खूप जुनी गोष्ट आठवली. मी शाळकरी विद्यार्थी होतो. माझा मित्र दिनू यांच्याकडे माझे जाणे-येणे सतत होते. बाहेर त्याची खोली. आम्ही दोघे मिळून अभ्यास करीत असू. दिनूचा मोठा भाऊ तहसील कार्यालयांत लिपीक होता. त्याच्या घरी आई वडील वहीनी व छोटा पुतण्या होता. वडील बबनराव ज्याना सर्व अप्पा म्हणत. ते शिक्षक म्हणून निवृत्त झालेले होते. शिस्तप्रिय, प्रचंड ज्ञान व माहिती असलेले. सतत जो भेटेल त्याच्याशी गप्पा गोष्टी करणे, तत्वज्ञान सांगणे, नविन गोष्टीवर चर्चा करणे, ह्याची त्याना आवड होती. त्यांच्या बोलण्यानी समोरचा प्रभावित होत असे. त्यांच्या बोलण्याचे एक वैशिष्ट्य असे. त्यांचे धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि पाठांतर विलक्षण होते. बरेच ग्रंथ जसे भगवत् गीता, अथर्वशीर्ष, विष्णूसहस्रनाम, महीम्नस्तोत्र, रामरक्षा, अनेक संस्कृत श्लोक त्याना पाठ झालेले होते. कित्येक शुभाषिते, अभंग, सुमधूर वाक्ये, सुवचार त्याना मुखोद्गत होते. योग्य वेळी योग्य विचारांचा ते चपलखतेने उपयोग करीत असत. संस्कृतचे श्लोक अत्यंत स्पष्ट व पद्धतशीर ते म्हणत असत. त्यांच्या दहा वाक्यांच्या संवादामध्ये सहा वाक्ये तर भाष्यकर्त्याचे, ऋषीमुनींचे, संतमहात्म्याचे, असत. त्यांच्या चर्चेमध्ये फेकले जाणारे तत्वज्ञान जणू वाहणारा सत्याचा धबधबा पडतो आहे हे वाटत असे. ऐकणाऱ्याना अप्पाविषयी एक वेगळीच अस्था, अपुलकी व आदर वाटत असे. एक आदर्श व्यक्तीमत्वाची त्यानी छबी निर्माण केली होती. मी त्याना अप्पाच म्हणत असे. मला त्यांच्या विषयी आदर वाटत होता. परंतु त्याच बरोबर त्यांच्या विषयी कसलीतरी अनामिक भिती वाटे. दिनू शक्यतो त्यांच्यापासून अलिप्त राहात असे.
तो दिवस मला चांगलाच आठवतो. मी दिनूकडे गेलो होतो. तो घरी नव्हता. अप्पा खोलीत कपाटातील पुस्तके चाळीत होते. वहीनी स्वयंपाक करीत होत्या. मला अप्पांनी समोर स्टूलवर बसण्यास सांगितले. अचानक बंटीचा किंचाळून रडण्याचा आवाज आला. दिड वर्षाचा तो, एकदम पडला. वहीनी स्वयंपाक सोडून धावतच मधल्या खोलीत गेल्या. बंटीला सावरले. शांत करण्याचा प्रयत्न केला. ह्या गडबडीत गॅसवरील दुधाची खीर करपून गेली व तीचा वास सर्वत्र पसरला. वहीनीने बंटीला कड्यावर घेतच स्वयंपाक घराकडे धाव घेतली व गॅस बंद केला. आप्पा एकदम वहीनीवर ओरडले. “आरे काय खुळी आहेस कां तू ? कांही अक्कल दिली नाही देवानी ? गॅसवर जर खीर होती, तर गॅस बंद करुन जाता येत नव्हते कां ? कामांत कांही लक्ष असेल तर. सतत वेंधळेपणा केला जातो. कोण खाणार ती करपलेली खीर आता ?. आई बापानी हेच शिकवले कां ? – – – – – – – ”
त्यांचा भयानक शाब्दीक मारा बराच वेळ चालला. वहीनी बंटीला घेऊन मुळमुळ रडत सारी आवरा आवर करताना दिसल्या. मी त्या अचानक निर्माण झालेल्या प्रसंगाने भेदरुन गेलो. अप्पांच ते कौटूंबीक स्वरुप अतिशय भयानक वाटल. पण ते तसे मी अनेक वेळा बघीतले होते. दिनू येताच आम्ही दोघे बाहेर पडलो.
