आरोग्यदायी गाजर
गाजराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाजर हे ‘अ’ जीवनसत्वाने समृद्ध असते. गाजर खाल्ल्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसेच चेहर्यासाठीही गाजर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील जळजळ कमी करणारे व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जडीबूटी असून ते हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो तसेच शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते. गाजरात रक्त अवरोधक शक्ती असल्यामुळे रक्तपित्त तयार होऊ देत नाही. तसे तर गाजर थंड प्रवृत्तीचे असते पण हे कफनाशक आहे. गाजरातील लोहतत्व कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला स्वस्थ ठेवतात. गाजराच्या हिरव्या पानांतही पौष्टीकता, खनिजे, जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. शरीरात पाणी कमी झाल्यास गाजराच्या रसाने ती उणीव भरून काढली जाते. जेवणानंतर लगेच गाजर चाऊन खाल्ल्यास तोंडातील हानिकारक जंतू मारतात. दात स्वच्छ होतात. दातांतील फटीत अडकलेले अन्नकण बाहेर निघतात आणी हिरड्या व दात यांतून रक्त येणे बंद होते.
बघुया अशा उपयुक्त गाजरापासून तयार होणारी गाजराची भाकरी
साहित्य – एक वाटी ज्वारीचे पीठ , २ गाजरे, लाल मिरच्यांचे बारीक तुकडे , चवीनुसार मीठ , अॅल्युमिनिअम फॉईलचा तुकडा, थोडेसे तेल
कृती
प्रथम गाजराचे काप करुन कुकरमधे उकडून मऊ करुन घ्यावेत व त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे
कुस्करून घ्यावीत. अशाप्रकारे गाजराचा एक वाटी गर झाला की त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (ज्याला आपण चिली फ़्लेक्स असेही म्हणतो) अर्धा टिस्पून घालावेत.
वरील मिश्रणात चवीनुसार मीठ घालावे आणि साधारण वाटीभर ज्वारीचे पीठ त्यात घालावे. पिठ थोडे कमीजास्त लागेल पण पिठ जरा सैलसरच असू द्यावे. लागल्यास थोडे पाणी वापरावे.
भाकरी थापण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉइलचा एक तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापावे. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाकावी. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्यावी आणि भाकरी भाजावी. अशाप्रकारे गरमागरम गाजराची भाकरी तयार. अॅल्युमिनिअम फॉईल वापरल्याने भाकरी थापणे हा अनेक स्त्रीयांना कठीण वाटणारा प्रकार सोप्पा होतो व भाकरीचा आकारही सुंदर होतो. यात घातलेल्या चिली फ्लेक्समुळे गाजराच्या भाकरीला सुंदर नैसर्गिक लाल रंगही येतो.
Leave a Reply