पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी ’ आशियाई शांतता परिषद’ बोलावून पहिले पाऊल उचलले होते. पण ते तिथेच थांबले. नंतर काही वर्षातच चीन व पाकिस्तानशी आपले युद्ध झाले. त्यानंतरचा इतिहास सर्वपरिचीत आहे. आपण मागे वळून पाहिले तर आपल्याला इतरांच्या चूका दिसतील. पण जो माणूस मागे बघून चालतो
तो एखाद्या अडथळ्यात अडकून पडतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सारे जग पुढे नजर ठेवून चालत असताना आपणही पुढे बघूनच आपला मार्ग ठरवला पाहिजे.
पंडित नेहरूंनी ते सुरू केलेले प्रयत्न पुढे न्यायचे असतील तर भारतासह पाकिस्तान, चीन, जपान, कोरिया, बांगलादेश, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया यांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून सहकार्य व दळणवळण या पाच क्षेत्रांत सहकार्य केले, तर संपूर्ण खंडातील कोट्यवधी लोकांचे राहणीमान सुधारेल.
संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे
भारताची चीन आणि पाकिस्तान बरोबर भूतकाळात झालेली युद्धे ही भूतकाळातच ठेवली तर ते आपल्या सगळ्या आशियाई देशांच्या दृष्टीने हिताचे होईल. उगाच जुन्या कुरापती काढून त्याचा परिणाम आजच्या सरकारी धोरणांवर आणि एकूणच जनतेच्या मानसिकतेवर होत राहिला तर आशियाई देशांत पुन्हा-पुन्हा वैचारिक द्वैत आणि दुटप्पीपणा येत राहील. यामुळे आशिया खंडातील कोणत्याही देशाचे भले तर होणार नाहीच परंतू मौल्यवान असा प्रगतीसाठी लागणारा वेळ आणि पैसा मात्र वाया जाईल. कोणत्याही देशातील नागरिकांचा वेळ अशा निरूपयोगी आणि दिशाहिनतेच्या अवस्थेत जात असेल तर यासारखे दुर्दैव नाही. त्यामुळे एकमेकांशी भांडण्यात वेळ वाया घालवण्या पेक्षा सहकार्याच्या दृष्टीने एकमेकांशी वाटाघाटी केल्यास ते अधिक योग्य. आज आपल्यासमोर दहशतवाद, पाकिस्तान आणि चीनबरोबरील सीमाप्रश्न,चीनचा पाण्याचा प्रश्न, भारतातील बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न, श्रीलंकेतील लिट्टेंचा प्रश्न असे अनेक देशांत असलेले परंतू त्यावर तातडीची भुमिका घ्यायला लावणारे अनेक प्रश्न आहेत. परस्पर वैचारिक आणि देशांतर्गत
सामंजस्य आणि सहकार्यानेच सोडवले जाऊ शकतील असे या प्रश्नांचे स्वरूप आहे. जगाला योग्य दिशा देणारा हाच विचार संदिप वासलेकरांनी आपल्या एका दिशेचा शोध या पुस्तकात मांडला आहे.
— तुषार भामरे
Leave a Reply