जीवनात कोणतेही आव्हान स्वीकारायचे असेल, तर त्यासाठी जिद्द व चिकाटी हवी. शिवाय समोर आलेले कोणतेही आव्हान आपण स्वीकारूच व त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास असला तर कोणतेही असाध्य काम साध्य व्हायला वेळ लागत नाही.
एकदा एका राजाला एका विशेष कामासाठी चांगल्या कर्तबगार अधिकार्याची गरज होती. असा अधिकारी परीक्षा घेऊनच त्याला निवडायचा होता. त्यासाठी त्याने राजवाड्यासमोरील भव्य पटांगणावर एक मोठा डोंगर तयार केला व हा डोंगर दुसर्या बाजूला जो नेऊन ठेवेल त्याला ते मुख्य पद मिळेल,
अशी अट त्याने घातली. प्रत्यक्ष राजवाड्यात नोकरी मिळणार म्हणून अनेक तरुण त्या स्पर्धेत उतरले. मात्र समोरचा डोंगर लांबूनच पाहून त्यातील जवळजवळ सर्वच तरुणांचे अवसान गळाले. हा डोंगर उचलून तो दुसर्या बाजूला नेणे सर्वस्वी अवघड आहे असे त्यांचे मत बनले. शिवाय नोकरीसाठी अशी विचित्र अट घातली म्हणून त्यातील अनेकांनी राजालाच वेड्यात काढले. परंतु त्यामधील एका तरुणाने मात्र हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. तो अतिशय आत्मविश्वासाने त्या डोंगराजवळ गेला त्याने बारकाईने त्या डोंगराचे निरीक्षण केले. त्या वेळी त्याच्या लक्षात आले की, हा डोंगर अगदीच कृत्रिम आहे. तो काड्या, कापूस, कागद आदी हलक्या वस्तूंनी तयार केलेला आहे. त्याने त्या डोंगराच्या
तळाशी हात घालून तो उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सहज लक्षात आले की, हा डोंगर आपण डोक्यावर उचलून नेऊ शकतो. त्याप्रमाणे त्याने दोन्ही हातांनी डोंगर उचलला व डोक्यावर ठेवून तो दुसर्या बाजूला नेऊन ठेवला व राजाची अट पूर्ण केली. हा तरुण तो डोंगर डोक्यावरून घेऊन जात असता स्पर्धेतील इतर तरुण मात्र हे आम्हीही सहज केले असते, असे म्हणू लागले. त्यावर राजा त्यांना म्हणाला, ‘ ‘मी तुम्हाला थोडेच अडवले होते? केवळ तुमच्यात आत्मविश्वास व आव्हान स्वीकारण्याची जिद्द नव्हती म्हणून तुम्ही या स्पर्धेतून पळ काढलात. ” राजाने नंतर त्या विजयी तरुणास प्रमुख पदावर नेमले व तरुणानेही राजाचा विश्वास सार्थ ठरवला.
Leave a Reply