊन ठेवले. त्या आळीला तीच्या भक्षाचे व दिशांचे स्वातंत्र्य देत मी घरी परतलो.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply