”शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या वाक्याचा प्रत्यय श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आयोजित पालकांसाठी संस्कार शिबिरात आला. श्री समर्थ सेवा मंडळाने भारतातील मुले संस्कारीत व्हावी म्हणून १२ ते १४ ऑक्टोबर २०१२ रोजी पालकांसाठी “भारतीय संस्कृतीविषयक ज्ञानसंस्कार शिबिराचे” आयोजन केले होते. हे त्यांचे कार्य अर्थात वंदनीय आहे. सुदैवाने मलाही त्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. समर्थांचीच ईच्छा होती. आधी बीज शुद्ध असेल तरंच त्या वृक्षाला येणारी फळे रसाळ आणि गोमटी असणार. म्हणून आधी पालकांवर संस्कार केले पाहिजे जेणेकरुन पालक आपल्या पाल्यांना संस्कार करु शकतील. कु. मंदाताई गंधे, श्री. मकरंदबुवा रामदासी, श्री. योगेशबुवा रामदासी, सौ. सीमाताई शुक्ल यांनी सर्व पालकांना मंत्रमुग्ध मार्गदर्शन केले. आज धर्मावर फार मोठे संकट आले आहे. धर्म व राष्ट्र विस्कळीत झाले आहेत. यांना सावरण्यासाठी एक बुद्धिवान नि बलवान पीढी निर्माण करायची आहे. त्यासाठी पालकांनी सज्ज व्हायला हवे. यापुढे “शिवाजी माझ्याच घरी जन्मणार” अशी रौद्र नि वंद्द गर्जना पालकांनी करावयास हवी. तरंच या महान विश्वविजयी, विश्वकल्याणकारी हिंदु जातीचे रक्षण होऊ शकेल. शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या गावी, अशी संकूचीत, क्लीष्ट व स्वार्थी वृत्ती सर्वांनी केरकुंडीत टाकून द्यावयास हवी. मुलं मोठी झाली की ती अमेरिकेला जाणार, अशा दिवास्वप्नात पालकांनी रमू नये. कित्येक पालक अभिमानाने सांगतात की माझा मुलगा अमेरिकेत काम करतो. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. अमेरिकेतल्या एका तरुणाची ही गोष्ट. जसे आपल्याला अमेरिकेत जावेसे वाटते, तसेच तिथल्या लोकांनाही परदेशात म्हणजेच इतर देशात जावेसे वाटते. या अमेरिकन तरुणालाही परदेशात जाऊन आपले नशीब आजमावे असे वाटले. म्हणून त्याने सरकारकडे अर्ज केला. पण सरकारने तो फेटाळला व म्हटले की तु या राष्ट्रात जन्मला आहेस, तुझ्या बुद्धीचा व बलाचा उपयोग आधी या राष्ट्राला व्हायला हवा. निर्बंधाप्रमाणे (कायाद्दाप्रमाणे) त्या तरुणाकडून पुरेशी राष्ट्रसेवा करुन घेतली व नंतरच त्याला परदेशी जाण्यास परवानगी दिली. त्या तरुणाचे नाव “बील क्लींटन” आहे. पुढे हा तरुण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. याला म्हणतात राष्ट्राभिमान. युरोपच्या कित्येक देशात हे निर्बंध (कायदा) आहे. पण भारतात नाही. याचे नैतिक उत्तरदायित्व भारतीय सरकारचे आहे. परंतु भारतीय सरकारमध्ये नीतीच उरली नाही तर उत्तरदायित्व काय सांभाळणार. पण मला असे वाटते की भारताच्या प्रत्येक नागरिकाने हे उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्दावर घेतले पाहीजे.
आपण नेहमी म्हणत असतो की आपली मुलं सुसंस्कृत व्हावी. पण नेमकं काय व्हावं, हे बर्याच जणांना कळत नाही. सावरकरांनी बालवयातंच देवीपुढे प्रार्थना केली की भारतस्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन, माझ्या मते यालाच सुसंस्कृतपणा म्हणतात. नुसते महाविद्दालयिन उच्च शिक्षण घेतल्याने सुसंस्कृत होता येत नाही. मी ज्या धर्मात, ज्या राष्ट्रात जन्मलो त्याच्या कल्याणाकरिता सबंध आयुष्य पेटवणे म्हणजेच सुसंस्कृत होणे. इथे एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि या लेखप्रपंचाला पूर्णविराम देतो. स्वामी विवेकानंद यांच्या भव्य आयुष्यातली ही दीव्य घटना. विवेकानंदांनी परदेशात जाऊन धर्मप्रचार केला. त्यांचे अनेक शिष्य झाले. हिंदु राष्ट्र हे काही अनाथाश्रम नव्हे तर ज्ञानाश्रम आहे हे विवेकानंदांनी पाश्चात्य जगाला पटवून दिले. पाश्चात्य राष्ट्रांना आपल्या वाणीने, ज्ञानाने व विचाराने जींकून हा योद्धा संन्यासी मायभूमीत, कलकत्यात आपल्या आजीच्या घरी आला. तेथे विवेकानंदांची आई सुद्धा आली होती. निघताना त्यांनी आईला नमस्कार केला. तेव्हा त्या माऊलीचे ह्रदय भरुन आले व ती म्हणाली “आशीर्वाद देऊ की घेऊ?”. मला वाटते प्रत्येक पालकांना आपलं मुल विवेकानंदांसारखं व्हावं, असं वाटत असणार. डॉक्टर, इंजिनीयर, चित्रकार, अभिनेता तर सगळेच होतात. पण विवेकानंद होणे फार कठीण आहे. कल्पना करा पालकांनो, काय प्रसंग असेल तो? आपलं मुलंही विवेकानंदांइतकं मोठं झालेलं असेल, आणि जेव्हा आशीर्वाद घ्यायला ते खाली वाकेल तेव्हा आपलंही ह्रदय भरुन येईल व आपणही नकळत बोलून जाऊ, आशीर्वाद देऊ की घेऊ?
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply