कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात जन्मलेल्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला.व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा मा.जयश्रीजींचा प्रवास सुरू झाला व पुढे जाऊन जयश्री गडकर नावाचा एक अलौकिक इतिहास आकाराला आला. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो, पण अशा केवळ चित्रपटांच्या नावानेच त्यांचे मोठेपण मोजणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. त्यांना त्या अण्णा म्हणत. हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा – लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश् नांना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. ‘सांगत्ये ऐका’, ‘ सवाल माझा ऐका’, ‘ एक गाव बारा भानगडी ’ यांसारखे तमाशापट, ‘ मानिनी’ , वैशाख-वणवा ’ सारखे सोज्वळ चित्रपट तर ‘ मोहित्यांची मंजुळा’ सारखे ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका केल्या होत्या. अभिनय क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००३ सालचा व्ही. शांताराम पुरस्कार, विविध चित्रपटांसाठी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. मराठी चित्रपट महामंडळातर्फेही त्यांना चित्रभूषण ‘ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. अभिनेते बाळ धुरी यांची ती पत्नी होती. मा.जयश्री गडकर यांचे २९ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयश्री गडकर यांची गाणी.
‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’
‘गेला हटकून बाई भरल्या बाजारात’
‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’
‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं’
‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’
‘माळ्याच्या मळ्यामदि पाटाचं पानी जातं’
ऐरनीच्या देवा तुला ठिनगी ठिनगी न्हाऊ दे’
‘कशी गौळण राधा बावरली’
‘चढाओढीनं चढवीत होते’
‘नाचू किती लाजू किती कंबर लचकली’
Leave a Reply