आज नरकचतुर्दशी. या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून मग अंघोळ करण्याची पद्धत आहे. यालाच ‘पहिली अंघोळ’ असंही म्हटलं जातं. ‘पहिली’ अंघोळ असं म्हणण्यामागे काय कारण असेल बरं? कारण असं आहे की; या दिवसापासून रोज नित्यनेमाने अभ्यंग करायचा आहे. याकरता ‘पहिली’. आपण मात्र वर्षातला पहिला आणि शेवटचा अभ्यंग एकाच दिवशी करत असतो!!
अभ्यंग:
संपूर्ण अंगाला कोमट तेल लावणे म्हणजे अभ्यंग. हा अभ्यंग दररोज नित्यनेमाने करावा असे आयुर्वेद सांगतो. निरोगी व्यक्तींनी दैनंदिन वापरासाठी तिळाचे तेल कोमट करून वापरावे. संपूर्ण शरीराला वरून खालच्या दिशेने तेल लावून जिरवावे. तेल वापरताना कंजूसपणा करू नये. चांगला थपथपून ‘तेल्या मारुती’ करावा. सुमारे दहा मिनिटांत सर्वांगाला तेल लावून होते.
नियमित अभ्यंग केल्याने त्वचा उत्तम राहते, अकाली वळ्या-सुरकुत्या पडण्यासारखे त्रास होत नाहीत, श्रमहरण होऊन ताजेतवाने वाटते, झोप उत्तम लागते आणि शरीराला पुष्टी प्राप्त होते. विशेषतः डोके, कान आणि तळपाय यांना अभ्यंग आवर्जून करावा. तळपायांना अभ्यंग केल्याने दृष्टी उत्तम राहते.
अभ्यंग कोणी टाळावा?
कफाचे विकार असणारे, स्थूल, अजीर्ण झालेले वा भूक नीट लागत नाही असे तसेच नुकतेच पंचकर्म झाले आहे अशा व्यक्तींनी अभ्यंग करू नये असे आयुर्वेद सांगतो.
अभ्यंगानंतर व्यायाम करावा असेही आयुर्वेदाला अपेक्षित आहे. केवळ आरामात अंग चोपडून घेऊन ऐषाराम करणे हा आयुर्वेदाचा उद्देश नाही. व्यायाम हा आयुर्वेदानुसार ‘निराग्नि स्वेद’ असून अभ्यंगात जिरवलेले तेल त्वचेत अधिक मुरण्यासाठी; तसेच घाम येऊन शरीरातील मेदाचा क्षय होण्यास त्याचा उपयोग होतो. आजही कित्येक आखाड्यांत हीच पद्धत अवलंबली जाते हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
उद्वर्तन:
उद्वर्तन म्हणजे उटणे लावणे. त्रिफळा, नागरमोथा, कचोर वगैरे विविध आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनस्पतींच्या चूर्णांच्या मिश्रणातून उटणे बनते. उटणे बनवताना आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. ते तुमच्या प्रकृतीनुसार योग्य मार्गदर्शन करतील. बाजारातून तयार उटणे विकत घेताना त्याचा दर्जा अवश्य लक्षात घ्या. उगाच २-५ रुपयांची उटण्याची पाकिटे घेऊन किती स्वस्त मिळालं यावर खूष होण्याऐवजी त्यात नेमकं काय घातलं असेल याचा विचार करा!!
उटणे लावताना घालून वरच्या दिशेने लावावे. या उटण्यामुळे आधी लावलेल्या तेलाचा बराचसा स्निग्धांश शोषला जातो. त्याचप्रमाणे विशेष करून मेदाचा नाश होतो. स्थूल व्यक्तींनी तेल न लावताच केवळ कोरडे उटणे लावावे. उटणे लावल्याने त्वचेचे आरोग्य उत्तम राहते; तसेच कफ आणि मेदाचा नाश होतो.
आयुर्वेदोक्त अभ्यंग आणि उद्वर्तन यांचा अनुभव घेऊन त्यांनंतर गरम पाण्याने स्नान करून आजच्या दिवसाची सुरुवात करा आणि येणाऱ्या हेमंत व शिशिर या दोन्ही ऋतूंत सर्व दिवसांची अशीच सुरुवात करून आपले आरोग्य उत्तम राखा!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply