नवीन लेखन...

अष्टपैलू गायिका सुलोचना चव्हाण

(मराठी कलाकार मराठी चित्रपट करुन मग हिंदी चित्रपटात पदार्पण करतात. ही गुणी कलाकार हिंदीतून मराठी चित्रपटात आली.)

चित्रपटसृष्टीतील एक काळ पाच सुलोचनांनी अक्षरश: गाजविला. सर्वात पहिली इंपीरियल मुव्हीटोनची नायिका रूबी मायर्स ऊर्फ सुलोचना, मराठी – हिंदी चित्रपटांची नायिका मोहबानू काटकर उर्फ सुलोचना, नायिका सुलोचना चटर्जी, पार्श्वगायिका सुलोचना चोणकर (संगीतकार अविनाश व्यास यांची पत्नी) व नंतरच्या काळातील लावणी सम्राज्ञी सुलोचना कदम – चव्हाण!

हे कदम कुटुंब मुळचे कोल्हापूरचे, पण सुलोचनाचे बालपण ठाकूरद्वारच्या फणसवाडी परिसरातच गेले. सुलोचनाला जवळचे लोकप्रेमाने माई म्हणून संबोधतात. व्यंकेटश्वरा मंदिराच्या दारात माईच्या आईचा फुलविक्रीचा व्यवसाय होता. आजही गिरगावातील अनेक वयोवृध्द तिला फुलवाली सुलोचना म्हणूनच ओळखतात. माई बालपणा पासून नियमित असे गाणे शिकली नाही. घरच्या रेडिओ आणि ग्रामोफोन वरुन जे काही कानावर पडेल ते तन्मयतेने ऐकून ती गात असे. तिचे कुणी गुरु नाहीत तसेच तिचे कुणी शिष्यही नाहीत. लहानपणा पासूनच माईला हिंदी, उर्दू व गुजराती भाषा चांगली अवगत होती. ती मेळ्यातही गात असे. तिच्या नैसर्गिक आवाजाने, अण्णासाहेब (सी. रामचंद्र), मुश्ताक हुसैन, ज्ञान दत्त, एस. के. पाल, पी. रमाकांत, निसार वजमी, प्रेमनाथ पंडित शामसुंदर या सारखे अनेक संगीतकार प्रभावित झाले. 1946 – 47 पासून ती हिंदी चित्रपटात पार्श्वगायन करु लागली.

मराठी कलाकार मराठी चित्रपट करुन मग हिंदी चित्रपटात पदार्पण करतात. ही गुणी कलाकार हिंदीतून मराठी चित्रपटात आली. दिनकरराव असेंबलनी तिला रेडिओवर गाण्याची संधी दिली. ती कॉन्ट्रक्टर रेडिओसाठी गात असे. तिच्या आवाजावर लुब्ध होऊन यंग इंडिया, कोलंबिया, ट्रीन, एच. एम. व्ही. रेकॉर्ड कंपन्यांनी तिच्या आवाजात अनेक खाजगी ध्वनीमुद्रिकाही काढल्या. बेगम अख्तरच्या गजल्स, सुंदराबाईच्या बैठकीच्या लावण्याही ती त्याच ढंगाने गात असे. पन्नासच्या बगिनींची सद्दी असतानाही माईची अनेक गाणी तूफान लोकप्रिय झाली होती.

भलते बोलू नका मला सासूबाई तुमच्या बोलण्याला मूळी बाई ताळ नाही. मधुकर पाठकनी लिहिलेली मुंबईची लावणी.

मला मुंबईची गंमत दाखवा हो,
मला मुंबईची गंमत दाखवा हो
चौपाटीची हवा थंड चाखवा
बोरीबंदरचा गर्दीचा नाका
कस चालावं जीवाला धोका
काळ्या घोड्याचा जोक लई बांका हो
पालव बंदरच्या बाकावर बसवा

त्याकाळात लोकप्रिय हिंदी सिनेमातील गाण्याच्या चालीवर मराठी गाणी होत असत. त्यातील सर्वात लोकप्रिय गाणे होते, राजकपूरच्या श्री – 420 मधील इचक दाना बिचक दाना चालीवर रचलेले, माईने लताला तोडीस तोड असे गायलेले.

माझ्या हाती माणिक मोती घालीते
उखाणा ठणठणाना
गरचा मोती आता झाला माझा हा
उखाणा ठणठणाना
पाऊस नाही, पाणि नाही, रान कसे हिरवे
कात नाही चूना तोंड कसे रंगले
ओऽऽ खातो मोती,
पितो पाणी गातो हा दीवाना ….
हा उखाणा, बोला ! पोपट !

माझे वडिल हरिभाऊ पुराणिक नामवंत हार्मोनियम वादक असल्याने त्यांची माईंची चांगली ओळख होती. त्यांनीच 1957 साली सार्वजनिक गणेशोत्सवात मांगलवाडीतील आमच्या द्विज विहार चाळीत माईंच्या गाण्यांचाकार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी माई लावणी सम्राज्ञी झाली नव्हती. कार्यक्रमाला खच्चून गर्दी होती. तबल्यावर माणिकराव पोपटकार साथ करीत होते. तीन तास विविध प्रकारची गाणी गाऊन माईंनी हा कार्यक्रम रंगविला होता. शालेय वयापासून माईंच्या आवाजाशी माझी गट्टी जमली होती. शमशाद बेगमसारखाखुला, दाणेदार आवाज! त्या आवाजात जोश होता, तारुण्याची मस्ती होती, नखरा होता, प्रणयाची धुंदी होती, जोडीला भाबडेपणाही होता. खणखणीत बंदा रुपया सारखा आवाज कुठेही पडला तरी वाजला पाहिजे असा! त्यातील कोल्हापूर लवंगी मिरचीचा ठसका ऐकताना मन हरखून जात असे. तिची गायकी श्रोत्यांच्या ह्रदयाला भिडणारी होती. पंडित शामसुंदर सारख्या प्रतिभावंत संगीतकाराला तिच्या आवाजाची भुरळ पडली यावरुन माईच्या गान कौशल्याची योग्यता लक्षांत येते.

(निर्माता – दिग्दर्शक शामराव चव्हाण यांनी कलगीतुरा या तमाशापटाची निर्मिती केली. कथा – पटकथा संवाद प्रबोधनकार ठाकरे यांचे होते तर संगीत दत्ता कोरगावकर यांचे होते. माईंनी पार्श्वगायन केलेला हा पहिला मराठी चित्रपट! शामराव चव्हाणांनी माईंच्या गळ्यातील नजाकत अचूक ओळखून तिच्याकडून लावणी गाऊन घेतली. माईचा हा ग्रामीण ढंगातला गावरान बाज जनतेला मनापासून भावला आणि सुलोचना चव्हाण यांची लावणी गायिका म्हणून एक नवीन ओळख निर्माण झाली)

तिच्या आवाजाची योग्य दखल फक्त रेडिओ सिलोननी घेतली. तिची जवळपास पाऊणशे हिंदी गाणी आहेत. हे रेडिओ सिलोनमुळेच संगीत श्रोत्यांना कळले. गेली अनेक वर्षे तिच्या वाढदिवसाला रेडिओ सिलोन वरुन तिची प्रसारित केली जातात. पूर्वी तिचा टेलिफोन नंबरही दिला जात असे, लाहौर, बलुचिस्तान, ब्रह्यदेशावरुन श्रोते तिच्या गाण्याची फर्माईश देत असत.

1955 मध्ये, तिच्या गायन कारकिर्दीला एक अनपेक्षित वळण मिळाले. निर्माता – दिग्दर्शक शामराव चव्हाण यांनी कलगीतुरा या तमाशापटाची निर्मिती केली. कथा – पटकथा संवाद प्रबोधनकार ठाकरे यांचे होते तर संगीत दत्ता कोरगावकर यांचे होते. माईंनी पार्श्वगायन केलेला हा पहिला मराठी चित्रपट! शामराव चव्हाणांनी माईंच्या गळ्यातील नजाकत अचूक ओळखून तिच्याकडून लावणी गाऊन घेतली. माईचा हा ग्रामीण ढंगातला गावरान बाज जनतेला मनापासून भावला आणि सुलोचना चव्हाण यांची लावणी गायिका म्हणून एक नवीन ओळख निर्माण झाली.

रणजीत देसाई यांच्या, तबलजींच्या जीवनावरच्या कथेवर हरिभाऊ रहातेकरांनी सहकारी तत्वावर रंगल्या रात्री अशा या चित्रपटाची 1962 मध्ये निर्मिती केली.

कोल्हापूरचा नवीन देखणा नट अरुण सरनाईक या चित्रपटाचा नायक होता. सर्वांच्या आवडीचा मालमसाला म्हणून या चित्रपटात लावण्या, गजला व नाट्यगीते असे संगीताचे वेगवेगळे प्रकार होते. त्याकाळी लावणी त वसंत पवारांचा हात कुणी धरू शकत नव्हतं. रंगल्या रात्री अशा च्या लावण्याचे संगीत करताना त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या, गीतकार जगदीश खेबूडकर यांना प्रथम संधी देऊन त्यांच्याकडून लावण्या लिहून घेतल्या आणि त्या लावण्यांचे चित्रिकरण राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशा बारीवर केले. खेबुडकरांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुखडा होता.

नाव गाव कशाला पुसता? अहो, मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची. कोल्हापुरच्या गीतकार व नायकाप्रमाणेच लावणी गायिकाही कोल्हापूरचीच असावी असा विचार करुन वसंतरावानी ही लावणी सुलोचना चव्हाणांकडून गाउन घ्यायची असे ठरविले. वसंतराव मग सुलोचना बाईंना मुंबईला त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्या भेटीचे वर्णन सुलोचना बाईंच्या शब्दांत …..

त्या दिवशी मी घरात होते. अचानक दार वाजल, दार उघडलं, बघते तर बाहेर एक गबाळ्या कपड्यातले केस विस्कटलेले गृहस्थ उभे! मी म्हणाले, आपण कोण?मी वसंत पवार. सुलोचनाबाई तुम्हीच ना? तुमच्या कडून लावणी गाऊन घ्यायची आहे. मी थक्कच झाले. साक्षांत वसंत पवार मराठीतले एवढे मोठे नामवंत संगीतकार, माझ्या दारात उभे! त्यांनी खिशातून एक कागद काढला. घडी घातल्यामुळे पार चुरगाळलेल्या त्या कागदावरची लावणी त्यांनी वाचून दाखविली. रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं ते पहिलं वहिलं गाण. ते गाण्याचा बहुमान मला मिळाला! दुपारच्या भोजनाची वेळ आलेली होती. मी त्यांना जेवणार का? म्हणून विचारले. वसंतरावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले ते सदगतीत आवाजात म्हणाले, लोकांनी आज पर्यंत मला फक्त पिणार का? म्हणून विचारले. प्रेमाने तुम्ही दोन घास खाणार का? असे कुणीच विचारले नाही. रंगल्या रात्री अशा मोठ्या झोकात सगळीकडे झळकला. मुंबईला तो मॅजेस्टीकमध्ये लागला होता. तबलावादक, अल्लारखॉ, नर्तिका मिनू मुमताज, गायक छोटा गंधर्व, पार्श्वगायिका आशा भोसले व सुलोचना चव्हाण यांनी आपल्या कलाकौशल्याने बोलपटात अक्षरश: नवरंग उधळले. पडद्यावर राधाबाई बुधकरांच्या संगीत बारीचे चित्रण बघताना प्रेक्षक अस्सल तमाशाचा अनुभव घेऊन धुंद होत. गायन – वादन, ताल – सुर, गळा – हात यांचा इतका सुरेख मिलाफ रंगल्या रात्री अशा पूर्वी क्वचित झाला असेल.

(या लावण्या इतक्या सुरेख रंगल्या होत्या की त्या ऐकायला ध्वनीमुद्रक मंगेश देसाई स्वत: जाऊन शांताराम बापूंना घेऊन आले होते. दुर्देवाने मल्हारी मार्तंडचे ध्वनीमुद्रण हे वसंतरावांच्या आयुष्यातले शेवटचे ध्वनीमुद्रण ठरले.)

कथा – पटकथा लेखक रणजीत देसाई, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार वसंत पवार व पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण हा यशस्वी फॉर्म्युला अनंत माने यांच्या सवाल माझा ऐका या चित्रपटातही होता. या चित्रपटाद्वारे माया जाधवनी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. सवाल माझा ऐका हा चित्रपट अपेक्षेप्रमाणेच प्रेक्षकांना खूप आवडला, सर्वत्र त्याचे स्वागत झाले. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या, कसं काय पाटील बरं हाय कां? व सोळावं वरीस धोक्याचं या दोन लावण्यांनी तर कहर केला. संपूर्ण महाराष्ट्रात या लावण्या गाजल्या.

पुण्याच्या आर्यन टॉकिजमध्ये 10 एप्रिल 1965 रोजी सवाल माझा ऐका या रौप्य महोत्सव आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा झाला. आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, जनतेने आणि सरकारने मराठी चित्रपटास अधिक आश्रय द्यावा व मराठीचा अभिमान सर्व क्षेत्रांत जागता ठेवावा! अत्र्यांच्या हस्ते सवाल माझा ऐका च्या सर्व कलावंतांना, तंत्रज्ञाना व पडद्यामागील कामगारांनाही बोनस वाटण्यात आला. याच कार्यक्रमात आचार्य अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांना लावणिसम्राज्ञी ही पदवी बहाल केली.

पुण्याच्या राम कर्वे व राम देवताळे यांच्या मल्हारी मार्तंड या चित्रपटाची कथा – पटकथा – संवाद व दिग्दर्शन दिनकर द. पाटील यांचे होते तर गाणी ग. दि. माडगुळकरांनी लिहिली होती. वसंतरावानी दोन तासात त्यातील सर्व गाण्यांना चाली लावल्या. ढोलकीची साथ बबन काळे यांनी केली होती. यातील, सुलोचनाबाईंनी गायिलेल्या,

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा व
फड सांभाळ तुर्‍याला ग आला
तुझ्या उसाला लागल कोल्हा.

लावण्यांचे ध्वनीमुद्रण राजकमल स्टुडिओत चालू होते. या लावण्या इतक्या सुरेख रंगल्या होत्या की त्या ऐकायला ध्वनीमुद्रक मंगेश देसाई स्वत: जाऊन शांताराम बापूंना घेऊन आले होते. दुर्देवाने मल्हारी मार्तंडचे ध्वनीमुद्रण हे वसंतरावांच्या आयुष्यातले शेवटचे ध्वनीमुद्रण ठरले. वसंतराव गेल्याचा फार मोठा माईंना बसला. त्यानंतरही पाडाला पिकलाय आंबा, कळीदार कपुरी पानं यासारख्या अनेक लावण्या गाजल्या.

आजच्या पिढीला सुलोचना चव्हाण यांची लावणीसम्राज्ञी एव्हढीच फक्त ओळख आहे. लावणी गायन प्रकारात ती सर्वश्रेष्ठ आहेच! परंतू तिचे कर्तृत्व फक्त एवढ्यापुरते मर्यादित नाही. मराठी चित्रपटसृष्टीत येण्याआधी तिच्या अनेक हिंदी गाण्यांनी संपूर्ण हिन्दुस्थानात धूमाकूळ घातला होता. तिची गुजराती, तामिळ, पंजाबी गाणी आहेत. गजल आहेत. अनेक मातब्बर संगीतकारांची ती आवडती पार्श्वगायिका होती. मिना शोरीच्या आवाजाशी तिच्या आवाजाची गट्टी जमली होती. हुस्नलाल भगतरामच्या फर्माईश, मोहे आता नही है चैन, ला दे टेबल फॅन कि मौसम गरमी का हे धमाल नृत्यगीत गायले आहे. काले बादल मधील, तेरी नजरने मेरी नजर से कहा दी दिलकी बात गाण्यातील तिच्या कोवळ्या भाबड्या आवाजाचे अनेक दीवाने आहेत. शाम सुंदच्या ढोलक (1951) मधील गाण्यांनी तर तिला लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर बसविले. मगर ऐ हसीना – ए – बेखब या सुील्या मुगल गीतात ती फीला तोडीस तोड गायली आहे.

मौसम आया है ंगीन व चोरी चोरी आग – सी दिल में लगाक चल दिए हम तडपते ह गए वो मुस्कुराके चल दिए ही हिन्दी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील गाजलेली गाणी आहेत. कोणत्याही पंजाबी गायिकेपेक्षा माईची गायिकी कांकणभर का होईना सरस आहे, रंजनक्षम आहे. माई हिन्दी चित्रपटातच पाहिली असती तर शमशाद बेगमची जागा निश्चित घेऊ शकली असती. तिच्याकडे अष्टपैलू गायन क्षमता असूनही लावणीसम्राज्ञी हा शिक्का बसल्यामुळे तिची गायकी महाराष्ट्रातच
बंदिस्त झाली. तिच्या गाण्यांचा आस्वाद संपूर्ण देशाला मिळायला हवा होता, असे प्रामाणिकपणे वाटते.

माईच्या गळ्यात नजाकत आहे, नैसर्गिक देणगी आहे तशी त्यांच्या विजूच्या धाकट्या मुलाच्या बोटात नजाकत आहे. नटरंग मध्ये त्याने वाजविलेली ढोलकी याची साक्ष आहे. पण त्यानेसुध्दा फक्त लावणीत अडकून न वाहता आपली वादनकला समृध्द कुन जोपासण्याची गरज आहे असे वाटते. मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल माईंचे, सुलोचना चव्हाण यांचे मन:पूर्वक अभिनंदन! पुरुषाच्या यशांत स्त्रीची मोठी भूमिका असते. इथे उलट आहे, माईच्या यशात शामावांची मोठी भूमिका आहे. माई, तुमचा आम्हाला अभिमान आहे.

— अरुण पुराणिक, मुंबई.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..