एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे मिटून चिंतन करीत, शांत बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते. पंचवीस वर्षापूर्वीच ते वारले. ज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती. मी देखील उठून त्यांचा पिच्छा करू लागलो. मला फार उत्सुकता लागलेली होती की ही व्यक्ती कोठून आली. कोठे राहते? मला दुरूनच त्यांचा ठावठिकाणा कळला. माझ्या स्मृतींना प्रेमाचा उजाळा देणारी, वडिलांच्या सहवासाचा आनंदमय इतिहास ज्यागृत करणारी व्यक्ती, मी गमाऊ इच्छित नव्हतो. अचानक भेटली व गायब झाली असे होऊ नये. त्या आनंदायी आठवणी मला जिवंत ठेवायच्या होत्या. आठवणीसाठी माणसे आपल्या प्रेमाच्या माणसांच्या तसबिरी भिंतीवर टांगतात. दृष्टी समोर नसलेल्यांना सतत जागृत ठेवतात. क्वचित प्रसंगी हेच कार्य कुणाचे पुतळे करतात. केंव्हा केंव्हा तर अशा व्यक्तींच्या कांही वस्तू जसे काठी, चष्मा पेन कपडे इत्यादी तुम्हास त्यांच्या काल्पनिक सहवासाचा लाभ देतात.
आठवण चाळवणारे अनामिक !
त्या प्रसंगानंतर मी त्यांना बराच वेळा बघितले. फक्त येथेच थांबलो. त्यांना भेटणे, त्यांची ओळख वाढविणे, त्यांचा सहवास जवळून घेणे, हे टाळले. एक भीती वाटत होती की त्या अनामिक व्यक्तीच्या जवळीकतेने मला त्यांच्या बाह्यांगा प्रमाणेच अंतरंग कळेल. त्यांच्या स्वभावगुणाच्या मी जवळ जाईन. कदाचित हे धोक्याचे ही ठरू शकेल.
ईश्वराने जी प्रचंड जग निर्मिती केलेली आहे, त्यात विविधता हाच त्याचा कलागुणांचा अविष्कार आहे. जगण्याचे आणि आपसातील प्रेमाचे ते एक महान तत्व ठरू शकते. जर सारखेपणा हा खूपच प्रमाणात दिसून आला तर तो मनातला आनंद नष्ट करण्यास करण्यास कारणीभूत होईल. मला भेटलेल्या त्या अनामिक व्यक्तीच्या बाह्य ठेवणीमध्ये ज्या लकबी आढळल्या, त्या मला आठवणीच्या भूत काळात नेवून आनंदित करीत होत्या, येथपर्यंत ठीक होते. पण जर मी त्या व्यक्तीचा स्वभाव विशेष बघितला तर माझ्या मनांत त्यांच्या विषयी कोरली गेलेली माझ्या वडिलांची छबी कदाचित एकदम बदलून जाईल. आणि हा बदल कायम स्वरुपीही असेल. निसर्गाने एक गम्मत म्हणून कां होईना जी व्यक्ती माझ्या समोर उभी केली, तिला मी तेवढ्याच अंतराने आणि तेवढेच समजून आनंद घेऊ इच्छितो. फक्त एक आठवण चाळवणारे अनामिक.
Leave a Reply