राम जोशी (१७६२-१८१२) –
पेशवाईअखेरचा एक मराठी कवि व प्रख्यात लावणीकार.
हा सोलापूरचा राहाणारा यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण व तेथील वृत्त्यंशी जोशी होत. यानें बैराग्यपर व शृंगारपर उत्कृष्ट लावण्या केल्या आहेत.
छंद:शास्त्रावर व ‘छंदोमंजरी’ नांवाचा त्याचा एक ग्रंथ आहे. याखेरीज मदालसाचंपू व इतर खंडकाव्यें यानें केली आहेत.
मोरोपंताच्या आर्या यानेंच विशेषत: प्रसिद्धीस आणल्या. हा त्या कालांतील लावण्या व पवाडे करणारांचा ‘तुरा’ होता.
याचें सर्व चरित्र विशेषच होतें. स्वभाव, बुद्धीची तीव्रता विद्वत्ता, आयुष्यक्रम, छंदफंद हे सर्व विशेषच होते.
याच्या बापाचें नांव जगन्नाथ. जोशीबुवाचा वडील भाऊ मुग्दल हा नांवाजलेला व्युत्पन्न शास्त्री व पुराणिक होता.
बुवा लहानपणीं सारा वेळ तमासगिरांच्या बैठकींत बसत व लावण्या म्हणत. याबद्दल भावानें कानउघाडणी केल्यामुळें घरून निघून हे तुळजापुराकडे गेले. तिकडे त्यांनीं काव्य व व्याकरणाचा अभ्यास केला व कुशाग्र बुद्धीमुळें त्यांत पारंगतता संपादली, पण पुन्हां तमाशांचा छंद धरला. सोलापुरास धोंडी शाहीर याच्या आखाडयांत बुवा प्रथम शिरले. विद्वत्तोमुळें यांच्या लावण्या गोड, रसाळ व प्रौढ असत म्हणून त्या लोकांनां फार आवडूं लागल्या. त्यांच्या लावण्यांत ते आपलें नांव व्यंकटपति, राम, कविराय असें घालीत.
पुढें यांच्यावर फिदा होऊन बया नांवाची एक बाई यांच्याजवळ मैत्रीण म्हणून अखेरपर्यत राहिली. बोवांची कवनें ही म्हणून दाखवी. बया प्रमाणेंच चिमा म्हणून दुसरी बाई बुवांजवळ होती. त्यांच्या रहाणीचा थाट मोठा होता. मोरोपंत व चिंतामणराव पटवर्धन सांगलीकर हे बुवांच्या लावण्या आवडीनें ऐकत. पुढें वृद्धपणी हे तमाशे सोडून कथा करूं लागले, त्यांतहि त्यानीं नांव कमावलें.
यांच्या सर्व कवनांत त्यांच्या ”छेकापन्हुती” ची फार प्रसिद्धि आहे.
बुवा हे पुणें येथें शके १७३० च्या गुढीपाडव्यास वारले.
— विवेक जोशी
Leave a Reply