नवीन लेखन...

आपत्ती व्यवस्थापनाची ऐशी तैशी

आपत्ती व्यवस्थापनाची गरज असल्याचे पटत असूनही राज्यकर्ते ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. मुंबईत अलीकडेच झालेल्या क्लोरिन वायू गळती प्रकरणामुळे ही गरज नव्याने अधोरेखित झाली. वाढत्या औद्योगिकरणामुळे विविध धोके संभवत असून आपले जीवन अधिक अनिश्चित बनत चालले आहे. भविष्यात घडू शकणार्‍या अशा दुर्घटनांशी सामना करण्याची तयारी ठेवली नाही तर कोणताही अनर्थ ओढवू शकेल.

मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर किमान मुख्य शहरांमध्ये तरी आपत्कालीन व्यवस्थापन करू शकणारी टीम असावी आणि येऊ शकणयार्‍या कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यास आपण सज्ज असावे असे ठरले होते. राज्य सरकारनेही याबाबत आश्वासन दिले होते. परंतु आपल्याकडील सरकारी कारभाराची नेमकी कल्पना असलेल्यांना त्याबद्दल शंकाच होती. ही शंका खरी ठरवण्याचे काम प्रशासन चोख बजावते. आपत्कालिन यंत्रणेची गरज केवळ दहशतवादी हल्ल्यासाठीच नव्हे तर इतरही अनेक प्रकारच्या संकटांसाठी लागू शकते. त्यामुळे ही यंत्रणा सज्ज असणे अत्यावश्यक आहे. ही गरज अलीकडे नव्याने दिसून आली. भोपाळ गॅसगळतीची आठवण करून देणारी क्लोरिन गॅस गळती मुंबईतील शिवडी येथे अनुभवायला मिळाली. त्यानंतर दोनच दिवसांनी सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातल्या उरूल घाटात विषारी रसायनाचा टँकर उलटला. हा अपघात एका छोट्या ओढ्याजवळ झाला आणि ते रसायन ओढ्याच्या पाण्यात आणि तिथून कोयना नदीच्या पाण्यात मिसळले गेले. या प्रकाराने कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येऊन हे पाणी कोणीही वापरू नये असे जाहीर करण्यात आले. या अपघातामुळे पोटॅशियम ब्रोमाईड हे रसायन पाण्यात मिसळले. आपले जीवन किती धोकादायक बनत चालले आहे याचे हे एक उदाहरण आहे.

मुंबईत शिवडीला झालेल्या गॅसगळतीने 126 जण बाधित झाले. या प्रकारात एका गोदामात ठेवण्यात आलेली क्लोरीन वायूने भरलेली टाकी गळायला लागली आणि हा वायू हवेत पसरला. गोदामातली ही टाकी 13 वर्षांपासून इथेच

पडली होती. एकच नव्हे तर अशा 105 टाक्या तिथे पडल्या होत्या. त्यातल्या पाच टाक्या भरलेल्या तर शंभर टाक्या रिकाम्या होत्या. एकाच ठिकाणी पडून राहिल्याने या लोखंडी टाक्या गंजल्या होत्या. गंजामुळे त्यातल्या एका टाकीतून क्लोरिन वायूची गळती सुरू झाल्याने एवढा आकांत घडला. दुर्दैवाने आणखी काही टाक्या गळायला लागल्या असत्या तर काय झाले असते याचा विचारही करवत नाही.भोपाळ दुर्घटनेची आठवण करून देणारी ही वायूगळतीही पहाटे तीन वाजता सुरू झाली. आपल्या सगळ्या सुरक्षा व्यवस्था किती सावध असतात हे आपल्याला माहीत आहेच पण अशा मध्यरात्री ही गळती सुरू झाल्यास त्या किती तत्पर असतील हे सांगायला हवे काय? पण सुदैवाने या घटनेत अग्नीशमन दलाचे जवान खरोखरच पहिल्या पाचच मिनिटात तिथे धावले. या गोदामाला जोडूनच सागरी विज्ञान महाविद्यालयाचे वसतिगृह आहे. वसतिगृहातले विद्यार्थी साखरझोपेत होत. काय होतेय हे समजण्याच्या आतच त्यातल्या काही विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. काही विद्यार्थ्यांना तर श्वास घेणेच मुष्कील झाले आणि ती बेशुद्ध पडली. मात्र काही तरी गडबड आहे हे लक्षात आल्यामुळे तिथल्या 500 मुलांना ताबडतोब हलवण्यात आले. मुलामध्ये इतकी घबराट पसरली की काही विद्यार्थी हे वसतिगृह कायमचे सोडून घरी निघून गेले.

या प्रसंगाच्या निमित्तानेही प्रशासन आणि अशा घटनांचा सामना करणारी यंत्रणा किती सावध असते हे लक्षात आले. अग्नीशमन दलाला असे अनेक अनुभव आले. दलाने गॅसची गळती कमी केली हे खरे पण त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांच्याकडे ऐन वेळी लागणारे आग विझवणारे वाहन नव्हते. केवळ एक रुग्णवाहिका होती. एक वाहन होते ते ऐन वेळी आरटीओ तपासणीसाठी नेण्यात आले होते आणि ते दोन-तीन दिवसांपासून तिथेच पडले होते. अशा अपघातात नेमके कोणते रसायन गळत आहे हे कळल्याशिवाय उपाय योजता येणार नव्हता. म्हणून तिथे रसायनतज्ज्ञ ताबडतोब येणे गरजेचे होते. पण, तो काही वेळेवर आला नाही. त्यामुळे अग्नीशमन अधिकार्‍यांनाही काही करता आले नाही आणि रुग्णालयातही डॉक्टरांना उपचाराची दिशा ठरवता आली नाही. हा रसायनतज्ज्ञ पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आला. पण, तोपर्यंत अग्नीशमन अधिकाऱ्यांनाच दवाखान्यात दाखल करण्याची पाळी आली होती. त्यांना तातडीचा उपाय म्हणून अग्नीशमनाच्या गाडीऐवजी सर्व प्रकारच्या संकटांशी मुकाबला करण्यासाठी वापरण्यात येणारी रुग्णवाहिका देण्यात आली होती. त्या रुग्णवाहिकेतून त्यांनाच रुग्णालयात न्यावे लागले. रुग्णालयाचीही अवस्था वाईट होती.जवळच्या रुग्णालयात या वायूबाधितांसाठी कॉट नव्हत्या. विशेष म्हणजे अग्निशमन कर्मचार्‍यांना अशा प्रसंगात काम करताना श्वसनास मदत करणारी उपकरणे आवश्यक असतात ती ऐन वेळी उपलब्ध नव्हती. जी उपलब्ध होती ती परिणामकारक नव्हती. त्यामुळे त्या उपकरणाच्या सहाय्याने केवळ 30 मिनिटच श्वास सुरू ठेवता येत होता. प्रत्यक्षात त्यांना दोन तास या विषारी वायूशी लढावे लागले. त्यामुळे या उपकरणाची क्षमता संपल्यानंतरचा दीड तास त्यांनी कसे काम केले असेल याचा अंदाजसुद्धा करता येत नाही.

क्लोरिनचा प्रभाव कमी करण्यासाठी झटणार्‍या कर्मचार्‍यांनाही या विषारी वायुचा त्रास होऊ लागला. त्यामुळे या कर्मचार्‍यांनाच दवाखान्यात दाखल करावे लागले. या प्रसंगात बरेच माथाडी कामगार बाधित झाले. जवळपासच्या रुग्णालयात नेले असता त्या रुग्णालयातील एकही कॉट त्यांच्यासाठी उपलब्ध झाली नाही. कारण रुग्णालय रुग्णांनी पूर्ण भरलेले होते. त्यातील काही रुग्णांना दाखल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु, अगदी सुरुवातीला आलेले रुग्ण फारसे बाधित न झालेले होते. नंतर आलेल्या रुग्णांना मात्र परत पाठवावे लागले. त्यामुळे रुग्णालय शोधण्यातच या रुग्णांचा वेळ गेला आणि त्यांची अवस्था आणखी वाईट झाली. तरीही यातील काही रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

अशा रितीने वैद्यकीय व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्नीशमन दल आणि

रुग्णालय या सर्व पातळ्यांवर आपण किती बेसावध

आहोत हे पुन्हा एकदा दिसून आले. तेरा वर्षांपर्यंत विषारी वायूची टाकी अशी पडून राहते, ही बेफिकिरी तर वेगळीच. एकूणच सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणार्‍या अशा गोष्टींकडे आपण गांभीर्याने कधी पाहणार हा प्रश्नच आहे. यासाठीही नागरिकांना एखादा लढा द्यावा लागणार आहे का?

(अद्वैत फीचर्स)

— अभय अरविंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..