पाकिस्तानात सत्ता कुणाचीही असो, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कुणीही असो, खरी सत्ता तर लष्कराचीच असते. पाकिस्तानी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानापेक्षा पाक लष्कराचा सेनापती अधिक शक्तिशाली असतो. सध्या पाकिस्तानात निवडणुकांचे वातावरण आहे त्यामुळेच खरी राजवट कुणाची हा प्रश्न उद्भवला. निवडणुकीत जिंकून कुणीही येवो, सत्ता तर लष्कराचीच असणार आहे. तहिरुल कादरीसुध्दा दहा दिवसांतच गप्प झाले. पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय जाहीर केले. परंतु लष्कराच्या अनिच्छेमुळे पुढे काहीच होऊ शकले नाही. त्यावर लष्कराने पाकिस्तानी सरकारला काही विधान करू दिले नाही. लष्कराच्या इच्छेशिवाय पाकिस्तानात कोणतेच काम होऊ शकत नाही. पाकिस्तान लोकशाहीचे कितीही कौतुक गात असले तरी लष्करासमोर मान तुकवून साष्टांग दंडवत घालत असते. यामुळेच पाकिस्तानमधील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कसे राहतील हा प्रश्न निर्माण होतो.
दहा “अयशस्वी देशां” च्या यादीमध्ये पाकिस्तान
उत्पादन, उद्योग, ऊर्जा, शिक्षण, स्वास्थ्य-आरोग्य या सर्व दृष्टींनी पाकिस्तान मागासलेला आणि अशिक्षितांचा देश आहे. जगात पाकिस्तानचे स्थान काय? कोणत्याही देशात त्याच्या सरकारला त्याचा चेहरा दाखविण्याचे काम तेथील प्रसारमाध्यमे करत असतात. पाकिस्तानी नोकरशहा किंवा राजकीय समीक्षकांनी हे काम कधीच प्रामाणिकपणे केले नाही; परंतु पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांना मात्र देशाच्या सरकारचा चेहरा सरकारला दाखवण्याची म्हणजेच सरकारची सत्य स्थिती काय आहे, हे दाखवून देण्याची कधी कधी हुक्की येते. उर्दू वृत्तपत्रांमध्ये दैनिक “जंग”, “नवाए वक्त”, “जिना आणि जसारत” या वृत्तपत्रांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. इफ्तिकार अली मलिक या लेखकाने आपल्या लेखात पाकिस्तान सरकार आणि जनतेला काही प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर त्यांची उत्तरेही प्रस्तूत केली आहेत.
जीडीपीमध्ये पाकिस्तान जगात १३५ व्या स्थानावर आहे, शिक्षणाच्या दृष्टीने १५९ व्या स्थानावर तर निर्यातीच्या बाबतीत ६१ व्या क्रमांकावर आहे. पर्यावरणाचा विचार करता पाकिस्तानचा जगात १३१ वा क्रमांक लागतो. सर्वसामान्य प्रकारचे उद्योग-व्यवसाय करणारे पाहिले, तर या देशाचा क्रमांक ७६ वा आहे. थोडक्यात काय, हा देश जगातील पहिल्या दहा “अयशस्वी देशां” च्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे! भ्रष्टाचाराच्या बाबतीतही पाकिस्तानचा क्रमांक दहावा लागतो. तीच बाब कापड उद्योगाची. टेक्स्टाईल इंडस्ट्री पाकिस्तानातही सर्वात मोठी आणि यशस्वी इंडस्ट्री आहे. पण ऊर्जेच्या संकटामुळे आता पाकिस्तानातील कापड उद्योगाचे बाहेरच्या देशांमध्ये स्थलांतर सुरू झाले आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा उठवतोय चीन. मात्र तरीही केवळ सुरक्षेच्या कारणासाठी पाकिस्तानमधील सरकार चीनचे असे काही स्वागतच करतो की जणू चीनच काय तो पाकिस्तानचा एकमेव तारणहार आहे! पाकिस्तानमध्ये कायद्याचे राज्य नाही. सरकारी विभागांमधून भ्रष्टाचार इतका प्रचंड प्रमाणावर माजला आहे की कोणाचीही इथे पाय ठेवायची इच्छा होत नाही. खुद्द पाकिस्तानात राहून जे लोक पैसा कमावतात, तेही आपले धन देशाच्या बाहेर जाऊन कसे सुरक्षित राहील, याचाच विचार सतत करत असतात. पाक जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना औषधालाही उरलेली नाही. शिवाय राष्ट्रीयत्व जेव्हा धर्माशी जोडले जाते, तेव्हा ते अधिकच धोकादायक बनते. जगाच्या वृत्तपत्रांमधून पाकिस्तानबद्दल कधीच फारसे काही छापून येत नाही.