इतक्या वर्षानी आज तो प्रसंग डोळ्यासमोर तसाच उभा राहीला. बंटूचा किंचाळून रडण्याचा आवाज आला होता. तो पडला होता. परंतु अप्पा आपल्याच कामात गर्क होते. ते थोडेसे देखील हालले नाही. नातू त्यांचाच होता. पण हे काम त्याच्या आईचेच आहे, ह्या विचारांनी कदाचित् दुर्लक्ष केले. सुन अचानक पडलेल्या मुलास Emergency म्हणून सावरण्यास धावली. स्वयंपाक घरांत गॅस चालू होता. दुध करपण्याचा वास येऊ लागला. परंतु अप्पानी स्वयंपाक घरांत जाऊन गॅस लगेच बंद केला नाही. कदाचित् पुरुषी अहंकार आड आला असेल. मात्र पद्धतशीर कसलाही सहभाग न घेता, सर्व खापर सुनेवर ते फोडीत होते.
अप्पा बद्दल मी चिंतन करु लागलो. माणसाच व्यक्तीमत्व हे सदा दुभंग, दुटपी, मुखोटे परीधान केलेले कां असते ? तो जे बाहेर जगांत, व्यवहारांत व्यक्त करतो, भासवतो, त्याच्या बरेच विपरीत त्याच मन विचार करीत राहते. बाहेर एक व आतून वेगळच अशी माणसांची विचार धारा कां असते ?. आज पन्नास वर्षानंतर माझ्या विचारांना जो त्यांच्या विपरीत वागण्याचा बोध झाला तो असा – अस म्हणतात की परमेश्वरानी मानव निर्माण केला,त्याला दोन उपजत स्वभाव गुणधर्म दिले. अहंकार आणि प्रेम. दोन्हीही जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे.
1-जन्मतः प्रथम श्वास घेताना जी क्रिया होते ती समजणे गरजेचे आहे. त्याची सुरवात होते ती अहंकार ह्या भाननिक संकल्पनेपासून. जन्माच्यावेळी बालकाची तगमग, धडपड, रडणे, किंचाळणे, राग, शरीराची झटके देत हलचाली, कातड्यांच्या नखांच्या रंगाच्या बदलत जाणाऱ्य़ा छटा, तोंडातून चिकट बाहेर येणे, वा संडास वाटे चिकट पदार्थ बाहेर पडणे. ( muconium )ह्या सर्व साधारण नजरेत येणाऱ्या बाबी. ह्या सर्व हलचाली मध्ये एक प्रकारची अशांतता असते हे दर्शवणारी एक श्रंखला दिसते.
2- ह्या नंतर चक्र सुरु होते ते प्रेम ह्या भावनीक अविष्काराचे. मुल शांत होऊ लागते. प्रेमाचा स्पर्श जाणवू लागते. ओठांची चुंबन घेतल्या प्रमाणे हलचाल होऊ लागते. चोकणे, चिकटणे, आईने जवळ केले तर आनंदीत झाल्याची झलक दिसणे, सुक्ष्मपणे बघीतल्यास हास्याच्या छटा दिसतात. बोटांची पकड घट्ट असलेली, स्पर्शज्ञानाने प्रेमाचा संपर्क बालकांत उत्तेजीत होत असल्याचे जाणवते. आणि असेच कांही.
अप्पानी परिश्रम घेऊन एक आदर्श व्यक्तीमत्व निर्माण केले होते. ग्रथांचा प्रचंड अभ्यास. मग ते राग लोभादी विकारांना का बळी गेले ?. बाह्य जगाचे संसारीक ज्ञान ह्यात त्यांचा हातखंडा होता. परंतु त्या जीवनाच्या वाटेवर अंतरज्ञानात ते जाताना कमी पडल्याचे जाणवले. अंतरमनांत दडलेले दोन उपजत स्वभावाचे प्रतिबींब. १ अहंकार व २ प्रेम. निसर्गाला जीवाच्या जगण्यासाठी दोन्हीची अवशक्ता असते. मनुष्य जसा वैचारीक प्रगत होऊ लागला, त्याने अहंकार शिथील करण्याचा व प्रेम वाढवण्याचा प्रयत्न केला. यातून निर्माण झाली ती ज्ञानयुक्त असलेली ग्रंथ संपदा. ज्ञानवृधीचा हेतू अहंकारावर ताबा व प्रेमाला चालना देणे हे होते. अप्पानी तसा प्रयत्न केला असेल. परंतु ते मला अपयशी ठरल्याचे जाणवले. कां ? त्याना ते जमले नाही. माणसाच ज्ञान आणि स्वभाव हे शेवटी भिन्नच राहतात. एक मानव निर्मित तर दुसरे नैसर्गिक. त्यांत संघर्ष असणारच.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply