गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon Citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे.
हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
उपयोग :
ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो.
कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
पावसाळ्यासाठी तयारी करताना गवती चहाचे कंदही घरात कुंडीत लावता येतील. लहानशा कुंडीत लावूनदेखील काहीही कष्ट न घेता गवती चहाची पाने चांगली वाढतात. पावसात कधी तरी आल्याबरोबर गवती चहाची लहानशी जुडी चहात घालून तो वाफाळता चहा प्यायची मजा औरच! या ऋतूत घरात एकदा तरी गवती चहाचा काढा होतोच. गवती चहादेखील कफ कमी करणारा आहे. त्याबरोबरच वात कमी करणारा म्हणूनही तो उपयुक्त ठरतो, पण चहात किंवा काढय़ात घालण्याव्यतिरिक्त गवती चहाचे घरगुती तेलही तयार करता येते हे फार जणांना माहीत नसेल. पावसाळ्यात अनेकांचे सांधे दुखतात, गुडघेदुखीही उफाळते. त्यावर गवती चहाचे तेल लावून आराम पडतो. गवती चहाची पाने चुरगाळून ती तेलात अगदी थोडा वेळ उकळावीत. हे तेल गार झाल्यावर ते गाळून बाटलीत भरून ठेवावे. तिळाचे तेल ‘वातघ्न’ असल्यामुळे ते यासाठी वापरले तर उत्तमच. पण साधे खोबरेल तेल वापरूनही चालेल.
— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन
Leave a Reply