किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली
पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा
झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं
नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं
तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार
फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद
मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त
गांधारी.
भीष्मानं विदुराला सांगितलं- या कुळाची संतान-परंपरा वाढविण्यासाठी धृतराष्ट्र आणि पंडूचा विवाह करणं आवश्यक आहे. त्यापैकी
कुंतीचं स्वयंवर मांडलं आणि तिनं पंडूच्या गळ्यात वरमाला घातली. प्रश्न उरला धृतराष्ट्राचा. कारण तो जन्मांध. डोळसपणे कुणीही
राजकन्या स्वयंवरात धृतराष्ट्राच्या गळ्यात वरमाला घालणार नव्हती. आणि धृतराष्ट्र स्वत: कुठल्याच स्वयंवरात हजर राहू
शकणार नव्हता. धृतराष्ट्र, पंडू यांच्या मातांनाही भीष्मराजानंच बाहुबलावर कुरूवंशाच्या स्त्रीवर्गात आणून सोडलं होतं. आता
पुतण्यासाठी वधू शोधण्याचं कामही वडीलधारेपणानं त्यानंच करायचं होतं. गांधारराज सुबलाची कन्या गांधारी सुस्वरूप तर
होतीच, (राजस्त्तिया सुस्वरूप असतच.) त्याहीपेक्षा तिनं शंकराकडून शंभर पुत्र होण्याचा वर मिळवला होता. तेव्हा तीच पुत्रवधू
म्हणून आणण्यास योग्य ठरली.
पहिला संकेत- पुत्रवधू कशासाठी आणायची? संतान-परंपरा वाढविण्यासाठी! वधू- संशोधन कुणी करायचं? वडीलधार्यांनी करायचं.
वडीलधार्यांनी कुलशील, उच्च-नीचता, फायदा-तोटा याचा सारासार विचार करून ठरवलेल्या विवाहात वधू-वरांनी मोडता घालायचा
नाही. आता उपवरांनी या नियमाचं उल्लंघन करण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. एकपत्नीव्रत पाळण्याचं त्यांच्यावर बंधन नव्हतं
आणि विवाहबाह्य संबंध न ठेवण्याचा जोराही नव्हता. गांधारीकरवी शंभर औरस पुत्र मिळवूनही धृतराष्ट्राला दासीपुत्र होतेच. ज्या
पार्थासाठी द्रौपदीनं पाच पती स्वीकारले, त्या पार्थानं तीर्थाटन करताना जाईल तिथे एक पत्नी पटकावली होती. ज्या पाच भावांत
दुही माजू नये म्हणून द्रौपदीनं बहुपतित्वाचा कलंक मिरवला, त्या उर्वरित भावांनीही अन्य विवाह केलेच होते. राजकीय डावपेच
म्हणून एवढी सगळी मुभा असताना वडीलधार्यांना विरोध करण्याचं कारणच नव्हतं. ही झाली राजपुरुषांची कथा. ‘राजा डोले,
प्रजा हाले’ या न्यायानं प्रजाही बहुपत्नीत्वाची प्रथा पाळत होतीच.
गांधारीची (किबहुना कुठल्याच स्त्रीची) अशी कुठलीच सोय नव्हती आणि सुटकाही नव्हती. स्त्रीला काही मन नावाची चीज असते,
आवड- निवड असते, रतिसुखाच्या तिच्याही काही कल्पना असतात- ही कल्पनाच मुळी अनादि कालापासून भारतीयांना मान्य
नाही. पुरुषांना नाहीच नाही. आणि स्त्तियांच्या मनावर त्यागाची मुद्रा एवढी खोल ठसवली आहे की, त्यांना त्यागातच धन्यता
वाटते. कलियुगातही. भीष्माकडून गांधारीचा धृतराष्ट्राशी विवाहाचा प्रस्ताव गांधारराज सुबलाकडे आला. गांधारराज सुबल थोडा
काळ विचारात पडला. गांगरला. आपल्या चित्रासारख्या सुरेख, धर्मज्ञ मुलीला आंधळ्याच्या गळ्यात बांधायचं? गांगरण्यासारखीच
गोष्ट होती. पण हे गांगरणं काही क्षणच. मुलीच्या मनाचा विचारही क्षणभरच. कुरूकुलाचं वर्चस्व, सार्वभौमत्व, श्रेष्ठत्व, परंपरा,
प्रतिष्ठा या सगळ्यांचा विचार मुलीच्या मनाच्या विचारापेक्षा वरचढ ठरला. भीष्मासारख्या धुरंधराचा प्रस्ताव नाकारणं म्हणजे वैर
पत्करणं. तेही एका बलाढ्य राजाशी. ते शक्य नव्हतं.
अर्थातच मग सारवासारव सुरू झाली-आपल्याच निर्णयाची. काय कमी आहे धृतराष्ट्रात- एक त्याचं आंधळेपण सोडल्यास? एवढ्या
मोठ्या बलाढ्य राजाची सम्राज्ञी होईल आपली मुलगी. आणखी काय हवं? आजही मुलीचं लग्न ठरवताना घराणं, सुबत्ता, ऐश्वर्य,
प्रतिष्ठा या गोष्टी मुलाच्या एखाद्या व्यंगावर पांघरूण घालण्यास पुरेशा होतातच. मुलीची नावड मग गौण ठरते. तोच तो युक्तिवाद
कुरघोडी करतो. काय कमी आहे त्या स्थळात? नाकारण्याजोगं आहेच काय? सुबत्ता, घराणं, ऐश्वर्य एवढ्या सगळ्या जमेच्या बाजू
असल्यावर एखादं वैगुण्य नजरेआड करायला काहीच हरकत नसते. संतान-परंपरा चालवणं, घराण्याचं नाव पुढे चालवणारा निर्माण
करणं- हीच तर विवाहात अभिप्रेत फलश्रुती आहे. स्त्रीचं जीवितकार्यही तेच आहे- कुटुंबसंस्था वृद्धिगत करणं. मुलीला सहचर
तिच्या कल्पनेतला हवा असेल, स्त्री म्हणजे फक्त जननयंत्र नव्हे- ही कल्पनाच रुजलेली नाही. जननक्षमता हीच स्त्रीच्या
अस्तित्वाची एकमेव खूण.
गांधारी… तिची काय प्रतिक्रीया होती यावर? गांधारीला जेव्हा समजलं- आपल्या पिताश्रींनी नियुक्त केलेला आपला वर जन्मांध
आहे, तेव्हा तिनं काय केलं? एक मोठी रेशमी पट्टी घेतली, तिच्या असंख्य घड्या घालून त्यातून प्रकाशाची फटही येणार नाही
याची दक्षता घेतली आणि ती पट्टी आपल्या डोळ्यांवर कायमची चढवली. त्याचं दिलेलं स्पष्टीकरण काय, तर पतीचं वैगुण्य
नजरेआड करायचं. दृष्टीआड सृष्टी किवा डोळ्यावर कातडं ओढणं- या म्हणी गांधारीवरूनच रूढ झाल्या असाव्यात.
रोजच्या रोज पतीचं वैगुण्य नजरेस पडलं तर निर्धोक संसार करणं अशक्य होईल. उघड्या डोळ्यांनी आपल्याच आयुष्याची
विटंबना कशाला बघायची? शिवाय उघड्या डोळ्यांना चांगल्या गोष्टींची भुरळ पडणारच नाही, याची काय खात्री द्यावी? परपुरुषानं
कपटानं अहिल्येला स्पर्श केला
तर गौतमानं तिची शिळा केली. परपुरुषाची अभिलाषा एक क्षण मनातल्या मनात तरळली तर
रेणुकेला पुत्राकडून मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागली. पातिव्रत्याचे हे मानदंड गांधारीच्या मनावर ठसलेले. विवाहवेदीवर चढताना
विवाह सोहळ्याला हजर असलेल्या एखाद्या युवराजावर मन गेलं तर? आजवरच्या धर्मपरायणतेचा क्षणार्धात भंग होईल.
गांधारीनं भारतीय स्त्रीला वारसा दिला- पतीचं वैगुण्य नजरेआड करण्याचा! संसाराचा गाडा सुरळीत चालवायचा असेल,
वंशविस्ताराचा वसा घ्यायचा असेल, कुटुंबसंस्था अबाधित राखायची असेल तर नवतर्याचे दुर्गुण, पतन, स्खलन नजरेआड करा.
डोळ्यावर कातडं ओढा. तरच स्त्रीला पतिपरायण बनून धर्मज्ञ, साध्वी वगैरे बनता येईल. आज पाश्चात्त्यांच्या प्रभावाखाली
स्त्रीसमाज आल्यामुळे कुटुंबसंस्था धोक्यात येऊ घातली आहे. कुटुंबसंस्था अबाधित राखण्यासाठी, स्वैराचार रोखण्यासाठी आम्हाला
हव्या आहेत फक्त गांधारी.
गांधारी आणि कुंती दोघी जावा. गांधारी थोरली, पण मानसन्मान कुंतीचा. कारण पंडू राजा. थोरला असून धृतराष्ट्राला दुय्यम
स्थान पत्करावं लागलं. कारण त्याचं जन्मांधपण. गांधीराला आता आपली सरशी व्हावीसं वाटत होतं. थोरला युवराज आपल्या
पोटी यावा, ही आस लावून गांधारी बसली होती. कुंतीला आपल्या आधी सुलक्षणी पुत्र झाला, हे ऐकून गांधारी एवढी वैफल्यग्रस्त
झाली की, तिनं आपल्या पोटावर आघात करून मांसखंडाला जन्म दिला. आपलं नैराश्य तिनं व्यासमहर्षींपाशी उघड केलं.
व्यासमहर्षींच्या कृपेनं तिला शंभर पुत्र आणि एका कन्येचा लाभ झाला. पण कुंतीवर मात करण्याची इच्छा पुरी झाली नाही ती
नाहीच. स्त्रीचा सन्मान, स्त्रीची प्रतिष्ठा अशी पुरुषावर अवलंबून. पती थोरला असेल तर ती पट्टराणी, आणि पुत्र थोरला असेल तर
ती राजमाता! पुरुषाच्या प्रतिष्ठेविना स्त्रीचं अस्तित्वच असं गौण. तेव्हा पुरुषाच्या अस्मितेत आपली अस्मिता शोधण्यासाठी
आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.
गांधारी विवेकी होती, धर्मपरायण होती, हे तर खरंच. तिचं दुर्दैव असं की, तिचे पुत्र कुलांगार निघाले. सगळ्यात थोरला तर
केवळ अधर्मपरायण. वैध मार्गानं आपल्याला हवं ते प्राप्त होत नाही म्हटल्यावर बिनदिक्कत अवैध मार्ग पत्करणारा. एखाद्याची
वृत्तीच तशी असते. आसपास असंख्य धर्मपरायण असून याला जवळचा वाटला सगळी कपटकारस्थानं करण्यात तरबेज असलेला
शकुनीमामा. त्याच्या मदतीनं भरसभेत द्रौपदीची विटंबना करून सूड घेतल्याचं समाधान मिरवणारा. त्याची कृष्णकारस्थानं
गांधारीनं उघड्या कानांनी ऐकली तेव्हा तिला वाटलं असेल- डोळे बंद करता आले, तसे कानही बंद करता आले तर!
द्युताच्या एका संकट-परंपरेतून सुटले म्हटल्यावर दुर्योधनानं धृतराष्ट्राला पुन्हा युधिष्ठिराला द्युतासाठी पाचारण करण्यास भाग
पाडल्याचं गांधारीला कळलं. न राहवून गांधारीनं धृतराष्ट्राला बोलावून घेतलं. आपला पुत्र आणि त्याचा मामा अधर्म माजवत
आहेत, त्यांना वेळीच आवर घातला नाही तर हा कुलांगार पुत्र कुळाचा संहार ओढवून घेईल. याच्या जन्मवेळी गाढवं, गिधाडं
ओरडली तेव्हाच विदुरानं सांगितलं होतं- हा पोर कुळाचा नाश करील. राजा, याचा तू त्याग कर. पुत्रप्रेमामुळे ते शक्य झालं
नाही. आता वयात आलेल्या पुत्राच्या अनिर्बंध वागण्याला वेळीच लगाम घातला नाही तर तो पुढे कुणालाच जुमानणार नाही.
त्यावेळेस धृतराष्ट्रानं गांधारीला सांगितलं की, सबंध कुळाचा संहार झाला तरी चालेल, मी माझ्या पुत्राच्या महत्त्वाकांक्षेला विरोध
करू शकत नाही. खरी गोष्ट अशी होती की, उभं आयुष्य पंडूविषयी मनात असलेल्या असंतोषाला पुत्रानं वाचा फोडली होती.
आपण थोरले असून आपल्या जन्मांधपणामुळे कायम पंडूचा उदो उदो होतो, याची कायम मनात वागवलेली असूया पुत्राच्या
महत्त्वाकांक्षेतून उग्ररूप धारण करून बाहेर पडत होती. धृतराष्ट्राचा पुत्राला मूक पाठिंबा होता.
तोच पुत्र बेफाम झाला. भीष्म, द्रोण, श्रीकृष्ण- कुणालाच जुमानीना. त्याचा उद्दामपणा एवढा शिगेला पोहोचला की, शकुनीमामाशी
गुप्त कारस्थान करून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला कैद करण्याचा घाट त्यानं घातला आणि श्रीकृष्णाला विराट दर्शन घडवावं लागलं.
कुलसंहार झाला तरी चालेल- म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष कुलसंहार समोर ठाकलेला दिसणं- वेगळं. पहिल्यात- आपला पुत्र
यशस्वी होऊन त्याच्या रूपानं आपली महत्त्वाकांक्षा पुरी होऊ शकेल, ही अभिलाषा होती. भावा-भावांतलं अटळ युद्ध आणि सर्व
सज्जनांचा पांडवांना पाठिबा आणि पांडवाचा पक्ष सत्यपक्ष- असा तिढा उभा राहिल्यावर आजपर्यंत असलेला ‘माझा पुत्र’ गांधारीचा
झाला. गांधारीला बोलावून धृतराष्ट्रानं सांगितलं- तुझा पुत्र कुणालाच आवरत नाही. त्याला दोन समजुतीच्या गोष्टी सांगून तूच
मार्गावर आण. मुलगा कुलांगार निघाला तर आईचं वळण काढण्याचा वसा असा अनादिकालापासून आपण मिरवत आलो आहोत.
आजही यशस्वी पुत्र बापाच्या वळणावर गेलेला असतो आणि कुलांगाराला आईचं वळण नसतं. अनादिकालापासून स्त्रीरूपात
आम्हाला हवी आहे फक्त गांधारी.
पतीचं वैगुण्य एकदा असं आत्मसात केल्यावर त्यानं निर्माण केलेले सगळे भोगही आत्मसात करावे लागतातच. ते
भोगण्याशिवाय पर्याय उरत नाही. शंभर पुत्र असून निपुत्रिक म्हणून वार्धक्य कंठण्याचे भोग गांधारीच्या पदरी धृतराष्ट्राने आपल्या
अविवेकातून टाकले. दुर्योधन अविचारी, कुलांगार ठरला. बालपणापासून त्याच्या द्वेषमूलक विखारी वागण्याला खतपाणी पित्यानंच
घातलं. ‘शकुनी आणि दुर्योधन यांची विषवल्ली जोपासणारी युती मुळापासून उखडली नाही तर विनाश अटळ आहे,’चा इशारा
गांधारीनं दिला. त्या दोघांपुढे आपलं काही चालत नसल्याचा अभिनय धृतराष्ट्रानं वठवला. अभिनयच तो; पण त्याच्या मनात
साचलेल्या द्वेषाला विनासायास मूर्तस्वरूप येत होतं. त्यातून पांडवांचा सर्वनाश झाला असता तर धृतराष्ट्राला तो हवाच होता.
गांधारीच्या पदरी मात्र विलाप आला. ‘धर्मराजा, अरे, त्यातल्या त्यात कमी अत्याचारी असलेला एकही पुत्र तुला आम्हा
म्हातार्यांची काठी म्हणून जिवंत ठेवावासा नाही वाटला का रे?’ आपल्या वैफल्यग्रस्त जीवनाचा उद्रेक पांडवांना शाप देऊन
शमवण्याची ऊर्मी दाबताना तिला यातना झाल्या. व्यासमहषानी तिला रोखलं. ‘यतो धर्म: ततोजय:’ असा आशीर्वाद देऊन तूच
दुर्योधनाचा पराजय अधोरेखित केला होतास, याची आठवण दिली. तरीही कृष्णानं या भाऊबंदकीला पायबंद घातला नाही, तेव्हा
‘यादव कुळाचा विनाश असा आपापसात लढूनच होईल,’ अशी आगपाखड कृष्णावर करून तिनं आपला वांझोटा राग शांत केला.
पतीवरही तोंडसुख घेतलं. अनंत अपराध पोटात रिचवून आणि शंभर पुत्रांचं दान केल्यावर किमान आगपाखड करण्याचं स्वातंत्र्य
गांधारीपाशी होतं. तोच वारसा स्त्तिया आजही मिरवत असतात. वांझोटा संताप, तडफड व्यक्त करून जिवाची तगमग
शमविण्याशिवाय त्यांच्या हाती काही नसतंच. कारण आम्ही व्हायचं ठरवलंय गांधारी.
त्याचं पुरुषपण कधीच संपत नाही. शंभर पुत्र गमावूनही दात पाडलेल्या वाघासारखा धृतराष्ट्र मनोमन पांडवांवर आगपाखड करतच
राहिला. मनोमन उसासत राहिला. ज्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी धर्माची चाड बाळगली नाही, त्याच पांडवांचे आश्रित म्हणून
राहण्याची पाळी त्याच्यावर आली. शरीर झिजविण्याचा कठोर उपाय त्याने आरंभला. गांधारीनं पतीच्या पावलावर पाऊल
टाकण्याचा वसाच घेतला होता. ती पतिपरायण, तेवढीच धर्मपरायण. घेतला वसा टाकण्याचा अधर्म तिच्या लेखी अशक्य होता.
वनवासाचा अंगिकार… देह झिजवून तपाचरण. शक्य तेवढ्या लवकर अनंतात विलीन होण्याची तयारी पतीबरोबर तिनं केली.
वणवा भडकला आणि ती पतीसमवेत अग्निनारायणाच्या स्वाधीन झाली. आमच्या धर्माप्रमाणं तिच्या आयुष्याचं सोनं झालं.
पतीचं वैगुण्य असं अंगी बाणवल्यावर होरपळण्याशिवाय पर्याय तरी काय असू शकतो! संसाराचा गाडा हाकण्यासाठी पतीच्या
वैगुण्याकडे किवा अपराधांकडे डोळेझाक करणार्या वा त्यावर पांघरूण घालणार्या असंख्य गांधारी आजही होरपळतच आहेत.
— भालचंद्र हादगे
Leave a Reply