एकत्र कुटुंब म्हणजे एका छत्राखाली असलेली एक संघटीत घर संस्था…सद्य परीस्थीतीतील एक दुर्मीळ गोष्ट.
आजकालची कुटूंबे ही “त्रिकोणी, चौकोनी” असतात, पण मला, एकत्र कुटूंब हे वर्तुळा समान भासते, याचे कारण असे की कुठेही कोन आला की टोक आले व टोकाची भुमीका ही अहितकारक. त्याच्या विरुद्ध वर्तुळ म्हणजे कुठेही टोक नाही, आहे तो एकत्रीत मनांचा हळुवार गोलावा…. ओलावा.
नाण्याला जश्या दोन बाजु तश्या कुटूंब पद्धतीलाही फायदे व तोट्यांच्या दोन बाजु.
पण या बाजुंना जर “ बाजूं ” प्रमाणे (बाहुं प्रमाणे) पाहीले तर एकत्र कुटूंब पद्धतीत फायद्याचा बाहु हा मजबुतव मोठा आहे, तर तोट्याचा तोकडा व कमकुवत आहे.
या विरुद्ध स्वतंत्र कुटूंबा मधे फायद्याचा बाहू हा कमकुवत व तोकडा तर तोट्याचा बाहू हा मोठा व बलवान ठरतो.
एक साधे उदाहरण… लहान मुल जेव्हा एकत्र कुटूंबात वाढते तेव्हा त्या मुलाला लहानपणीच ऐक्य, सामंज्यस्य याचे बाळकडू मिळते तसेच आशा मुलांमध्ये स्वार्थ, एक्कल कोंडेपणा कमी दिसतो. या विरुद्ध स्वतंत्र कुटूंबातील बहूतांश मुले ही एक्कल कोंडी व आत्मकेंद्रीत दिसतात.
एकत्र कुटूंबातील एखाद्या व्यक्तीवर जर काही संकट आले तर घरातील नातेवाईक त्यास परीस्थीतिशि मुकाबला करण्याचे बळ देतात, तसेच आनंदाच्या क्षणी भरभरून दादही देतात. स्वतंत्र कुटूंबात असे होत नाही असे नाही परंतू एक टाळी वाजणे व अनेक टाळ्या वाजणे यात खूप फरक आहे.
एकत्र कुटूंब असेल तर वैय्यक्तीक मौज मजेवर थोडे बंधन येते हे जरी खरे असले तरी सारासार विचार करता एकत्र कुटूंब पद्धत फक्त चांगलीच नाही तर आजच्या या “ बेधुंद ” काळात, सावरण्यासाठी ती
एक आवश्यक जीवन शैली आहे.
जाताजाता एकच म्हणावेसे वाटते की जर कुटूंबातील प्रत्येकाने
थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.
— मयुरेश जोशी
Leave a Reply