घशामध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका जिथे वेगळ्या केल्या जातात तेथेच स्वरयंत्र असते. अन्ननलिका आणि श्वासनलिका एका झाकणासारख्या झडपेने वेगळ्या केल्या जातात. त्याला “एपिग्लॉटिस’ असे म्हणतात. स्वरयंत्र या एपिग्लॉटिसच्या खाली आणि “ट्रॅकिआ’ म्हणजे फुफ्फुसांकडून येणाऱ्या श्वासनलिकेच्या भागाच्या वर असते. स्वरयंत्रात दोन पातळ आडव्या पट्ट्या असतात, ज्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. या पट्ट्या पाठीच्या कण्याच्या बाजूला ऍरेटिनॉइड कार्टिलेजला तर पुढील कंठाच्या बाजूस थॉयराइड कार्टिलेजला जोडलेल्या असतात. दोन्ही बाजूंनी त्या स्वरयंत्राच्या आतल्या भिंतींना स्नायूंद्वारे जोडलेल्या असतात. आणि त्यांचा मधला भाग मोकळा असतो. प्रामुख्याने श्लेष्मल पेशींनी बनलेल्या या पट्ट्यांमध्ये काही स्नायूतंतूही असतात. या पट्ट्यांची कंपने “व्हेगस’ चंतातंतूंद्वारे नियंत्रित केली जातात. त्यांना होणारा रक्ताचा पुरवठा अगदीच कमी असल्याने त्या मोतिया पांढऱ्या रंगाच्या दिसतात. हवेच्या योग्य दाबाने या पट्ट्यांची वेगवेगळी कंपने निर्माण केली जातात, त्यामुळे वेगवेगळे स्वर निर्माण होतात. हवेच्या दाबामुळे दूर ढकलल्या गेलेल्या या पट्ट्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे पुन्हा एकत्र येतात आणि हवेच्या दाबाने पुन्हा दूर ढकलल्या जातात. हे चक्र सतत सुरू राहते आणि आवाज निर्माण होतो. प्रत्येकाच्या आवाजाची प्रत ही त्याच्या स्वरयंत्रातील या दोन पट्ट्यांची लांबी, जाडी, आकार, त्यावरील ताण यावर अवलंबून असते.
आवाज कुणाचा?
आपल्या घशात असलेल्या स्वरयंत्रामधल्या स्नायूंच्या दोन पट्ट्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. घशातून निर्माण झालेला ध्वनी जीभ, जबडा, टाळू, ओठ यांच्या प्रभावामुळे बदलत जातो आणि आपल्या तोंडून “आवाज’ बाहेर पडतो. बोलाण्यासाठी, गाण्यासाठी, हसण्यासाठी, रडण्यासाठी, ओरडण्यासाठी या आवाजाचा वापर केला जातो. या आवाजातील चढ-उतारांवरून क्रोध, आश्चर्य, आनंद यासारख्या भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. तर त्याचा प्रभावी वापर करून गायक संगीत निर्माण करतात. पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांच्या आवाजाची कंप्रता सर्वसाधारणपणे १२५ हर्टझ् एवढी असते. स्त्रियांच्या आवाजाची कंप्रता २१० हर्टझ् तर मुलांच्या आवाजाची कंप्रता ३०० हर्टझ् असते.
आवाज जपण्यासाठी काय करावे.
चरकसंहितेत दहा कण्ठ्य द्रव्ये सांगितलेली आहेत. कण्ठ्य म्हणजे कंठाला, घशाला हितकर. अनंतमूळ, उसाचे मूळ, ज्येष्ठमध, पिंपळी, मनुका, विदारीकंद, कायफळ, हंसपादी, बृहती, कंटकारी ही द्रव्ये स्वराला हितकर असतात. प्रकृृतीनुरूप व दोषाच्या असंतुलनानुसार या द्रव्यांचा काढा, चूर्ण करून किंवा या द्रव्यांनी सिद्ध तेल वा तूप बनवून वापरणे आवाजासाठी हितकर असते. कण्ठ्य द्रव्यांपासून “संतुलन स्वरित’सारख्या गोळ्या तयार करून ठेवता येतात व या गोळ्या गवई, प्रवचनकार, वक्ते यांनी नित्य सेवन केल्यास आवाज उत्तम ठेवण्यास मदत मिळते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. श्री बालाजी तांबे
Leave a Reply