शेतकरी घाम गाळून धान्य पिकवतो. पण हे धान्य शेतात पुरते तयार होण्याआधीच त्यातले ३५ टक्के अन्नधान्य चक्क उंदरांच्या पोटात गेलेले असते. पुन्हा धान्य साठवून ठेवले की त्यावर उंदराचा डोळा असतो, तो वेगळाच. जागतिक आरोग्य संघटनेच्या चार दशकाआधी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरचे दरवर्षी ३० लाख टन अन्न उंदरांचे भक्ष्य बनते. इतके हे उंदीर येतात तरी कुठून? उंदरांच्या विविध जातीपैकी ४१ जाती ह्या साठवून ठेवलेल्या अन्नधान्यावर वाढत असतात. एका उंदराचे आयुष्य जरी जेमतेम एक वर्षाचे असले तरी जन्मल्यापासून काही आठवड्यातच ते पुनरुत्पादन करण्याची क्षमता प्राप्त करतात. खूप मोठ्या प्रमाणात ते आपली प्रजोत्पत्ती करीत असतात. अगदी एका आठवड्यात उंदराची प्रजा १०% ने वाढत असल्याची आढळले आहे. हे खादाड उंदीर धान्याचा फडशा पाडतातच, पण आपल्या मलमूत्र व अंगावरील केसांनी अन्नधान्याची नासाडी करतात. एका वर्षाला एक उंदीर २५,००० लेंड्या, साडेतीन लिटर मूत्र व १० लाख केस, कोठारात साठविलेल्या अन्नात टाकून ते दूषित करीत असतात. शिवाय ते घराच्या वास्तूला आणि कोठारालासुद्धा हानी पोहचवीत असतात. तेव्हा माणसाचा शत्रू असलेल्या ह्या उंदरांना आवर घालण्यासाठी विविध प्रयत्न जारी आहेत. पण त्या उपायांवरदेखील ते चाणाक्षपणे मात करीत दिसून येत आहे. धान्याची कोठारे मोकळ्या हवेशीर जागेत असली तर उंदरांना लपण्यास जागा मिळत नाही. तसेच खांबावर उभारलेल्या कोठारापर्यंत उंदीर पोहोचू नयेत म्हणून त्यांच्या बुडाशी संरक्षक ठेवले जातात. कित्येकदा धान्याच्या कोठारांच्या आसपास मांजर, कुत्रा, मुंगूस ह्यासारखे उंदरांना भक्ष्य बनविणारे वा पळविणारे प्राणी पाळले जातात. किंबहुना उंदीर मारण्यासाठी बक्षिसेदेखील जाहीर केली जातात. परंतु वर्षानुवर्षे वापरात आणल्या जाणार्या ह्या उपायांचा फारसा फायदा होत नाही, हे आढळून आलेले आहे. उंदरांना अटकाव करण्यासाठी दोन प्रकारची रसायने विष म्हणून वापरता येऊ शकतात. झिंक सल्फाईड हे असेंद्रिय रसायन उंदरासाठी जहरी विष आहे. पिठाच्या गोळ्यात ते घालून शेते वा घरांच्या आजुबाजूला ते ठेवता येतात. हे रसायन एकदोन वेळा पोटात गेले तर उंदीर मरू शकतो. परंतु हे रसायन अन्य सस्तन प्राण्यांना, किंबहुना माणसांनादेखील बाधा ठरू शकते व ते पोटात गेले तर त्यावर रामबाण उपायदेखील उपलब्ध नाही, त्यामुळे त्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे. दुसरे विशेष म्हणजे एकदा ते अल्प प्रमाणात पोटात गेले की उंदरांना त्याचा परिणाम जाणवू लागतो. मग तो कावेबाज प्राणी पुन्हा त्या आमिषाला अजिबात तोंड लावीत नाही, असे प्रयोगात आढळले आहे. त्यामुळे त्यांना मारण्याइतका झिंक सल्फाईडचा डोस त्यांच्या पोटात गेला की त्यांची रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन उंदीर मरू शकतो. हे औषध चुकून माणसाच्या शरीरात गेले तर व्हिटामिन के चा डोस देऊन बरे करता येते. परंतु हे वारफेरीन औषध उंदरांना पुन्हापुन्हा द्यावे लागते व ते महाग आहे. साहजिकच तिसर्या जगातील गरीब राष्ट्रांत त्याचा वापर होत नाही. थॅलियमयुक्त रसायने उंदीर मारण्यासाठी वापरली गेली, पण त्यांची विषारी बाधकता माणसालादेखील धोक्याची ठरली. पाश्चिमात्य देशांनी ह्या विषाचा उंदरासाठी सातत्याने वापर केला होता. पण आता त्यांना समजले आहे की हळूहळू उंदरांनी ह्या विषाला प्रतिबंध करणारी शक्ति निसर्गतः प्राप्त केली आहे. ह्या विषाच्या वर्गातील डायफेनाकूम व फ्लोकूमासेन ही दुसरी रसायने बाजारात आली आहेत. अगदी अल्पशा अंशाने उंदरांना मारण्याची ताकद ह्या नव्याह औषधांत आहे, ही एक आशावादी बाब आहे. तरीसुद्धा जगभर शास्त्रोक्त कार्यक्रम राबवून उंदराच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, ही माणसाच्या हिताच्या दृष्टीने एक निकडीची गरज आहे, हे कुणालाही पटते.
Leave a Reply