नवीन लेखन...

अविस्मरणीय लेखणी

आपली एखादी आवडती वस्तु अगदी सहजगत्या हरवली आणि यापुढे आपल्याला त्या वस्तूचा कधीच सहवास लाभणार नाही, असा विचार जरी मनात आला तरी मन किती अस्वस्थ होते याची कल्पना आपणा सर्वांना आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग घडत असतात, परंतु आयुष्यात अशा काही घटना घडतात की, त्या एवढया सहजा सहजी आपण विसरू शकत नाहीत, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या घटनांचे स्मरण होत राहते, तेव्हा मात्र मन उदास झाल्याशिवाय राहत नाही. पैसा असला की, आपण जगातली कोणतीही वस्तु प्राप्त करू शकतो, असे मनाला नेहमी वाटते, मुळात आपली धारणा तशीच झालेली असते. परंतु काही विशिष्ट वस्तु अशा असतात की, त्या सहज जरी उपलब्ध होत असल्या तरी त्या हरवलेल्या वस्तूची जागा भरून काढू शकत नाही. अशीच काहीशी माझ्या मनाला अस्वस्थ करणारी घटना घडली.
शालेय जीवनापासून माझ्या सतत सोबतीला असलेला आणि माझ्या सुख-दुःखाच्या भावनांना कागदावर उतरविताना लेखणीस्वरुपात अविरत साथ देणारा शाईचा पेन हरवल्याने मनात नाराजी ओसंडून वाहिली. त्या लेखणीचा सहवास असा अचानक कायमचा संपेल असे कधी मनात सुद्धा वाटले नव्हते. आपण म्हणाल साधा पेन हरवला त्यात काय एवढं व्यतीत होण्यासारखं? बाजारात गेले तर हजारो पेन्स् मिळतील. लिहिणारा कदाचित वेडा असावा अशा शेरेबाजीचा वर्षाव सुद्धा होईल. पण असो, आपल्याला काहीही जरी वाटत असलं तरी आपल्या आयुष्यात अशा कळत नकळत काही घटना घडतात की त्या विसरणं अशक्य असतं. आणि बिल्कुल तेच माझ्या बाबतीत घडले.
आजकाल लिहिण्याच्या लेखणीमध्ये पुष्कळ प्रकारच्या लेखणी आपण बाजारात पाहतो, घेतो, हरवतो, परत घेतो काही लेखणी ‘वापरा आणि फेका’ (Use & Throw ) अशा स्वरुपाच्या असतात तर काही लेखणी लिहितांना सुगंध सोडतात, काही लेखणीत लाईट असतो. अशा नानाविध प्रकारच्या लेखणी आपण पाहतो.
ज्या दिवसापासून हातात लेखणी धरायला शिकलो तर आजतागायत लेखणीच्या माध्यमातून अवघे जीवनच लेखणीमय झाले आहे, त्यामुळे लेखणीशी माझा संबंध तसा मला समजत असल्यापासूनचा. रोज काहीना काही लिहिण्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणजे बाजारात जाऊन दोन वस्तू जरी आणायच्या असल्या तरी पेन आणि कागदाने मन आणि हातावर ताबा घेतला नाही तर नवलच! आपलेही सुंदर अक्षर असावे हे नेहमीच मनाला वाटत होते, आणि लेखणी वापरायची तर ती शाईचीच असा सुरुवातीपासूनचा मानस असल्याने शाईच्या लेखणीने आपले कपडे खराब होतील किंवा कंपास पेटीमध्ये शाईच-शाई होईल किंवा सोबत शाईची बाटली ठेवावी लागेल याची मी कधीच पर्वा केली नाही. बर्‍याचवेळा कपडे खराब झालेत, ऐनवेळेस शाईचा पेनच चालत नव्हता, किंवा कधी कधी लिक होत असल्याने हात भरत असत, कधी कधी लिहिताना मध्येच शाई सुटल्याने मोठे डाग वह्यांमध्ये पडत असत, यामुळे कधी कधी मन खट्ट व्हायचे पण शाईच्या पेनशी फारकत घेण्याचा विचार कधीच मनात आला नाही. वेळप्रसंगी कार्बन पेन वापरला असेल पण शाईच्या लेखणीला पूर्वीपासूनच विशेष महत्त्व आहे.
