‘ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.’
‘अरे असा काय चालतोस पोक्या सारखा? जरा छाती पुढे काढून चाल.’
‘साधं जेवता येत नाही तुला. चार नव्हे पाच बोटांनी घास घे.’
‘पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा,इतकी पण तुला अक्कल नाही?’
वरील वाक्ये कुणी कुणास म्हंटली असतील?
हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
मुलांवर उपदेशांच्या सतत फैरी झाडणारे लढाऊ पालक तुम्हीही पाहिले असतील. पण….. असा उपदेशांचा आणि सूचनांचा सतत गोळीबार केल्याने मुले सुधारण्याऐवजी
जायबंदीच होतात.
उपदेशाचा आणि सूचनांचा अतिरेक झाला की त्याबाबतीत मुले कोडगी होतात. त्यांना त्याचे काहीच वाटेनासे होते.
‘मोठ्या माणसांनी केलेली निरर्थक बडबड’ इतकीच किंमत मुलांच्या लेखी त्याला उरते.
ह्यामुळेच मुलांच्या वर्तनात टिकाऊ स्वरुपाचा अपेक्षित बदल होणे,केवळ अशक्यच होते.
मुलांशी बोलताना,त्यांना विश्वासात घेऊन बोलावं. त्यांना काय जमू शकतं ह्याची त्यांना जाणीव करून द्यावी.
ह्यामुळे मुलांच्या वर्तनात होणारा बदल हा त्यांच्या स्वेच्छेने होतो आणि म्हणूनच तो कायमस्वरुपी राहतो!
…………………………………
————————————————————————————————————————
पालकांसाठी गृहपाठ : आजूबाजूला मुले नसताना आरशासमोर ऊभे राहा. आरशात दिसणाऱ्या शहाण्या व्यक्तीला वरील उपदेश खटाखटा ऐकवा.
आता त्याला कसं वाटतं विचारा?
तरीही… आरशातला माणूस आनंदी वाटला तरच घरातल्या मुलांना हे सर्व ऐकविण्याची हिंमत करा!!
अन्यथा…………..!
‘चांगल्या पालकांना आरशातल्या माणसात, दिसतं मूल!’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.
————————————————————————————————————————-
— राजीव तांबे
Leave a Reply