नवीन लेखन...

आय.एन.एस विक्रांत, विराट, ‘विक्रमादित्य’ आणि नौदलाची युद्ध सज्जता

गेल्या आठवड्यात नौदलात तीन महत्वाच्या घटना घडल्या. अॅडमिरल गॉरश्कोव्ह म्हणजेच भारतीय नामकरण झालेली ‘विक्रमादित्य’ ४० हजार टन वजनाची विमानवाहू युद्धनौका रशियामधून भारताकडे येत आहे.आय.एन.एस विक्रांतचे स्मारक करणे महाराष्ट्र सरकारला परवडणार नसल्याने तिची नाइलाजाने भंगारात विक्री करावी लागेल. १९७१ च्या पाकिस्तानबरोबरच्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानचा पराजय करून दोन तुकडे घडवण्यात महत्त्वाचे योगदान भारतीय नौदलाच्या विक्रांत युद्धनौकेचे होते. बांगलादेश मुक्ती लढ्यातील भारताच्या नौदलाने बजावलेल्या निर्णायक कामगिरीची आठवण म्हणून दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलाच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावाही घेतला जातो. यंदाच्या नौदल दिनावर मात्र १३ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘आय.एन.एस. सिंधुरक्षक’ या पाणबुडीला झालेल्या अपघाताचे सावट आहे. या अपघातात नौदलाला ही पाणबुडी आणि त्यावरील १८ नौसैनिक गमवावे लागले होते. सध्या भारताच्या नौदलात ‘सिंधु’ वर्गातील (रशियन किलो वर्ग) एकूण दहा पाणबुड्या कार्यरत आहेत. डिझेल-इलेक्ट्रिक शक्तीवर चालणार्‍या या पाणबुड्यांपैकी पाच पाणबुड्यांचे आधुनिकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ‘सिंधुरक्षक’ त्यांपैकीच एक असून ती १९९७ मध्ये भारतीय नौदलात सामील झाली होती.

१९७१ चे युद्ध
भारतीय नौदलाचा हा विजयोत्सव १९७१च्या युद्धात मुंबईहून पाकिस्तानच्या कराची बंदरावर केलेल्या यशस्वी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्ताने साजरा केला जातो! पाकिस्तानने ३ डिसेंबर रोजी संध्याकाळपासून भारताच्या ११ हवाई अड्डय़ांवर अचानक हल्ला केला. त्याच रात्री भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हवाई अड्डय़ांवर हल्ले केले. त्याचबरोबर बंगलादेशच्या सीमेवर सज्ज असलेल्या भारतीय सेनेने एकाच वेळी बांगलादेशात प्रवेश करून हल्ले सुरू केले.

३ डिसेंबरच्या रात्रीच भारताच्या तीन विद्युत क्लास मिसाईल बोटी पाकिस्तानच्या सीमेवर ४०० किलोमीटर अंतरावर पोचल्या होत्या! त्या वेळी कराची हे पाकिस्तानचे एकमेव व्यापारी दृष्टीने आयात-निर्यात करणारे बंदर आणि पाकिस्तानी नौसेनेचे मुख्यालय होते! त्यामुळे कराची बंदराची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला होता. रात्री १०:३० वाजता पाकिस्तानच्या समुद्रकिनार्‍यावरून जवळ जाऊन तिथल्या पेट्रोलच्या टाक्यांवर मिसाईल बोटींनी हल्ला करून त्या उध्वस्त केल्या. त्याच वेळी पाकिस्तानी नौदलाची पी.एन.एस. खैबर ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या मिसाइल बोटीच्या टप्प्यात आल्यावर त्यांनी तिच्यावर मिसाइलचा मारा केला! त्या वेळी पाकिस्तानच्या युद्धनौकेला भारतीय नौदलाच्या युद्धनौका कराची बंदराच्या इतक्या जवळ आल्या आहेत हे समजलेच नाही. त्यांना वाटले हा भारतीय वायुदलाच्या विमानांचा हल्ला आहे! म्हणून त्यांनी युद्धनौकेवरील विमान विरोधक तोफा आणि मशीनगन हवेतच गोळीबार प्रारंभ केला. त्याचबरोबर कराची बंदरातच अमेरिकेची एम.व्ही.व्हिनस चॅलेंजर ही बोट पाकिस्तानी सैन्यासाठी दारुगोळा घेऊन येत होती. तिच्यावरही भारतीय युद्धनौकांनी तोफगोळे आणि मिसाइलचा मारा करून तिच्या ठिकर्‍या ठिकर्‍या केल्या. इतक्या तत्परतेने ४ डिसेंबरला रात्री ११:३० वाजेपर्यंत पाकिस्तानची युद्धनौका खैबर, अमेरिकेची युद्ध सामग्री आणणारी बोट आणि कराची बंदरातील पेट्रोलच्या टाक्या उद्ध्वस्त करून भारतीय नौसेनेच्या युद्धनौका मुंबईकडे यायला परत निघाल्या. ऐतिहासिक दृष्टीने भारताची र्मयादित क्षमता असूनसुद्धा अत्यंत अल्पकाळात म्हणजे ४ डिसेंबर १९७१ रोजी एका रात्रीतच पाकिस्तानच्या नौदलाला त्यांचे मुख्यालय कराचीतच पोचून त्यांचा पराजय करण्याची क्षमता ही भारताच्या सैनिकी क्षेत्रात एक प्रेरणादायक घटना ठरली आहे.

भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका आणि १९७१ च्या पाकिस्तानबरोबरच्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानचा पराजय करण्यात महत्त्वाचे योगदान भारतीय नौदलाच्या विक्रांत युद्धनौकेचे होते. विक्रांतने बंगालच्या उपसागरातील त्या काळच्या पश्‍चिम पाकिस्तानातील बांगलादेशचे महत्त्वाचे बंदर असणारे चितगाव आणि कोक्सबाजार या बंदरांची नाकेबंदी केल्यामुळे पाकिस्तानी नेव्हीला कोणती मदत किंवा हालचाली करणे अशक्य झाले. त्याखेरीज विक्रांत युद्धनौकेने त्या भागात तळ ठोकून युद्ध प्रारंभ झाल्यानंतर या बंदराच्या पेट्रोल टाक्यांवर तुफान हल्ले करून त्या उध्वस्त केल्या. यामुळे पाकिस्तान सैन्याची पळुन जायची एकुलती एक वाट बंद झाली, आणी युद्ध लवकर संपले.

नौदलाची युद्ध सज्जता चांगली नाही
पण सध्याची नौदलाची युद्ध सज्जता फारशी चांगली नाही. अनेकांना आय.एन.एस विक्रांतची भंगारात विक्री करावी लागत आहे म्हणुन वाईट वाट्त आहे.पण सत्य हे आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाल्यामुळे आपल्याकडे लढाई करता जरुरी शस्त्रे घ्यायला पण पैसे नाहीत. आपण ह्या लेखात फ़क्त आपल्या विमानवाहू युद्धनौकांची तयारी बघु. १९७१ मध्ये भारताकडे विक्रांत ही एकमेव विमानवाहू युद्धनौका होती!तीला १९९८ साली निव्रुत्त करण्यात आले. त्याखेरीज भारताकडे विराट विमानवाहू ही युद्धनौका आहे ती पण पुढच्या ३-४ वर्षांत निवृतीच्या रस्त्यावर आहे. त्याची जागा घेणारी नवी विक्रांत त्याआधी नौदलात आली तर फार चांगले होईल.

रशियाकडून आठ वर्षांपूर्वीच खरेदी करण्यात आलेली अँडमिरल गॉरश्कोव्ह म्हणजेच भारतीय नामकरण झालेली ‘विक्रमादित्य’ ही भव्य ४० हजार टन वजनाची विमानवाहू युद्धनौका रशियामधून भारताकडे येत आहे! जानेवारीत विक्रमादित्य दाखल झाली, तरी त्यावरील मिग २९ के या लढाऊ विमानांच्या उड्डाणांमध्ये वैमानिकांना नैपुण्य येण्यास किमान सहा महिन्यांच्या अवधी द्यावा लागेल. विक्रमादित्यवर उडणारी मिग २९ के ही विमाने आपल्याकडे गोव्याच्या तळावर आधीच दाखल झाली आहेत. विक्रमादित्यच्या डेकप्रमाणे उभारण्यात आलेल्या डमी धावपट्टीवरून गोव्यात नौदलातील वैमानिकांनी मिग२९के वर सरावही सुरू केला आहे. पण जमिनीवरची धावपट्टी आणि तरंगती धावपट्टी यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.

विक्रमादित्यवर सध्या तरी स्वतःचा हवाई हल्ल्यापासून बचाव करण्याची स्वतःची यंत्रणा नाही. ती भारतात आल्यावरच तिच्यावर इस्रायली बराक क्षेपणास्त्रांची दुसर्‍या क्षेपणास्त्रांचा खात्मा करणारी यंत्रणा बसविली जाईल. विक्रमादित्य पूर्णरीत्या कार्यरत होण्यास पाच-सहा महिने लागतील व तोपर्यंत विराटचा प्रभाव बराचसा कमीच होईल. त्यामुळे दोन विमानवाहू युध्दनौका ताफ्यात याव्यात , यासाठी आपल्याला आयएनएस विक्रान्त या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युध्दनौकेची प्रतीक्षा असेल. ती २०१८ पर्यंत नौदलात दाखल होईल.

मुंबईमधील नौसेनेचा तळ नौसेनेच्या विस्तारासाठी अपुरा
भारतीय नौदलात सध्या दोन विमानवाहू युद्धनौका, जमीन आणि समुद्रातून ही जाऊ शकतील अशा अँम्फीबियस बोटी, आठ मिसाइलने सज्ज असलेल्या विनाशिका, १५ युद्धनौका, १ अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आणि बाकी १३ डिझेलवर चालणार्‍या पाणबुड्या, ३० गस्ती बोटी आणि २४ सर्वप्रकारे मदत करणार्‍या बोटी आहेत. मुंबईमधील नौसेनेचा तळ नौसेनेच्या विस्तारासाठी आता अपुरा पडत आहे! म्हणून पश्‍चिम किनारपट्टीवरील गोव्यापासून जवळच असणार्‍या कारवारजवळ अकराशे कोटी रुपये खर्च करून ‘सी बर्ड’ या नावाचा एक सुसज्ज ४० युद्धनौका ठेवता येतील असा तळ उभारण्याचा उपक्रम गेली १५ वर्षे चालत आहे!

पूर्वी आपल्याकडे युध्दनौकांची सामग्री नव्हती. आता सामग्री वाढत चालली असतानाच, त्यांची योग्य ती देखभाल कशी करायची, याबद्दल नौदलाने अधिक सतर्क होण्याची वेळ आली आहे. ‘विंध्यगिरी’ आणि ‘सिंधुरक्षक’ च्या दुर्घटनांवरून बोध घेतलेले बरे. ‘विक्रमादित्य’ चे स्वागत करतानाच या समस्यांचाही विचार आपल्याला करावाच लागेल. चीन आणि पाकिस्तान यांचे लष्करी सामर्थ्य आणि अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे यांचे वाढते सामर्थ्य लक्षात घेतले तर सध्याची नौसेनेची क्षमता अत्यंत अपुरी ठरते.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..