अहमदनगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेने पाठपुरावा करुन धसास लावलेले हे प्रकरण. स्नेहालयच्या श्री अजित कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख.
अहमदनगरमध्ये विकृतांचे एक वासनाकांड पाच वर्षांपूर्वी उघडकीस आले. या वासनाकांडातील 20 दोषींना अलीकडेच न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सामाजिक संस्था आणि सर्वसामान्यांच्या पाठिब्यामुळे उच्चभ्रू आणि धनदांडग्या आरोपींविरुद्धची ही लढाई जिकणे शक्य झाले. अनैतिक मानवी वाहतूक आणि बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये हा निकाल मैलाचा दगड ठरला.
अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा आणि अल्पवयीन बालकांच्या लैंगिक शोषणासंबंधात दिलेला निकाल देशातील आजवरचा सर्वात महत्त्वाचा निकाल ठरला असून तो खर्या अर्थाने मैलाचा दगड बनला आहे. समाजातील धनदांडगे आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करून समाजातील अल्पवयीन मुलींच्या आयुष्याशी कसे खेळतात आणि त्यांच्या बचावासाठी समाजातीलच काही व्यक्तींनी पुढाकार घेतला तर त्यांना कशी शिक्षा होऊ शकते हे या प्रकरणाने नेमके समोर आले. सत्र न्यायालयाच्या निकालामुळे पाच वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फुटली.
लहान मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणार्या नगरच्या ‘चाईल्डलाईन’ या संस्थेच्या कार्यालयात एक मध्यमवयीन पुरुष आणि एक मध्यमवयीन महिला आली. त्यावेळी संस्थेचे मानद संचालक मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. या दोघांनी सांगितलेली हकीगत मन हेलावून टाकणारी तर होतीच पण नगरच्या समाजकारणावर दूरगामी परिणाम करणारीही होती. या दोघांच्याही मुली एका दुर्दैवी घटनेत अडकल्या होत्या. कार्यालयात आलेला पुरुष व्यवसायाने रिक्षाचालक होता. या व्यवसायामुळे त्याची रामू साळवे या व्यक्तीशी ओळख झाली. साळवे हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असे. तसेच वेश्यांची दलालीही करत असे. रिक्षाचालक व्यसनी असल्याचे पाहून त्याने त्याच्या अल्पवयीन मुलीशी
ओळख करून घेतली आणि तिला लग्नाचे आमीष दाखवून
ग्राहकांबरोबर संबंध ठेवायला भाग पाडले.
कार्यालयात आलेली महिला हॉटेलमध्ये काम करत असे आणि तिची मुलगी घरकाम करत असे. ती गॅसची टाकी आणण्यासाठी नेहमी दुकानात जात असे. त्यावेळी त्या दुकानात काम करणार्या शीला बारगळ या महिलेशी तिची ओळख झाली. या महिलेने तिला टाकी देण्यात प्राधान्य देऊन तिच्याशी ओळख केली आणि पुढे वेश्याव्यवसायास लावले. रिक्षाचालकाप्रमाणेच दुसर्या महिलेच्या मुलीलाही शरीरविक्रेयाच्या व्यवसायात गोवण्यात आले होते. दुर्दैवाने हे त्या दोन्ही मुलींच्या पालकांना माहित नव्हते. त्या दोघी दिवसभर घराबाहेर रहात असत. त्या काय करत होत्या आणि कुठे जात होत्या याची घरच्यांना कल्पनाही नव्हती. हळूहळू त्यांना घेण्यासाठी गाडी यायला लागली. त्यावरुन कुणी तरी त्यांचा गैरवापर करत असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. या लोकांनी त्या दोघींचा पूर्ण ताबा घेतला होता. घरच्यांनी काही विचारल्यावर आम्ही मुलींना रोजगार देतो आणि चांगले वळण लावतो तसेच त्यांना आणि तुम्हालाही पैसे मिळतील असे उत्तर मिळे. या लोकांकडे हत्यारे असत. त्यांनी या मुलींच्या पालकांवर दहशत निर्माण केली होती. घरच्यांना त्यांच्याबद्दल संशय वाटू लागला. सुरुवातीला या मुली दिवसभर घराबाहेर रहात आणि संध्याकाळी परत येत. पण, कालांतराने त्या रात्रीही घराबाहेर राहू लागल्या.
ही हकीगत सांगताना त्या मुलींच्या पालकांनी शीला बारगळ या महिलेचे नाव घेतले. तसेच मुलींना बळजबरी गाडीत बसवूनजाणार्यांमध्ये रामू साळवे ही व्यक्ती असल्याचेही सांगितले. रामू साळवे हा वेश्यांचा दलाल असून शीला बारगळ कुंटणखाना चालवते हे ‘चाईल्डलाईन’ आणि त्यांच्याबरोबर लहान मुलांच्या हक्कांसाठी लढणार्या ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना माहित होते. दोन मुलींपैकी एक मुलगी केवळ 14 वर्षांची होती. म्हणजेच यात मुलींना वेश्याव्यवसायाला लावण्याबरोबरच बाल लैंगिक शोषण आणि अनैतिक मानवी वाहतुकीचे गुन्हेही खुलेआम घडत होते.
