गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार II
सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां II १ II
वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी II
मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां II २II
न कळला ईश I न उमगले आयुष्य II
दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे II ३II
अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट II
प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता दाखवी II ४II
तैसा गुरू तुमचा I पडदा फाडी अज्ञानाचा II
मार्ग दाखवी जीवनाचा । आनंद मिळण्यासाठी II ५II
गुरूविना नाही ज्ञान I दूर करी तुमचे अज्ञान II
ज्ञान ज्योत देई पेटून । तुमच्या ज्ञानदिपाची II ६II
ओळखावा आत्माराम I जाणावा ज्ञान राम
समजावे मनोराम I आपल्या देहातील II ७II
गुरू असता देहमंदिरी I कां फिरतोस दारोदारी II
करावी श्रद्धा प्रभूवरी I आत्म गुरूसी जाणोनी II ८II
गुरू भेटणे कठीण I जाणील त्यासी कोण II
जवळी तुमच्या असून I कां शोधतासी II ९II
तुमच्या गुरू अंतर्मनी I महत्व त्याचे जानोणी II
घ्यावे त्यास ओळखूनी । हेची तुमचे यश II १०II
जाणावे आत्मज्ञान I करावे स्वचिंतन II
तोच गुरू असून । उद्धारूनी नेई II ११ II
ज्याचा गुरू त्याचे जवळ I मग का दवडसी वेळ II
शोधण्यास जाई काळ I निरर्थक II१२II
आयुष्य आहे थोडे I चित्त द्यावे प्रभूकडे II
जीवनाचे उकलेले कोडे I त्याच्या आशिर्वादे II १३II
जीवनाचे मर्म I जाणावे हा धर्म II
त्याचप्रमाणे करावे कर्म I आयुष्य सार्थकी नेणेसी II १४
गुरूसी करावे वश I समजोनी त्यास ईश II
घ्यावा त्याचा उपदेश I जीवनाचा II १५II
एकदा अंतर गुरू लाभता I उपदेश त्याचा मिळता II
मार्गदर्शन सतत होता I तुमच्या जीवनाचे II १६II
श्रेष्ठ गुरू अंतरीचा I परि विवेक पाहीजे मनाचा II
सराव करावा एकाग्रतेचा I उपदेश त्याचा घेण्या II १७II
अंतरज्ञान मिळे कठीण I करावे लागते बहुत चिंतन II
श्रद्धा प्रभूवर ठेवून I ध्यान करावे II १८II
एकाग्रतेचे चिंतन I लागता प्रभूध्यान II
विचार रहीत करावे मन I प्रकाश पडेल अंतरमनी II १९II
आंतरमनातील प्रकाश I चेतना देईल सावकाश II
आनंदी करील आयुष्य I गुरू बनोनी तुमचा II २०II
रोज करावे ध्यान I मनी एकाग्र भाव आणून II
जाता बाह्य जगाला विसरून I नियमाने II २१II
योगाचे आसते सामर्थ्य I जीवनाचा दाखवी अर्थ II
न जाई प्रयत्न व्यर्थ I विश्वास ठेवावा प्रभूवर II २२II
गुरू तुमच्या अंतरी I शोधता त्यासी बाहेरी II
हिच शोकांतिका खरी I तुमच्या जीवनाची II २३II
सारे जीवन वाया जाई I जीवन तत्व ध्यानी न येई II
पश्चातापूनी उपयोग नाही I शेवटचे क्षणी II २४II
चार दिवसांचे जीवन I सार्थकी लागावे म्हणून
पाया त्याचा आत्मज्ञान I समजोनी घ्यावा II २५II
संशय मनी न यावा I ध्यानयोग सिद्ध करावा II
तोच आपुला गुरू समजावा । अंतरात्मा II २६II
गुरू नसतो कुणी व्यक्ती I अंतर्मनातील ती शक्ती II
आत्मा त्यास संबोधती । विद्वान जन II २७II
जागृत अंतरात्मा तोच होय । परमात्मा
श्रम न येई कामा । शोधता देहाबाहेरी II २८II
तुमचा गुरू तुमचेपाशी । परी तुम्ही वाट चुकलासी
जाणोनी घ्यावे गुरूसी । आत्मचिंतनाने II २९II
प्रत्येक ती व्यक्ती । तिच्यातील सुप्त शक्ती
सूचना देत असती । जिवन मार्गाच्या II३०II
जागृती आसवे चित्ती । चेतवावी सुप्त शक्ती
मार्ग तयांना दिसती । ज्ञान प्रकाशाने II३१II
एकाग्र ज्याचे मन । न होत चुका त्याचे कडून
संसार सागर जाय पोहून, केव्हांही II ३२II
असावा आत्मविश्वास । मिळेल त्यासी यश
मदत करी ईश । तयांना II ३३ II
आत्मबल महान । मार्ग त्यासी दिसून
यश करी संपादून । जीवनाचे II३४ II
इच्छा तेथे मार्ग असती । अंतरगुरू मार्ग दाखविती
श्रद्धा ठेवावी त्याचे वरती । ध्येय गाठण्यासाठी II३५ II
आपण चुका करिती । दोष प्रभूसी देती
नशीबास नावे ठेवती । अज्ञानामुळे II३६ II
निर्णयाचे बहूत क्षण । सुख – दु:खे त्यावरी अवलंबून
जीवन होई कठीण । चूक तुमची घडता II३७ II
चूक होते विचारांची । परिस्थिती जाणण्याची
चाहूल न येती संकटाची । तुम्हांसी II३८ II
भावना आणि विचार । यांची मर्यादा असणार
नियती तिला न कळणार । हाच आहे निसर्ग II३९II
आपण जगतो विचाराने । आपल्यातील भावनेने
परंतु जगावे आत्मज्ञानाने । हाच यशाचा मार्ग II ४०II
आत्म्याचे सामर्थ्य श्रेष्ठ । त्यास कळे इष्ट
अंश प्रभूचा स्पष्ट । असे तो एक II४१II
म्हणून जाणावे आत्मज्ञान । जावे त्यास शरण
अंशात्मक परमात्मा समजून । चिंतन करावे त्याचे II ४२II
निर्णय कधी न चुकती । जेव्हां तो आत्मा देती
योग्य निर्णय आनंदती । तुम्हां लागी II४३II
आत्मज्ञान हाचगुरू । सुप्त शक्ती जागृत करू
निर्णय त्याचे शिरी धरू । हाच करावा संकल्प II४४II
एकाग्र होता मन । लागेल तुमचे ध्यान
निर्णय तोच देईन । तुमच्यातील सुप्त शक्ती II ४५II
प्रसंग येता तुमचे वरी । एकाग्र चित्ती विचारी
आत्मगुरू निर्णय करी । तुमचे साठी II ४६ II
आत्म्त्याचा निर्णय । समाधान देय
चुका न होय । कधीही II ४७ II
जीवानाचे सार । समजता ईश्वर
आत्मज्ञान गुरूवर । विश्वास ठेवावा II४८II
आत्मज्ञान गुरू । चिंतन त्याचे करू II
मार्ग तोच धरू I जीवन यशासाठी II ४९ II
आत्मज्ञान असे महान II घ्यावे समजोनI सर्वांनी II ५० II
II शुभं भवतू II
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmain.com
— डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply