नवीन लेखन...

अॅपल बोर

अॅपल बोरातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचे प्रमाण सफरचंद व संत्रे या फळांपेक्षा जास्त असते. पोषणाच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा बोर श्रेष्ठ आहे.

हवामान :

या बोराचे झाड फार काटक असते. ते सर्व प्रकारच्या हवामानात वाढत असले, तरी उष्ण व कोरडे हवामान अॅपल बोरासाठी पोषक ठरते. आर्द्र हवेत झाडाची वाढ व फलधारणा समाधानकारक होत नाही. कमाल तापमान ३७ ते ४८ अंश सेल्शिअस अथवा त्याहून जास्त आणि किमान तापमान ७ ते १३ अंश सेल्शिअस आणि १५ सें.मी. पासून २२५ सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही झाडे चांगली वाढतात. तसेच झाडाच्या योग्य वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हिमतुषारांमुळे झाडाला सहसा नुकसान पोहोचत नाही. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा झाली अथवा ते आगीत होरपळून निघाले, तरी ते जिवंत राहते व पुन्हा वाढू लागते.

जमीन :
अॅपल बोराचे झाड चांगली हवा खेळणाऱ्या वाळूमिश्रित गाळवट जमिनीत चांगले वाढते. तसेच जांभ्या दगडाच्या खडकाळ अथवा चांगल्या निचऱ्याच्या काळ्या जमिनीसह सर्व प्रकारच्या जमिनीतही वाढते. या झाडाचे सोटमूळ थोड्या अवधीत खोलवर जाते व जमिनीतील थोड्या प्रमाणातील ओल झाडाच्या वाढीसाठी पुरेशी होते

कलम :
जंगली प्रकारांच्या खुंटावर अॅपल बोराच्या झाडांचे डोळे भरुन बोरांची चांगल्या प्रकारांची अभिवृध्दी करण्यात येते. रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे सोटमूळ थोड्या अवधीत खोल जाते व स्थलांतर करताना त्याला इजा पोहोचण्याचा संभव असतो. यासाठी शेतातच जंगली प्रकारांची रोपे लावून त्यांवर डोळे भरणे पसंत करतात; परंतु विशेष प्रकारचे तंत्र वापरुन रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे स्थलांतर करण्यात कृषि विद्यापीठांनी यश मिळविले आहे.
पडीक जमिनीत अथवा शेताच्या बांधावर वाढणाऱ्या बोरीच्या झाडावर अॅपल बोराच्या झाडांचे डोळे बसविल्यास चांगल्या प्रतीची बोरे मिळू शकतात. यासाठी जानेवारी ते मार्च महिन्यात जमिनीपासून १ ते १.२५ मी. उंचीवरील खोडाचा भाग कापून टाकतात आणि फुटून आलेल्या फांद्यांपैकी एक जोमदार फांदी ठेवून त्यावर डोळा बसवितात व तो फुटून आल्यावर शेंड्याकडील भाग कापून टाकतात. डोळे भरल्यापासून एक वर्षाच्या आत फळे धरण्यास सुरुवात होते.

लागवड :
साधारणत: जूनमध्ये या बोरांची लागवड करतात. दोन झाडे व ओळीतील अंतर ५ बाय ५ मीटर किंवा ६ बाय ६ मीटर ठेवावे. त्यासाठी रोपं विकत आणावीत किंवा स्वतः तयार करावीत. लागवडीसाठी दीड फूट खोलीचे खड्डे खणून त्यात एक टोपले शेणखत, २५० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फूरद आणि १०० ग्रॅम पालाश, अर्धा किलो लिंबोळी पेंड, १० ग्रॅम फॉरेट टाकावे. जंगली बोर लावून त्यावर अॅपल बोराचा कलम, डोळा भरला तरी चालतो.

खत व पाणी व्यवस्थापन :
ज्याप्रमाणे लागवड करताना खत मात्रा देणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ती छाटणीनंतरही देणे आवश्यक असते. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला ५० किलो शेणखत द्यावं. तसेच २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फूरद आणि ५० ग्रॅम पालाश प्रती झाड प्रती वर्ष या प्रमाणे रासायनिक खते द्यावीत. यापैकी फक्त नत्र दोन हफ्त्यांतून विभागून द्यावं. माती-पाणी परिक्षण व झाडांच्या वयानुसार खतांची मात्रा बदलावी. गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकाद्वारे किंवा फवारणी करून द्यावे. तसेच फुलफळ व फळगळ नियंत्रणासाठी संजीवकांचा वापर करावा.

अॅपल बोर कमी पाण्यातही उत्तम प्रकारे येत असले तरी प्रति झाडास रोज एक ते दीड लिटर पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी देणे आवश्यक असते. पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. काही भागात पाचटाचे अच्छादनही करतात.

छाटणी :
अॅपल बोराच्या झाडाला फुटून येणाऱ्या फांद्या लांब, किरकोळ आकारमानाच्या व वेड्यावाकड्या वाढणाऱ्या असतात. झाडे लहान असताना त्या फळांच्या भाराने मोडतात. फांद्यांचा बळकट सांगाडा तयार करण्यासाठी वाढीच्या पहिल्या ३-४ वर्षांच्या काळात सर्व लांबलचक व नको असलेल्या फांद्या छाटतात. त्यानंतर दरवर्षी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते कारण फळे चालू वर्षाच्या फुटीवर नांच्या बगलेत धरतात. अॅपल बेर या जातीला वर्षातून दोन वेळा बहार येतो. या बोरीपासून पावसाळा आणि हिवाळ्यात उत्पादन मिळते.