पाकिस्तानच्या इशार्यावर चालणारे सरकार स्थापण्यासाठी दबाव
सद्य:स्थितीत अमेरिकेला पाकिस्तानचा पुळका येण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना अफगाणिस्तानात असलेली त्यांची प्रचंड युद्धसामग्री पाकिस्तानमार्गे बाहेर काढायची आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांची दुसरी आणि अखेरची कारकीर्द येत्या २२ मे २०१४ रोजी संपणार आहे. अध्यक्षपदाच्या पुढील निवडणुकीची अफगाणिस्तानच्या निवडणूक आयोगाने ५ एप्रिल २०१४ ही तारीख ही जाहीर केली आहे. ऑगस्ट २०१४ पर्यंत ८० हजारांहून अधिक संख्येने अफगाणिस्तानात असलेले “नाटो” चे आणि अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्याची घोषणा आधीच झाली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाला गुप्त माहिती आणि भक्कम हवाई दलाचे पाठबळ नाही. तसेच, अफगाणिस्तानला आजपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळणारे आर्थिक अनुदानही या वर्षा अखेरपर्यंत बंद होणार आहे. त्यामुळे खालावलेली आर्थिक स्थिती आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पुढील अध्यक्षीय निवडणुका पुढे ढकलूनही अखेर पार पडतील का, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अमेरिकेच्या या अडचणीचा फायदा घेत पाकिस्तान सरकार त्यांच्याकडून शक्य तितके आर्थिक, लष्करी आणि राजकीय फायदे पदरात पाडून घेत आहे.
सौदी अरेबियाच्या खंबीर पाठिंब्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या राजकीय आणि धार्मिक गटांमध्ये लुडबुड करीत आहे. जर, अध्यक्षीय निवडणूक पुढे ढकलली गेली आणि पर्यायी “जिर्गा” पद्धत लागू झाली, तर अफगाणिस्तानमध्ये आपल्या इशार्यावर चालणारे सरकार स्थापण्यासाठी दबाव आणि दहशतीचा पाकिस्तान वापर करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना अफगाणिस्तानातूनच विरोध होऊ शकतो. आधीच इथे अफगाणिस्तानच्या विभाजनावरून चर्चा सुरू आहे. या विभाजनाचा पाकिस्तानवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण येथे पाकिस्तानमधील बलुचिस्तानचा अंतर्भाव करून पश्तुनिस्तान निर्माण करण्याचे अनेक लोकांचे स्वप्न आहे. म्हणजे अफगाणिस्तानचे विभाजन झाल्यास पाकिस्तानचेही विभाजन निश्चित आहे. पाकिस्तानबरोबर वारंवार तणाव उत्पन्न होऊनही अमेरिकेने सांभाळून घेत त्यांच्याकडे मदतीचा ओघ कायम ठेवला आहे. पाकिस्तानजवळ असलेला अणुशस्त्रसाठा दहशतवाद्यांच्या हाती लागण्याची भीती अमेरिकेला आहे, कारण तसे झाल्यास ते अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकते. या उलट अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या मनांत भारताबद्दल प्रेम आणि मैत्रीची भावना आहे. अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांबद्दल येथे कौतुक आहे. भारतीय उपखंडाशी सहकार्य करूनच आर्थिक व व्यापारी प्रगती साधता येईल, याची जाणीव आता सर्वच महत्त्वाच्या देशांना झाली आहे. आणि तेच तर भारतीय परराष्ट्र धोरणाचेही लक्ष्य राहिले आहे.
पाकिस्तानचे सरसेनापती जनरल अश्फाक कयानी यांनी दहशतवाद्यां संदर्भात म्हटले की, आता पाणी डोक्यावरून जात आहे! परंतु पाकिस्तानी सेना दहशतवाद्यांविरुद्ध आणि धार्मिक नेत्यांविरुध्द काहीच करू शकत नाही. त्यामुळे सेना सरकारवर तर सरकार सेनेवर जबाबदारी ढकलत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी जनरल कयानी यांनी वक्तव्य केले की, देश दहशतवाद्यांचे समांतर सरकार सहन करणार नाही. पाकिस्तानात तालिबानी जो गदारोळ माजवत आहेत, यामुळे एखादेवेळी गृहयुध्द होईल, अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रे तर अतिशय स्पष्टपणे लिहीत आहेत की, पाकिस्तानचा एक नंबरचा शत्रू तालिबान हाच आहे. पाकिस्तानी लष्कराला भारताशी कसे लढावे याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे पाकचा खरा शत्रू तालिबान मात्र सहजच सुरक्षित राहतो, असे वृत्तपत्रे म्हणू लागली आहेत. परंतु सरकार आणि लष्करशहा मात्र सुधारायला तयार नाहीत. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन संचालक जनरल असीम सलीम यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानला सर्वाधिक धोका भारताकडूनच आहे. २०१४ मध्ये अमेरिकेचे लष्कर जेव्हा पाकिस्तानमधून निघून जाईल तेव्हाच खरे तर पाकिस्तानची या बाबत काय भूमिका असेल हे स्पष्ट होईल. असीम सलीम यांचे हे विधान सांगते की, अद्यापही पाकिस्तान भारताला आपला शत्रू मानतो. त्यामुळे भविष्यात भारतविरोधी कारवाया होतच राहतील.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply