तरुण पिढी आपल्या प्रकृतिस्वास्थ्याविषयी पूर्वीच्या पिढीपेक्षाही चांगलीच सजग झालेली दिसते. विविध वर्तमानपत्रं, मासिकं, पुरवण्यांद्वारे अनेक तज्ज्ञ, व्हॉट्सअप, फेसबुक, या सारखी सोशल मिडीया साधने, डॉक्टर, वैद्य, डाएटिशियन्स लोकांना जागरूक करत असतात. आयुर्वेद या उपचारपद्धतीत मानवी शरीर आणि त्याचा मानसिक स्वास्थ्याशी असलेला दृढ संबंध यांचा विचार करतं आणि प्राथमिकतेने रोग होऊच नयेत यावर भर दिला जातो. त्यातूनही जर कुठला रोग बळावला, तर त्या रोगाला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न आयुर्वेद करतं. पूर्वी लोकांचं आरोग्याकडे लक्ष असायचं, निसर्गाच्या सहवासात आणि शुद्ध अन्नामुळे लोकांचं आरोग्य वर्षानुर्वष चांगलं राहायचं. वृद्धत्व आल्याशिवाय सहसा कोणी आजारी पडायचं नाही, पण आता हे चित्रच पालटलं आहे. त्या वेळी वरचं खाणं म्हणून खजूर, कुरमुरे व बिस्किटांशिवाय खाद्यपदार्थ नव्हते. हल्लीच्या ‘जंक फूड’नं अबालवृद्धांनाही मोहिनी घातली आहे. या पदार्थाचं वारंवार किंवा प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे माणसाला विविध रोगांनी घेरलं आहे.
आयुर्वेदीक औषधांविषयी
महासुदर्शन काढाय/चूर्ण – कोणत्याही तापावर, सर्दीवर, भूकेसाठी एक उत्तम औषध. माझ्या असं निदर्शनास आलं की, अनेकांना याचं नावही माहीत नाही. पण हट्टी तापही यानं आटोक्यात येतो. प्रत्येक घरात संग्रही असावं, असं हे औषध आहे. लहान मुलांनाही उपयोगी आहे.
कुमारीआसव कुमारी म्हणजे कोरफड. कोरफडीचा महत्त्वाचा गुणधर्म कफ (दीर्घकाळ टिकलेला कफ) पातळ करणं. यकृताचं आरोग्य उत्तम ठेवून त्याचं संरक्षण करतं. कावीळ होण्यास प्रतिबंधात्मक तसंच मासिक पाळीशी संबंधित हार्मोन्स (संप्रेरके) योग्य प्रमाणात स्र्वण्यातही कुमारीआसव खूपच गुणकारी आहे. याच्या नावात जरी कुमारी हा शब्द असला तरी स्त्रियांनी व मुलांनी वेगवेगळ्या कारणांसाठी हे जरूर सेवन करावं. यामध्ये लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी असे प्रकार आहेत.
त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण म्हणजे हरडा + बेहडा + आवळा यांचं मिश्रण. हे चूर्ण बाजारात तयार मिळतं. जर बद्धकोष्ठता असेल तर गरम (कोमट) पाण्यातून रात्री झोपतेवेळी एक चमचा घेतल्यास सकाळी पोट साफ होतं. प्रत्येकानं आपल्या तब्येतीनुसार प्रमाण ठरवावं. याचा आणखी एक उपयोग माझ्या अनुभवास आला, तो म्हणजे आपल्या दंतमंजनात हे एक चमचा मिसळलं व ही पावडर दातांना लावली तर हिरडय़ा व दात खरोखरच मजबूत होतात. याचा अनुभव अनेकांना आला आहे. हे नित्य वापरावं.
कडुनिंब या झाडाचे गुण बहुतेकांना माहीत आहेत. यापासून पंचनिंब चूर्ण हे औषध तयार करतात. अंगावर सुटलेली खाज व पुरळ जाण्यास तसंच रक्तशुद्धीस याचा उपयोग होतो. रोजच्या पिण्याच्या पाण्यात कडुनिंबाची पाच पानं उकळून ते पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते. या औषधांशिवाय सितोपलादी चूर्ण, सुवर्णमालिनी वसंत, सूतशेखर, सारिवाद्यासव ही औषधं रोगपरत्वे वापरण्यासारखी आहेत. मात्र सर्व आयुर्वेदिक औषधं आरोग्यास हानिकारक नसली, तरी उपचारांदरम्यान त्यांचं घ्यायचं प्रमाण हे वैद्यांच्या सल्ल्यानंच घेणं योग्य. सुंठ, मेथी, अनंतमूळ (सारिवा), द्राक्षं इ. अनेक फळं/वनस्पतींचा वापरही आयुर्वेदात प्रामुख्यानं केला जातो. जसं द्राक्षांपासून बनवण्यात येणारं द्राक्षासव तर आवळ्यापासून तयार होणारं च्यवनप्राश हे शक्तिवर्धक कल्प, आवळा पावडर यांसारखी रसायनमुक्त औषधं ही वरदानच ठरणारी आहेत. आपण काळजीपूर्वक अभ्यास केल्यास आयुर्वेदातील वा अन्य शास्त्रांतील आपल्याच अवती-भवती असणा-या अनेक गुणकारी औषधांचा आपणास परिचय होईल. शेवटी ‘सर्वे: सन्तु निरामय:’ याच प्रार्थनेतून सर्वानाच शारीरिक आणि मानसिकही सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply