अपेंडिक्सची शस्त्रक्रिया ही नेहमी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. आतड्यातील अपेंडिक्स नावाच्या छोट्या शेपटीला सूज आल्यामुळे, पोटात तीव्र दुखणे सुरू झाल्यास शस्त्रक्रिया करून ही शेपटी काढून टाकावी लागते. असे दुखणे होऊन; पण त्याचे योग्य निदान न झाल्याने किंवा भीतीपोटी काही वेळा ही शस्त्रक्रिया वेळेवर केली गेली नाही, तर रुग्णाचा जीव धोक्यानत येतो. जेथे लहान आतडे संपून मोठे आतडे सुरू होते तेथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरवातीला असतो. त्यालाच अपेंडिक्स अथवा आंत्रपुच्छ म्हणतात. याची लांबी एक ते पाच इंच असू शकते, तसेच हा अवयव जन्मत:च आपल्या पोटात असतो. मात्र माणसाची पूर्ण वाढ झाल्यावर अपेंडिक्सची वाढ होत नाही. हा अवयव उदर-पोकळीत उजवीकडे खाली असतो. अपेंडिक्सला सूज येणे यालाच अपेंडिसायटीस असे म्हणतात व ही सूज नक्कीड कशामुळे येते हे अजूनही समजलेले नाही, त्यामुळे या विकाराचा त्रास न होण्याकरिता काही काळजी घेऊनही हा आजार टाळता येत नाही. जंतुसंसर्गामुळे संपूर्ण आंत्रपुच्छाला सौम्य सूज येऊ शकते. मात्र ती फार झपाट्याने वाढत नाही व बऱ्याच वेळा औषधोपचारांनी कमी होऊ शकते, तसेच वारंवार सौम्य सूज येऊ शकते. यात आंत्रपुच्छ फुटण्याचा धोका तसा कमी असतो, तसेच वरचेवर अपेंडिक्सचे ऍटॅक येऊ शकतात. भूक न लागणे, कधीतरी पोटात दुखणे, पचनक्रिया नीट न होणे, यालाच अपेंडिक्समुळे होणारे अपचन म्हणतात.
अपेंडिक्सची लक्षणे, उपचार आणि शस्त्रक्रिया
1) अचानक पोटात दुखणे, दुखण्याची तीव्रता हळूहळू वाढत जाणे किंवा अनेकांना उलट्या होतात, तसेच भूक न लागणे, अपचन, अन्न खावेसे न वाटणे, मळमळणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे होत.
2) सुरवातीला आलेला थोडा ताप, इलाज न केल्यामुळे गुंतागुंत होऊन वाढू शकतो. साधारणपणे पोटाच्या उजव्या खालच्या भागात दाब दिल्यास वेदना होतात व तो भाग कधीकधी कडक होतो. अशा वेळी पोट अजिबात चोळू नये किंवा जुलाबाचे औषध अजिबात घेऊ नये.
3) रोगनिदानासाठी रक्तय तपासणी (पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढले का बघण्यासाठी) तसेच मूत्र तपासणी – जंतुबाधा किंवा मूतखडा नसल्याची खात्री करण्यासाठी शौच तपासणी – आतड्यास जंतुबाधा झाली आहे का हे पाहण्यासाठी; तसेच पोटाची सोनोग्राफी करावी. जास्त सुजलेले अपेंडिक्स असल्यास किंवा त्या-भोवती पू जमा झाला असल्यास व पोटदुखीची इतर कारणे समजण्यास किंवा पोटाची दुर्बिणीतून तपासणी करून 100 टक्के निदान होऊ शकते.
4) उपचारामध्ये काही वेळा तात्पुरता औषधोपचार केला जातो. यात प्रतिजैविके, सूज व वेदना कमी होणारी औषधे, शिरेतून ग्लुकोज – सलाईन देणे आदी इलाज केले जातात. मात्र शस्त्रक्रिया हाच सर्वमान्य व सर्वोत्तम उपाय आहे. कारण शस्त्रक्रिया जितकी लांबणीवर टाकावी तेवढे गुंतागुंतीचे प्रमाण वाढू शकते, तसेच अपेंडिक्स भोवती आतडी चिकटणे व त्याचा गोळा तयार होणे, आंत्रपुच्छ फुटणे, त्याभोवती गळू तयार होणे किंवा पू पोटात सर्वत्र पसरणे आदी गोष्टी होऊ शकतात.
अपेंडिक्स ची शस्त्रक्रिया कशी करतात व त्यानंतर काय काळजी अपेक्षित आहे.
अपेंडिक्सची शस्त्रक्रिया दोन पद्धतीने करता येते
1) पोट उघडून वा 2) दुर्बिणीच्या साहाय्याने.
पोट उघडून शस्त्रक्रिया करताना पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या भागावर 2 ते 3 इंचाचा तिरका किंवा आडवा छेद घेऊन सुजलेले आंत्रपुच्छ काढले जाते. ही शस्त्रक्रिया अर्धा ते एक तास चालते. इतर गुंतागुंत असल्यास जास्त वेळ लागू शकतो. ही शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन अथवा फक्ते कंबरेखालील भागाला बधीर करून केली जाते. नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे दुर्बिणीच्या साहाय्याने अपेंडिक्स काढता येतो, यामध्ये पोटावर तीन ठिकाणी लहान छेद घेतात व त्यातून दुर्बिण व शस्त्रक्रियेकरिता लागणारी उपकरणे पोटाच्या पोकळीत घालून शस्त्रक्रिया करतात व त्यातूनच अपेंडिक्स बाहेर काढले जाते. सहसा पूर्ण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करतात. दुर्बिणीतून केलेल्या शस्त्रक्रियेनंतर दुखण्याचे प्रमाण कमी असते व रुग्ण लवकर बरा होतो. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण 2-3 दिवसांत घरी जाऊ शकतो, तसेच त्यानंतर डॉक्टंरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती व औषधोपचार अत्यंत गरजेचे आहेत; तसेच एकदा काढलेले अपेंडिक्स पुन्हा कधीही वाढत नाही व अन्नपचनावर कायमचा कोणताही परिणाम संभवत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.सकाळ / डॉ. नितीन उनकुले
Leave a Reply