परिक्षा शुल्क भरायलाही पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडून गावाकडे परतणारी शेतकऱ्याची पोरं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी महाविद्यालयांपुढे रांगा लावून उभे असलेले विद्यार्थी असे विरोधाभासी चित्र सध्या दिसत आहे. कधी काळी डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न पाहणारे डोळे मातीत राबवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमाकडे कसे काय वळू लागले? प्रवेश फेरीसाठी ९४ टक्के गुणांचा कट ऑफ पर्यंत कशी पोहचली? आमची माती आमचे विद्यार्थी हे चित्र कसे काय दिसायला लागले ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे.
राज्यातील १७३ कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी रांगा लागल्या. ६२ हजार अर्ज आले. पहिल्या फेरीचे कट ऑफ गुण होते ९४ टक्के. दुसरीकडे अभियांत्रीकीच्या राज्यात किमान ६० हजार जागा रिक्त राहील्या आहेत. बीएड, डीएड महाविद्यालये बंद पडत आहेत. तर फार्मसीसारख्या विषयाकडे विद्यार्थी वळण्यास तयार नाहीत. व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थी पाठ वळवत असताना कृषी अभ्यासक्रमाला सोन्याचे दिवस आलेले दिसतात.
कृषी क्षेत्रात करियरच्या संधी मागील काही वर्षात झपाट्याने वाढत आहेत असे दिसून येते. पूर्वी बिएस्सी अॅग्री, डिप्लोमा साठी प्रवेश घेणारा विद्यार्थी ग्रामीण भागातलाच असायचा. घरी शेतीवाडी असल्याने सातबारा दाखवून कमी गुणातही प्रवेश मिळायचा. शहरी पोरे शेतकरी महाविद्यालयाकडे पहायची सुध्दा नाहीत.अगदी चार पाच वर्षापर्यंत शेतकी महाविद्यालयेही विद्यार्थ्यांची वाट पहात असत. कारण शेतकर्याचा मुलगाही मास्तर होण्याला जास्त प्राधान्य देऊ लागलेला. लाखा लाखाने डोनेशन भरुन बीएड, डीएड करायचे. त्यानंतरही शिक्षक म्हणून एखाद्या शाळेवर चिकटण्यासाठी जमीनीचा तुकडा विकावा लागायचा. हेही करण्यास ही मुले तयार होती. काळाच्या ओघात शिक्षक भरतीच बंद झाल्याने हाही मार्ग खुंटला. कृषी महाविद्यालयांचा चांगला पर्याय समोर आल्यानंतर सहाजिकच ग्रामीणच नाही तर शहरीमुलेही या अभ्यासक्रमाकडे वळू लागली. विशेष म्हणजे पहिल्या वर्षापासूनच स्पर्धा परिक्षेची तयारी करायची. शेतातल्या या पायवाटेने सरकारी नोकरीत शिरायचे असा उद्देशही साध्य होत होता. या परिस्थितीचा फायदा घेणार नाहीत ते शिक्षण सम्राट कसले. बीएडची दुकाने बंद करुन त्यांनी शेतकरी महाविद्यालयाची उघडली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी आघाडीवर होते. कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये आपल्याच महाविद्यालयातील विद्याथ्र्यांची कंत्राटी भरती त्यांनी करुन त्यांनी कमाईचा दुहेरी मार्ग यशस्वी केला.
असे असले तरी कृषी क्षेत्रातील करियरच्या विविध संधीमुळे डॉक्टर, इंजिनियरच व्हायचे ही मानसिकता काही प्रमाणात बदलत आहे हेही काही कमी नाही. कृषी अभ्यासक्रमाच्या विविध शाखा सुरु होत आहेत. प्रक्रिया उद्योग, माती शास्त्र, सिंचन, अर्थशास्त्र, हरितगृह, पूरक उद्योग, बाजार व्यवस्थापन, संधोधन या शिवाय पदव्युत्तरनंतर अभियांत्रिकीच्या अनेक संधी निर्माण झाल्याने शेतकीचे शिक्षण घेणे म्हणजे प्रत्यक्ष नांगर हातात धरुन उत्पन्न वाढवण्यासाठी शेतात विविध प्रयोग करणे एवढ्या पुरतेच हे क्षेत्र मर्यादित राहीलेले नाही. किटकनाशके, खते, बियाणे, अवजारे तयार करण्याNया वंâपन्यांमधून तसेच रुरल फायनान्स, बँका मधूनही कृषी पदवीधाराकांना मागणी असल्याने मातीशी प्रत्यक्ष नाते नसलेल्यांनाही कृषी अभ्यासक्रम खुणावू लागले आहेत.
तथापी दुष्काळामुळे पाण्याचे दुर्भिक्ष, शेतमालाला कवडीमोल भाव, प्रक्रियेत उतरण्याची मानसिकता नसलेला शेतकरी अशी अनेक आव्हाने शेतीत उभी असताना कृषी अभ्यासक्रमांकडे विद्याथ्र्यांचा ओढा हे चित्र आशादायी आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नक्कीच नाही असेच द्यावे लागेल. शेतीचे प्रगत तंत्रज्ञान शिकून घेऊन त्याचा उपयोग स्वतःच्या शेतात करणारे विद्यार्थी बोटावर मोजण्याएवढेच आहेत. प्रत्येकाला या क्षेत्रातल्या नोकर्या खुणावत आहेत. नोकरीचा उपयोग शेतीच्या विकासासाठी करतील तर तसेही नाही.. बीएस्सी अॅग्री करुन सरकारी नोकरी मिळवणाऱ्यानाही कार्यालयातील खुर्ची सोडवत नाही. कृषी विस्तार कार्यक्रमात धडाडीने काम करण्यापेक्षा विस्ताराच्या योजना कागदावर राबवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. याला काही अपवाद असले तरी कृषी महाविद्यालयांमधील विद्याथ्र्यांची संख्या पाहता अशा कर्मचाऱ्याचे प्रमाण व्यस्तच दिसते. जोपर्यंत पुस्तकात शिकलेले शेतीचे धडे मातीत हात घालून प्रत्यक्षात येणार नाहीत तोपर्यंत मातीत उतरलेल्या या गुणवंतांना काही किंमत मिळणार नाही.
pradnyadeshpande2014@gmail.com
Leave a Reply