छाटणी केल्याने फळांची संख्या वाढते व त्यांची प्रतही सुधारते. फळे काढून घेतल्यावर खरड छाटणी आणि मोहोर येण्यापूर्वी हलकी छाटणी करतात. खरड छाटणी करताना 60 सें.मी.पर्यंत मुख्य खोड ठेवून छाटणी करावी.

कीड-रोग व्यवस्थापन :
या फळाला प्रामुख्याने फळमाशी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. फळमाशीमुळे या पिकाचे सर्वांत जास्त नुकसान होते. फळाच्या सालीत माशी लांबट आकाराची अंडी घालते व त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळात शिरुन गर खातात. दमट हवामानात या फळमाशीचा फार उपद्रव होतो. अळीच्या बंदोबस्तासाठी प्रथमतः किडलेली फळे गोळा करून त्यांचा नाश करवा. उन्हाळ्यात झाडाखालील जमिनीची मशागत करून या माशीचे कोष उन्हाने मारावेत. तसेच, बागेत एकरी ४-५ कामगंध सापळे लावावेत.

या बोरावर कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) भुरी नावाचा रोग विशेषेकरून आढळून येतो. पाने व फळे गळतात व झाडावर राहिलेली फळे नीट पोसत नाहीत. या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी किंवा पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बाग स्वच्छ् ठेवल्यास कीड-रोगांचे प्रमाण कमी राहते. फळांची काढणी करण्यापूर्वी कमीत कमी १५ दिवस रासायनिक औषधांची फवारणी थांबवितात.

तयार झालेल्या फळांचे पक्ष्यांपासून फार नुकसान होते. मासे पकडण्याच्या जाळ्यांनी झाड झाकल्यास हे नुकसान पुष्कळ कमी होते.

काढणी व उत्पन्न :
कलमी झाडांना लागवडीपासून २-३ वर्षांनी व बी लावून तयार केलेल्या झाडांना ४-५ वर्षांनंतर फळे धरण्यास सुरुवात होते. फलधारणेच्या काळात जमिनीत पुरेशी ओल नसल्यास फळे गळतात. कच्ची फळे झाडावरुन काढल्यास पुढे ती पिकत नाहीत.

छाटणी केल्यानंतर आठ-नऊ महिन्यांत फळे येण्यास सुरु वात होते. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला किमान ३० ते ५० किलो बोरांचे उत्पादन होते. दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाडाला ८० ते १२० किलो बोरांचे उत्पादन होते. सर्वसाधारण देशी बोरापेक्षा या बोराचे वजन ६० ग्रॅम पासून २०० ग्रॅमपर्यंत भरते. या जातीचे एक झाड सुमारे २० वर्षे जगते. झाडे कायम हिरवीगार राहतात.

अॅपल बोरांना स्थानिक बाजारपेठेत १५ ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मागील वर्षी दिल्ली बाजारपेठेत हा दर ३० ते ४० रुपये प्रति किलो इतका होता. उत्तर भारतात प्रकाराप्रमाणे फेब्रुवारीच्या मध्यापासून एप्रिल अखेरपर्यंत फळे काढणीचे काम चालू राहते. दक्षिण व मध्य भारतात नोव्हेंबरपासून फळे बाजारात येतात. उत्पादकांची संख्या जास्त असल्यास दूरच्या बाजारपेठेमध्ये माल नेणे शक्य होते.

उपयोग :
फळातील खाद्य भागात ८१.६% जलांश, ०.८% प्रथिन, ०.३% वसा (स्निग्ध पदार्थ) व १७% कार्बोहायड्रेट (शर्करा) असतात. शिवाय क जीवनसत्त्व आणि खनिजेही असतात. आवळा व पेरु ही दोनच फळे क जीवनसत्वाच्या बाबतीत बोरापेक्षा श्रेष्ठ आहेत. तसेच बोरातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचे प्रमाण सफरचंद व संत्रे या फळांपेक्षा जास्त असते. पोषणाच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा बोर श्रेष्ठ आहे.

पक्व फळे खाण्यासाठी व औषधासाठी वापरतात. फळे ताजी, सुकी, साखरेत मुरविलेली, वाफविलेली व धुरावलेली अशा निरनिराळ्या स्वरुपात खाण्यात येतात. झाडांचा पाला जनावरांना (गाई, शेळ्या) खाऊ घालतात. लाखेचे किडे पोसण्यासाठी या झाडांचा वापर करतात. तसेच वाऱ्याला अडथळा करून इतर वनस्पतींना संरक्षण देण्यासाठी या झाडांची लागवड उपयुक्त ठरली आहे. बियांतील गर झोप लागण्यासाठी देतात. बियांतील तेलाचा कातडी कमावण्यासाठी उपयोग करतात. सालीचा काढा अतिसार व आमांश यांवर देतात. लाकूड कठीण, मजबूत व टिकाऊ असते आणि त्यापासून शेतीची अवजारे, गाड्यांची चाके व बंदुकीचे दस्ते करतात, तसेच त्यांपासून कोळसाही तयार करतात.

मागील चार-पाच वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसाने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. पावसाच्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीचा वापर करावा. परंपरागत पीक पद्धतीला फाटा देऊन पावसाची अनियमितता व वातावरणातील बदलाप्रमाणे नवीन पिके घ्यावे. विशेषतः तेलकट डाग रोगग्रस्त डाळिंबाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना हे बोर चांगला पर्याय होऊ शकेल.

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

1 Comment on अॅपल बोर

  1. साहेब,नमस्कार.
    माझ्या कडे अॅपल बोरांची बाग आहे.सेटींग नंतर दिड दोन महीन्यांची फळे झाल्यावर काळी पडून फळकुज होते.बरीच वेगळी वेगळी औषधे फवारणी करुन पण फळकुज थांबत नाही.योग्य तो उपाय सुचवा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..