‘चाईल्डलाईन’ आणि ‘स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणून धसास लावण्याचे ठरवले. त्यात अनिल गावडे, अंबादास चव्हाण, अजय वाबळे, राजू गुंजाळ, हनिफ शेख, प्रकाश पाचपुते, शिवाजी कुदनर यांना या मोहिमेवर पाठवायचे ठरले. पालकांकडून मुलींचे मोबाईल क्रमांक मिळाले. एके दिवशी त्या क्रमांकावर कॉल केल्यावर त्या गुलमोहर रोड या नगरमधील उच्चभ्रू वस्तीत असल्याचे समजले. “स्नेहालया” चे कार्यकर्ते मुलींच्या पालकांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. तिथे एका गाडीत त्या मुली आणि आणखी काही व्यक्ती होत्या. मुलींच्या पालकांनी त्यांना ओळखले. तोपर्यंत गाडीचा ड्रायव्हर पळून गेला परंतु, मुली आणि दोन व्यक्तींना ताब्यात घेतले गेले. या सर्वांना ‘चाईल्डलाईन’ च्या कार्यालयात आणले गेले. इथे त्या दोन्ही मुलींनी आपली कहाणी सांगितली. तिच्याबरोबर ताब्यात घेतलेल्या दोन व्यक्तींना वेगळ्या खोलीत बसवण्यात आल्याने त्यांच्यावर दडपण नव्हते. दरम्यान, शीला बारगळ तिथे आली आणि आमच्या कामात तुम्ही हस्तक्षेप का करत आहात, असे विचारले. त्या दोन मुलींपैकी अल्पवयीन मुलीला आपण ओळखत नाही असेही ती म्हणाली. परंतु, अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवरील ‘लास्ट डायल्ड नंबर्स’ मधील पहिल्या क्रमांकावर कॉल केला तेव्हा शीला बारगळचा मोबाईल वाजला. त्याचप्रमाणे शीला बारगळच्या मोबाईलवरून ‘लास्ट डायल्ड नंबर’वर कॉल केला तेव्हा त्या मुलीचा मोबाईल वाजला. यावरुन शील बारगळ खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. तिनेच या दोन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते.
यानंतर शीला बारगळसहीत या सर्वांना जिल्हा पोलिस अधिक्षक सुनील रामानंद यांच्याकडे नेण्यात आले. त्यांच्यासमोर मुलींनी आपली कैफियत मांडली. रामानंद यांनी पोलिस उपअधिक्षकांना सर्वांना अटक करण्यास सांगितले. शीला बारगळच्या मोबाईलमध्ये बर्याच ग्राहकांचे क्रमांक मिळाले. या सर्वांवर कारवाई करायची झाली तर 500 हून अधिक लोकांवर कारवाई करावी लागेल हे लक्षात आले.
या प्रकरणी जगासमोर आलेली नावे म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. यातील 90 टक्के लोक
आजही मोकळे फिरत आहेत. या सर्वांवर कारवाई करण्याची क्षमता पोलिसांकडे नाही. या प्रकरणात पोलिसांनी 25 लोकांवर गुन्हे दाखल केले. पुणे, धुळे, नगर, नाशिक या जिल्ह्यांमधून त्यांना अटक करण्यात आली. यात पोलिस, सरकारी अधिकारी, व्यावसायिक, व्यापारी, कॉर्पोरेट जगतातील बड्या लोकांचा समावेश आहे. हे आरोपी विविध जाती-धर्मांचे असल्याने गुन्हेगारांची कोणतीही जात किवा धर्म नसतो हे स्पष्ट होते.
या प्रकरणात पंच म्हणून काम करतानाच ‘स्नेहालया’ च्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडण्यासही मदत केली. अशा प्रकरणांमध्ये सर्वसामान्य जनता पुढे येऊन पंच, साक्षीदार झाली तर गुन्हेगारांना नक्की शासन होते हे या प्रकरणामुळे सिद्ध झाले. आपण ही सर्व जबाबदारी पोलिस, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर टाकून स्वत:ची जबाबदारी झटकतो. हे चुकीचे आहे. सर्वसामान्यांनी सक्रीय मदत केली तर कायद्याच्या क्षमतेचा प्रत्यय येतो. अटक झालेल्या आरोपींनी त्यानंतर ‘स्नेहालया’ च्या कार्यकर्त्यांना खुनाच्या आणि गंभीर परिणामाच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. मग त्यांनीही त्या आरोपींना उत्तर देण्यास सुरुवात केली. अशा प्रकरणांमध्ये साक्षीदारांची नावे गुप्त ठेवायला हवीत आणि त्यांना संरक्षण पुरवायला हवे. हे होत नसल्यामुळेच कदाचित सर्वसामान्य माणूस साक्ष द्यायला घाबरत असावा. ‘स्नेहालया’ ने कार्यकर्त्यांना संरक्षण तर दिलेच पण अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची मानसिक शक्तीही दिली.