माध्यमिक-उच्चमाध्यमिक परीक्षेला सुद्धा मी शाईच्याच लेखणीने लिहिण्याचे धाडस केले होते, बरेचजण म्हणत होते की, शाईच्या लेखणीने लिहितांना लिखाणाचा वेग कमी होतो, ही लेखणी मध्येच कधी शाई फेकेल याचा भरवसा नाही, पण त्याची मी अजिबात पर्वा न करता शाईच्या लेखणीनेच लिखाण केले.
शालेय जीवनापासून अगदी तळहाताच्या फोडापरी जपलेली शाईची लेखणी, ज्याच्याने माझ्या आयुष्याला लिखाणाच्या माध्यमातून सतत प्रकाश देण्याचा, माझ्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, आणि लिहितांना मला एक नवी ऊर्जा, शक्ती प्रदान केली. मनाचा आनंद आणि नैराश्य यातील उत्कट भाव जेव्हा जेव्हा मनातले शब्दरुपातून कागदावर प्रकट झालेत तेव्हा-तेव्हा माझ्या त्या शाईच्या लेखणीने अविरत आणि अखंड साथ देऊन माझी पाठराखण केली. मी सुद्धा त्या लेखणीची एखाद्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणूक करत होतो. कोणी मागितला तर त्याला स्वारी म्हणून देणे टाळत होतो कारण ती लेखणी दुसर्‍याजवळ देण्याचे धाडस माझ्यात नव्हते. तसा मी सोबत कार्बन पेन वापरत होतो, कोणी मागितला की कार्बन पेन पुढे करत होतो. खिशाला व्यवस्थित लावणे, वेळोवेळी स्वच्छ करणे, पडणार किंवा गहाळ होणार नाही याची मी फार काळजी घेत होतो.
काही वर्षांचा सततचा सहवास असलेली ती शाईची लेखणी अचानक माझ्याकडून कायमची हरवून जाणे, माझ्यापासून विभक्त होते ही घटना माझ्या मनाला चांगलीच चटका लावून गेली. बाजारात आजही अनेक प्रकारच्या शाईच्या लेखण्या मिळतील पण त्या माझ्या लेखणीची जागा कधीच भरून काढू शकत नाही एवढे मात्र नक्की. त्या लेखणीच्या विरहाने मन आजही अस्वस्थ होते. खूप मोठी चूक झाल्याने मनाला अगदी अपराध्यासारखे वाटते. कोणत्यावेळी मनात काय येईल, याचा अचूक वेध घेणे खरोखर खूपच कठीण गोष्ट आहे. सहवासातून दृढ झालेलं नातं मनावर इतका खोल परिणाम करून जाईल याचे मला स्वतःला सुद्धा आश्‍चर्य आहे. ज्याला कोणाला ती लेखणी हाती लागली असेल त्याने त्या लेखणीचा अवश्य सदुपयोग घ्यावा, त्या लेखणीच्या माध्यमातून चांगल्या लिखाणाची अविरत ऊर्जा निश्‍चितच मिळेल असा विश्‍वास आहे. ती लेखणी हरवल्यानंतर मी लगेचच दुसरी विकत घेतली, पण त्या लेखणीविषयी जरा वेगळीच आत्मीयता होती. तशीच ऊर्जा या लेखणीला मिळू दे अशी अपेक्षा करत लेखणीविषयी चार ओळी कागदावर उतरल्या नाहीत तर नवलचं!
लेखणीचा असाच निरंतर सहवास लाभो
समाजहिताची विचारधारा ओथंबून वाहो
तेजोमय या अस्त्राची धार बुलंद होवो
परखड सत्याचा दीप सदैव तेवत राहो…!
अनिल एस. शिंदे, जळगाव
9922727190

— अनिल शिंदे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..