नवीन लेखन...

आज जागतिक मधुमेह दिन

आज १४ नोव्हेंबर..आज जागतिक मधुमेह दिन
मधुमेह… सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्यांमधील प्रमुख घटक असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात इसवी सनपूर्व ४०० ते ५०० या कालखंडात मधुमेहाचा उल्लेख अढळतो. देशातील मधुमेहाचे प्रमाण २०१२च्या अहवालानुसार सहा कोटी तीस लाख एवढे आहे आणि ते वाढत जाण्याची शक्यता आहे. जवळपास ५० टक्के व्यक्तींच्या मधुमेहाचे निदानच होत नाही. सुमारे २० टक्के प्रौढ व्यक्तींना मधुमेह आहे, त्यातील ७५ टक्के मधुमेहींना योग्य इलाज मिळत नाही, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा मधुमेह अनियंत्रित आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मधुमेहाची पूर्ण शास्त्रीय माहिती रुग्णांपर्यंत बहुतेक वेळा पोहोचवली जात नाही. शरीरातील प्रत्येक पेशीच्या ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लुकोज आहे. अन्नपदार्थाचे रूपांतर पचनसंस्थेमध्ये रक्तात शोषल्या जाणाऱ्या छोट्या अन्न घटकांमध्ये होते, जसे कर्बोदकांचे (साखर आणि स्टार्च) रूपांतर ग्लुकोजमध्ये होते, प्रथिनांचे रूपांतर अॅमिनो अॅसिडमध्ये (मेदाम्ले) होते, तर चरबीचे रूपांतर फॅट ग्लोब्युलमध्ये होते. रक्तातील ग्लुकोज शरीराच्या सर्व पेशींसाठी गरजेप्रमाणे उपलब्ध होते, तर जास्तीचे ग्लुकोज ग्लायकोजेन आणि मेदाम्लाच्या रूपात शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये साठविली जाते व गरजेनुसार वापरली जाते. इन्शूलीन आणि ग्लुकॅगॉन ही स्वादूपिंडीत तयार होणारी संप्रेरके शरीरातील ग्लुकोजचे नियंत्रण करतात. इन्शुलीन रक्तातील साखर कमी करते, तर ग्लुकॅगॉन साखर वाढविते. इन्शुलीन तयार होण्याच्या प्रक्रियेत अनियमितता किंवा इन्शुलीनला पेशींनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही, तर पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढून पेशींमध्ये साखर कमी पडते. या स्थितीलाच मधुमेह म्हणतात.

मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे. यावर फक्त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्तातील दीर्घकालीन वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात. मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व, वंध्यत्व इत्यादी सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि ज्या अवयवाच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला, तर त्याचा गंभीर आजार होतो. पायात रक्तपुरवठा न होणे, जखमेत संसर्ग, जखमा बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे, पाय सडणे, असा त्रास यामध्ये होतो.

मधुमेहाचे प्रकार
आयडीडीएम
या प्रकारचा मधुमेह लहान वयात किंवा तरुणपणी होतो. शरीरात इन्शुलीन तयार होत नाही किंवा अत्यल्प होते. यांना इन्शुलीनचे इंजेक्शन अनिवार्य असते. इन्शुलीनअभावी शरीरात किटोन तयार होतो. यातून व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मृत्यूच्या स्थितीकडे जाऊ शकते.
इन्शुलीन आवश्यक नसलेला मधुमेह. मधुमेहाच्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना इन्शुलीन आवश्यक नसलेला मधुमेह असतो. हा सहसा चाळीशीनंतर होतो. अधिक वजन आणि बैठी जीवनशैली या आजाराला कारण ठरते. आहार, औषधी आणि योग्य जीवनशैली यांनी या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

गरोदरपणातील मधुमेह
काही महिलांमध्ये दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत मधुमेहाची लक्षणे दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना हा त्रास होतो. जीवनशैलीतील बदल आणि उशिरा होणारी गर्भधारणामुळे हा त्रास होतो. यामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे, बाळाची ग्लुकोज कमी होणे, बाळाला जन्मल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणे किंवा कावीळ यांना सामोरे जावे लागते.
औषधामुळे होणारा मधुमेह अनेक औषधांमुळे शरीरातील इन्शुलीनची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. अशा स्थितीस सेकंडरी मधुमेह म्हणतात. या प्रकारचा मधुमेह औषधे बंद केल्यास बरा होतो.

मधुमेहाची कारणे आणि लक्षणे
एफसीपीडी या मधुमेह विशेष प्रकारात पोटात दुखणे, शौचाला जास्त प्रमाणात व तेलकट होणे आणि अन्नघटकांचे पचन व शोषण अपूर्ण राहिल्यामुळे होणारी लक्षणे दिसून येतात. स्वादुपिंडात तयार होणारी पाचकद्रव्ये कमी झाल्याने अशा रुग्णांची पचनशक्ती मंदावते. आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील बदल अशा दोन्ही कारणांनी मधुमेह होत असावा. स्थूलपणा मोजण्यासाठी बॉडीमास इंडेक्सचा वापर करतात.

इन्शुलीन रेजिस्टंस
दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलीन तयार होते, पण पेशी इन्शुलीनला प्रतिसाद देत नाहीत. याला इन्शुलीन रेजिस्टंस म्हणतात. त्यामुळे या व्यक्तींमध्ये मधुमेह असल्याची जाणीव लगेच होत नाही.

मधुमेहाची लक्षणे
अनेक व्यक्तींमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, तर काहींना खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, भूक जास्त लागणे, वजन घटणे आणि अशक्तपणा जाणवणे, अशा तक्रारी असतात. निरनिराळ्या अवयवांचा जंतुसंसर्ग उदा. त्वचा (पुरळ, गळवे, खाज), मूत्रमार्ग (लघवीला जळजळ / आग, लघवीच्या जागी खाज येणे, जागा लाल होणे), सायनसचे विकार व क्षयरोग जाणवू लागतात.

मधुमेहाच्या परिणामांची लक्षणे अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका, कमजोर नजर, अंधत्व, वंध्यत्व,मुत्रपिंड निकामी झाल्यामुळे होणारी विविध लक्षणे आहेत. महिलांबाबत गर्भपात, अर्भकाचा गर्भाशयातच मृत्यू, मुलांमधे विकृती यांनी मधुमेह अस्तित्व दाखवतो.

मधुमेहाचे निदान
उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरून मधुमेहाचे निदान होते. रक्तातील साखर तपासण्यासाठी व्यक्तीने किमान आठ तासांपूर्वी अन्न ग्रहण केलेले असावे. रक्तातील साखरेचे सामान्य प्रमाण ८० ते १०० मिलिग्रॅम टक्क्यांएवढे असते. उपाशीपोटी साखर १२६ मिलिग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर मधुमेह झाला आहे, असे खात्रीलायकपणे म्हणता येते. रक्तातील सामान्य साखर २०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त आणि मधुमेहाची लक्षणे असतील, तरीही मधुमेहाचे निदान होते. रक्तातील साखर जेवणानंतर दोन तासांनी १५० मिलिग्रॅमहून अधिक असेल, तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. रक्तातील ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ६.५पेक्षा जास्त असेल, तर मधुमेह असतो.

ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिनबद्दल थोडी माहिती करून घेऊयात. आपल्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. त्याचा संयोग रक्तातील साखरेबरोबर होऊन ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन तयार होते आणि तांबड्या पेशीचे आयुष्य तीन महिने असते. त्यामुळे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन मागील तीन महिन्यांची साखरेची मात्रा दाखविते. या टेस्टने मागील ३ महिन्यांतील साखरेचे नियंत्रण कसे आहे, ते कळते. ही तपासणी कोणत्याही वेळी केली जाऊ शकते.

जीटीटी (ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट)
मधुमेहाचे निदान करण्याची ही एक विश्वासार्ह चाचणी आहे. ती उपाशीपोटी करावयाची आहे. ग्लुकोमीटर हे ग्लुकोजची रक्तातील साखर त्वरित मोजण्याचे छोटे सुटसुटीत यंत्र आहे. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आवश्यकतेनुसार कधीही मोजता येते.

मधुमेहातील इतर तपासण्या.
बॉडी मास इंडेक्स, पोटाचा घेर, रक्तदाब, त्वचा, पायच्या संवेदना, थायरॉइड ग्रंथीची तपासणी, डोळ्यांचा पडदा, रक्तातील साखर नियंत्रणात असेल, तर दर तीन महिन्यांनी रक्तातील साखर उपाशीपोटी आणि जेवणानंतर तपासावी, रक्तातील चरबी ‘ट्रायग्लिसेराइड’ची तपासणी महत्त्वाची आहे, किडनी फंक्शन टेस्ट, किडनीच्या प्रकृतीसाठी लघवीमधील मायक्रोअल्बुमिनची तपासणी, हृदयविकरासाठी ईसीजी, कलर डोप्लर, स्ट्रेस टेस्ट, दातांची तपासणी आणि गरजेनुसार इतर तपासण्या. या चाचण्या ठराविक कलांनातराने पुन्हा करणे गरजेचे असते.

मधुमेहावरील उपचार
सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल, असे एकही औषध उपलब्ध नाही. तो आटोक्यात ठेवता येऊ शकतो. योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये वजन कमी करण्यानेसुद्धा मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.

मधुमेही व्यक्तीचा आहार काय असावा?
– साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट पूर्ण बंद करावे.
– फास्ट फूड, कोल्डड्रिंक्स, शिळे अन्नपदार्थ टाळावे.
– तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ बंद करावे. दूध, साय, लोणी, नारळ, अंडी, पामतेल, शुद्ध तूपही यांमुळे हृदयरोगालाही आमंत्रण मिळते.

– मोनो अनसॅचुरेटेड नावाची चरबी शेंगदाणा, मोहरी, तीळ यांपासून बनलेल्या तेलात आणि फिश ऑइल यामध्ये जास्त असते आणि यांचे सेवन फायदेशीर असते. जवस, अक्रोड, बदाम, मासे, बीन्सही फायदेशीर असते.
– ट्रान्स फॅटी अॅसिड्स घातक असतात. वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी यामध्ये यांचे प्रमाण जास्त असते.

– मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे हे पदार्थ बंद करावे.
– आंबा, केळी, चिक्कू, द्राक्ष ही फळे बंद करावीत.
– पालेभाज्या, कोबी, गवार, दोडके, कारले, शेवगा या भाज्या खाव्यात.
– मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे जास्त प्रमाणात घ्यावे.
– टरबूज, पपई, बोर, पेरू, जांभळे, सफरचंद, करवंदे इत्यादी फळे घ्यावीत. रोज एक फळ खाणे रोग्यासाठी चांगले असते.
– तंतुमय पदार्थांचे सेवन करावे जसे रागी, बाजारी, मका, गहू इत्यादी.
– द्रव पदार्थ उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी घ्यावेत.
– मधुमेहाच्या रुग्णाने उपवास टाळावेत. रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धवस्था येण्याची शक्यता असते. प्रवास करतानाही जेवणाच्या वेळा पाळाव्यात.

मधुमेही व्यक्तींसाठी व्यायाम
मधुमेहींसाठी व्यायाम हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. व्यायामामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा रुग्णांनी मध्यम प्रतीचा व्यायाम करावा. रोज ३० मिनिटे मध्यम किंवा तीव्र गतीने चालण्याचा व्यायाम हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे. व्यायामपूर्वी १० मिनिटे वार्मअप होणे गरजेचे आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान यांचाही शरीरावर चांगला परिणाम होतो. मधुमेही व्यक्तींनी डॉक्टरच्या सल्ल्याने व्यायाम करावा. शेवटी सर्वांत महत्त्वाचा संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगसाधना, ध्यान, व्यसनमुक्त जीवन, योग्य औषधोपचार आणि मधुमेह शिक्षण याद्वारे या आजारावर मात करता येऊ शकते. जो मधुमेही रुग्ण मधुमेहासंबंधी जास्तीत जास्त ज्ञान मिळवेल आणि योग्य तो उपचार करेल तो दीर्घायुषी होईल.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. विकास रत्नपारखे./ मटा.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..