आमीर खानचा ‘दंगल’ चित्रपट काल बघीतला.
आमीर खानचा हा चित्रपट कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाराच ठरणार आहे. ‘म्हारी छोरियाँ छोरो से कम हैं के?’ असा प्रश्न पुरुष प्रधान व्यवस्थेला विचारत एक बाप आपल्या मुलींना कुस्तीपटू म्हणून कसं घडवतो आणि त्याच्या पोरीही आखाड्यात कशी ‘दंगल’ करतात, याची ही कथा मनोरंजक आहेच, व प्रेरणादायी ही आहे. कुस्तीपटू महावीर सिग फोगट यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उतरविण्यासाठी आमीर खान यांनी नेहमी प्रमाणे खूप मेहनत घेतली आहे. आपल्या मुलींनी उत्तम असे कुस्तीपटू बनावे यासाठी एक पिता आपल्या मुलींशी कठोरपणे वागतो, व आपल्या दोन्ही मुलींना कसे घडवतो यांचे सुंदर चित्रण आमीर खान यांनी मांडले आहे. हरियाणातील एका छोट्या गावात राहणाऱ्या महावीर सिंह फोगट (आमीर खान) यांची ही कथा आहे. फोगट हे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेते आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून द्यायचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं असतं. परंतु, घरच्या हलाखीमुळे कुस्तीचा आखाडा सोडून त्यांना नोकरी करावी लागते. देशासाठी पदक न जिंकता आल्याची सल त्यांच्या मनाला सतत बोचत असते. त्यामुळे आपल्याला एक मुलगा व्हावा आणि त्यानं आपलं हे स्वप्न पूर्ण करावं, अशी त्यांची तीव्र इच्छा असते. मात्र, त्यांना चौथीही मुलगीच होते. आपलं स्वप्न अधुरंच राहिल्यानं ते काहीसे निराश होतात. अशातच, एक दिवस त्यांच्या दोन मुली – गीता आणि बबिता त्यांची छेड काढणाऱ्या शेजारच्या दोन पोरांची चांगलीच धुलाई करून घरी येतात. त्यांचा हा ‘पराक्रम’ पाहून महावीर फोगट यांच्या आशा पल्लवित होतात. मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नसल्याची जाणीव त्यांना होते आणि मग सुरू होतो एक जिगरबाज प्रवास. मुलींना कुस्तीपटू म्हणून घडवण्याचा महावीर फोगट यांचा निर्धार पक्का असतो, मुलीही सज्ज असतात, पण समाज – संस्कृतीचा सामना करत त्या सगळ्या आव्हानांना कसं अस्मान दाखवतात, हे पाहणं नक्कीच रंजक आहे.
पटकथा, संवाद आणि चित्रण सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. अनेक दृश्यं पाहताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. अभिनयाबद्दल बोलायचं तर, आमीर खानने ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ पणा परत सिध्द केला आहे. आमीर खाननं महावीर फोगट यांच्या भूमिकेत कमाल केली आहे. वयाप्रमाणं बदलत जाणारी देहयष्टी आणि देहबोली केवळ आमीरच साकारू शकतो. मुलींवर जिवापाड प्रेम करणारा मात्र आपलं स्वप्न साकार होऊ शकणार नाही म्हणून निराश झालेला बाप व नंतर मुलींमध्येच आपलं स्वप्न पाहात मेहनत घेणारा प्रशिक्षक त्यानं जबरदस्त साकारला आहे. महावीरचे तरुणपणातील कुस्तीचे प्रसंग (सिक्स्पॅक ऍब्ज) ते उतारवयात वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट हे सर्व मोठं आव्हान त्यांनी सहज पेललं आहे. तो सिनेमाभर इतका सहज वावरतो की तो अभिनय करतोय असं वाटतंच नाही. त्याशिवाय, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम आणि सुहानी भटनागर या चार मुलींनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराना आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. ज्यांना कुस्ती म्हणजे काय हे पण माहित नाही, त्यांनाही हा सिनेमा आवडेल, अशी मांडणी दिग्दर्शकाने केलीय. सिनेमा कुठेच कंटाळवाणा होत नाही. उलट, कुस्तीचा थरार सिनेप्रेमींच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. पार्श्वसंगीत त्यात अधिकच भर घालतं. तारे जमिन पर, गजिनी, ३ इडियट्स, धूम ३, पीके यांसारखे चित्रपट देणा-या आमीर खानच्या यशात आता दंगलचा उल्लेख हा कायम उंचावत राहणार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply