जिवंतपणीच दंतकथा बनण्याचा मान मिळविलेली हॉलिवूडमधील मदमस्त नायिका, तसेच हॉलिवूडच्या सुवर्णकाळाची एक अनभिषिक्त सम्राज्ञी एलिझाबेथ टेलर या लिझ या नावाने ओळखल्या जायच्या. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला.
एलिझाबेथ टेलर हॉलिवूडमधील कारकीर्द संपल्यानंतरही सतत चर्चेत राहिल्या. मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून वयाच्या नवव्या वर्षी त्या सर्वप्रथम ‘देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून झळकल्या. ‘फादर ऑफ द ब्राइड’ या चित्रपटाद्वारे त्यांनी नायिका म्हणून हॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एलिझाबेथ टेलर यांनी पॉल न्यूमन, रॉक हडसन, जेम्स डीन, मार्लन ब्रँडो आदी दिग्गज नायकांबरोबर काम केले. ‘क्लिओपात्रा’, ‘जायंट’, ‘बटरफिल्ड’, ‘व्हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’, ‘नॅशनल वेलवेट’ आदी त्यांचे काही गाजलेले चित्रपट होत. एलिझाबेथ टेलर यांना १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या बटरफिल्ड एट या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्याबरोबर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या होत्या. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना दोनवेळा सर्वत्कृष्ट स्त्री कलाकार म्हणून अॅरकेडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हॉलिवूडमधील अन्य अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले होते. एलिझाबेथ टेलर यांनी केलेले एकूण आठ विवाह हा जगभर चर्चेचा विषय बनला. त्यातही जगप्रवासी तसेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या गेलेल्या रिचर्ड बर्टन यांच्याबरोबर दोनवेळा झालेले विवाह विशेष औत्सुक्यपूर्ण होता. बर्टन यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपटही केले होते. संपूर्ण आयुष्य उत्फुल्लतेने आणि रसपूर्णतेने जगलेली अभिनेत्री म्हणून एलिझाबेथ टेलर यांना जग ओळखत असे. एलिझाबेथ टेलर यांचे २३ मार्च २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply