अर्जुनाची अखेरची कसोटी आणि राजकारण
10 ऑगस्ट 2000 हा श्रीलंकेच्या एकमेव विश्वविजेत्या कप्तानासाठी कसोटी कारकिर्दीचा अखेरचा दिवस ठरला. या सामन्यात त्याने या दिवशी काढलेल्या 28 (नाबाद) धावांमुळे प्रोटियांविरुद्धची (दक्षिण आफ्रिकेत आढळणारे एक फूल, त्यांचे राष्ट्रीय फूल) कसोटी वाचविण्यास लंकेला मदत झाली. पाचूच्या बेटावरील ज्या 11 मानवी सिंहांनी राष्ट्राची पहिलीवहिली कसोटी 1981-82च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध खेळली त्यांमध्ये 18 वर्षांच्या अर्जुना रणतुंगाचा समावेश होता. श्रीलंकेतर्फेचे कसोट्यांमधील पहिले निमशतक त्याच्याच नावे आहे. कोलम्बोतील (स्थानिक नाव – श्रीजयवर्दनपुरा कोट्टे) आनंदा महाविद्यालयाच्या संघाचा तो कर्णधार होता आणि त्याची आई तिथेच प्राध्यापिका होती. श्रीलंका संघाने खेळलेल्या 100व्या कसोटीत अर्जुना होता, त्याचा ‘त्या’ दहामधील कोणताही सहकारी आता मात्र संघात नव्हता. (मधल्या काही कसोट्या तो खेळला नव्हता. लंकेचा 100वा सामना अर्जुनाचा 100वा नव्हता.)
दोन दशके अर्जुना लंकेच्या क्रिकेटमधील प्रमुख व्यक्ती होता. 56 कसोट्यांमध्ये त्याने पाचूच्या बेटाचे नेतृत्व केले. आपल्या कारकिर्दीत 5,000 धावांचा टप्पा त्याने गाठला. आपल्या सहकारी खेळाडूंना सांभाळण्यात आणि त्यांची पाठराखण करण्यात अर्जुना वाकबगार होता. मुथय्या मुरलीथरनच्या (मराठी माध्यमांनी मुरलीथरनच्या बाबतीत ‘थ’चा ’ध’ केलेला आहे. ‘डीएनए सिग्नेचर’ला ‘रक्ताची सही’ असे भाषांतरित करणारांबद्दल काय बोलावे?) शैलीबाबत वाद झाले तेव्हा रणतुंगा त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. 1996च्या विश्वचषकातील विजय हा त्याच्या कारकिर्दीचा अग्रबिंदू मानता येईल.
श्रीलंकेमध्ये यावर्षी झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये कालुतारा जिल्ह्याचा खासदार म्हणून तो निवडून आला. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारा सनथ जयसुरियाही मातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडला गेला आहे.
क्रिकेट आणि जागतिक राजकारणाचा संबंध असलेली एक घटना इंग्लंडमध्ये
या तारखेला 96 वर्षांपूर्वी घडली. पहिल्या महायुद्धाला 28 जुलै 1914 पासूनच तोंड फुटले होते पण ब्रिटिश लष्कर (आणि ब्रिटिशांच्या
वसाहती) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लष्करीदृष्ट्या सक्रिय झाल्या. ओवल हे सरे परगण्याचे (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारासाठी इंग्लंडमध्ये काऊन्टीज् किंवा परगणे आहेत) घरचे मैदान पण ते लष्कराने ताब्यात घेतले. केन्ट परगण्याविरुद्धचा सरेचा सामना मग लंडनमधील लॉर्ड्सवर हलविण्यात आला. आंतरपरगणा स्पर्धेतील विजेत्या सरे संघाने हा सामना दोन दिवसांच्या आत जिंकला. प्रेक्षकांपैकी एक होते ’डॉक’ डब्ल्यू जी ग्रेस.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply