अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी.. असा फतवा बिहारमधील एका गावपंचायतीने काढला होता पण त्या विरोधात कोणीही तक्रार केल्याची माहीती नाही याचा अर्थ हा निर्णय गावकर्यांच्या संमतीनेच घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे शहरात राहणार्यां आपल्याला जेंव्हा या फतव्या बद्दल कळ्ते तेंव्हा आपण आपला देश अजूनही किती बुरसटलेल्या विचारसरणीचा आहे असा विचार अगदी सहज करून जातो. आपल्या देशातील गांव आणि शहर यांच्या विचासरणीत आजही कमालीच अंतर आहे हे सत्य नाकारता येणार नाही. आपल्या शहरातील सूख- साधने गावात पोहचली पण शहरातील अधूनिक विचारसरणी अजूनही गावात पोह्चलेली नाही. जी काही पोहचली ती चित्रपटांच्या माध्यमातून अतीरंजीत. भारतातील गावांत आजही पुरूषप्रधान संस्कृतीच गुण्यागोविंदाने नांदतेय हे सत्य आहे त्याचाच एक भाग म्ह्णून या फतव्याकडे पाह्ता येईल.
मुंबईसारख्या शहरात लहानाचे मोठे झालेल्या, अधूनिक विचारसरणीचा बाळकडू प्यायलेल्या उच्चशिक्षीत पुरूषाच्या मनातही स्त्रियांच्या मोबाईल वापरावरच बंदी घालायला हवी हा विचार कित्येकदा डोकावून गेलेला असतो हे सत्य आहे. आता त्याचा मोकळेपणाने कोणी स्विकार करणार नाही हा भाग वेगळा. असो मुंबईसारख्या शहरात मोबाईल फोन हे काही एकमेव संपर्काचे साधन नाही आणि असल तरी त्याच्या वापरावर बंदी घालण पुरूषांनाच परवडणार नाही आणि शहारातील स्त्रिया हा अन्याय सहनच करून घेणार नाही. त्यामुळे शहारातील पुरूष असा विचार फक्त स्वप्नात अथवा मनातच करू शकतात. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट फतव्यात फक्त अविवहित मुलींच्याच मोबाईल वापरावर बंदी का घालण्यात आली त्या मोबाइलफोनचा दुरूपयोग करतात म्ह्णूनच ना ? पण आजच्या काळात सर्वच विवाहित स्त्रियां त्याचा सदुपयोग करतात याची खात्री त्यांना कोणी पटवून दिली ? मुंबईसारख्या शहरात मुलीच्या हातात दहा-वीस हजाराचे मोबाईल असतानाही त्या सार्वजनिक फोन बुथच्या बाहेर गर्दी करून आजही का उभ्या असतात ? हे कोडं आजही कित्येकांना उलगडत नाही.
समाजात अनैतिकता वाढू लागलेय त्याला मोबाईल फोनला जबाबदार धरून आपली जबाबदारी टाळ्ण्याचाच हा प्रकार आहे. त्यापेक्षा समाजाने मुलींवर चांगले संस्कार केल्यास, त्याच्यासोबत सर्वच विषयांवर मनमोकळ्या चर्चा केल्यास, त्यांना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी दिल्यास आणि त्यांच्या मनात उत्सूकतेतून निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू दिल्यास हे असे फतवे काढण्याची आवश्यकताच भासणार नाही. विनोदाने सांगायच तर अविवाहीत मुली मोबाईल फोन वरून फोन कोणाला करणार अविवाहित मुलांनाच ना मग त्यांच्याही मोबाईल फोन वापरावर बंदी का घातली नाही. हा जो काही प्रकार घडलेला आहे तो पुरूषप्रधान विचारसरणीतून आणि पुरषी अहंकारातूनच घडलेला आहे. याच समर्थन होऊच शकत नाही…
— निलेश बामणे
Leave a Reply