या प्रकरणातील अल्पवयीन मुलीला मुंबईतील सेंट कॅथरीन्स होम या पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते. आरोपींनी तिला तिथून पळवून आणून पुन्हा या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या गरीब वडीलांनाही पैशाची हाव सुटली. पैसे दिल्यास आपली मुलगी तुमच्याविरुद्ध साक्ष देणार नाही असे सांगून त्यांनी वकिलांशी हातमिळवणी करून अनेक आरोपींकडून पैसे उकळले. शिवाय, पोलिसांनी न पकडलेल्या इतर आरोपींनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. ‘चाईल्डलाईन’ ने आरोपींवर अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि संबंधित मुलीला पुन्हा पुनर्वसन केंद्रात पाठवले. आरोपींनी ‘चाईल्डलाईन’ आणि ‘स्नेहालया’ च्या कार्यकर्त्यांविरुद्ध मुलींचे लैंगिक शोषण केल्याची फिर्याद केली. परंतु, मुलींनी हे सर्व खोटे असून या कार्यकर्त्यांनी मदत केल्याचे सांगितल्याने न्यायालयीन लढाईला बळ मिळाले. हा या प्रकरणातील टर्निंग पॉईंट ठरला. या मुलींनी साक्ष फिरवली असती तर कार्यकर्त्यांना त्रास झाला असताच पण आरोपीही मोकाट सुटले असते. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी न्यायालयाकडे तिचा ताबा मागितला परंतु त्यांचे वर्तन बेजबाबदार असल्याचे कारण देऊन न्यायालयाने त्यांचा अर्ज नाकारला.
या प्रकरणात अनेकांनी मदत केली. सीआयडीच्या उपअधिक्षक सुषमा चव्हाण यांनी आपले कर्तव्य बजावतानाच अल्पवयीन मुलीचा आईप्रमाणे सांभाळ केला. मुंबईच्या ‘प्रेरणा’ या संस्थेच्या प्रवीण आणि प्रीती पाटकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून मुलींच्या पुनर्वसनातही मदत केली. राज्य सरकारच्या बाल हक्क संरक्षण कक्षाच्या नीरु शर्मा, मुंबईतील चेंबुर येथील ‘चिल्ड्रेन होम’ चे माजी उपाध्यक्ष चंद्रसेन तुरकर यांच्यासहीत अनेकांनी आपापल्या परीने सहकार्य केले. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद केसकर यांनी 20 आरोपींना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन आणि बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच मुलींना अडीच लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्याचेही आदेश दिले. आजवरच्या निकालांमध्ये आरोपींना शिक्षा झाली तरी शोषित व्यक्तीला भरपाई मिळत नसे. या निकालामुळे शोषितांना पुढे येऊन लढण्यास प्रोत्साहन मिळू शकेल. ही शिक्षा अल्पवयीन मुलीच्या प्रकरणासाठीच झाली आहे. अजून एका मुलीच्या शोषणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातील आरोपींनाही शिक्षा होईल. हे आरोपी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागतील आणि कदाचित त्यांची शिक्षा कमी होऊ शकेल. परंतु या प्रकरणामुळे गुन्हेगारांवर एक प्रकारची जरब बसल्याचे मान्य करावेच लागेल.
या न्यायालयीन लढाईत सर्वसामान्य कार्यकर्तेच पंच आणि साक्षीदार बनले. लढाईसाठी मोठा निधी उपलब्ध झाला नाही. सर्वसामान्य एकत्र आले तर निधीविनाही लढाई जिंकू शकतात ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली. कोणावर अन्याय झाला असेल आणि त्याविरुद्ध लढण्याची सर्वसामान्यांची इच्छा असेल तर त्यांना सर्व प्रकारची कायदेशीर माहिती पुरवण्यास आणि मदत करण्यास ‘स्नेहालय’ तयार आहे. गरज आहे ती शोषितांनी पुढे येण्याची आणि सर्वसामान्यांनी लढण्याची तयारी दाखवण्याची !
(अधिक माहितीसाठी संपर्क : 9011020174 ई-मेल : info@snehalaya.org)(अद्वैत फीचर्स)
— अजित कुलकर्णी
Leave a Reply