फेसबुकवरुन आलेली ही भावनाविवश करणारी कथा …..
डॉक्टर अजून अंथरुणात आहेत तोपर्यंतच एका जीपचा कर्कश आवाज डॉक्टरांच्या कानात घुसला . एकदा सुरु झालेला आवाज लवकर बंदच होईना. डॉक्टर लगबगीनं दारात येऊन उभे राहिले आणि त्यांनी वरूनच ‘ काय झालंय?’ असा आवाज दिला .
” सिरीयस पेशंट आहे अर्जंट खाली या.” जीपमधून आवाज आला .
‘ सिरीयस पेशंट ‘ म्हटल्यावर डॉक्टरनी अंगावर शर्ट चढवला आणि ते ताबडतोब खाली आले .
सिरीयस पेशंटला एक जनरल प्रॅक्टिशनर काय करू शकणार ?…..पण पेशंट नाहीच बघितला तर लोक नाराज होणार असा विचार करत त्यांनी दरवाजा उघडला .
” डॉक्टर , पेशंट इथंच बघता की आत घेऊ ?”जीपमधल्या माणसानं प्रश्न विचारला .
” आतच घ्या जीपमध्ये नाही बघता येणार .” डॉक्टर बोलले आणि दोनतीन माणसांनी एका वृध्दाला उचलून आत आणलं .
“झोपवा इथं टेबलवर .” डॉक्टर बोलले ,” काय होतंय यांना?”
“छातीत दुखतंय दोन तासपासून . जरा नीट तपासा आणि लवकर तपासा . xxx भाऊंचे चुलते आहेत हे !” कुणीतरी बोललं .
डॉक्टरांनी पेशंट बघितला. ते आजोबा छातीवर हात ठेवून कण्हत होते . त्यांचं अंग घामानं भिजलं होतं. त्यांना एवढा घाम आला होता की त्यांनी घातलेले मुंडासे त्यांच्या अंगाबरोबर चिकटलेले होते . त्यांचा श्वासही छातीऐवजी पोटानं चालला होता.
डॉक्टरांनी ब्लड प्रेशर तपासलं . ते अगदीच कमी झालं होतं .नाडीचे ठोके एवढे फास्ट आणि एवढे बारीक होते की ते तपासणं ही शक्य नव्हतं .
“यांना ताबडतोब पुढं हलवायला पाहिजे . बहुधा अटॅक आलेला आहे .” डॉक्टर बोलले .
“होय काय ? कुठल्या दवाखान्यात न्यायला पाहिजे ?”
डॉक्टरांनी दवाखान्याचं नाव सांगितलं.
” आम्ही लगेच नेतोच पेशंट पण तोपर्यंत कळीवरचं एखादं इंजेक्शन दया…. छातीतलं दुखायचं तरी थांबू द्या .”
” नाही , कार्डिओग्राम काढल्याशिवाय असं इंजेक्शन देता येणार नाही . सॉर्बिट्रेटची एक गोळी देतो , ती तेवढी जीभेखाली ठेवा….. आणि वेळ घालवू नका , निघा ताबडतोब .”
डॉक्टरांनी आपल्या कपाटातून एक गोळी काढली आणि ती पेशंटला द्यायला गेले .
” आजोबा , जरा तोंड उघडा …..ही गोळी एवढी जीभेखाली ठेवायची आहे .” असं म्हणत डॉक्टर जवळ गेले तर काय ?….पेशंट गप्पगार. अनंतात विलीन .
डॉक्टरांनी स्टेथोस्कोप त्याच्या छातीवर ठेवून तपासलं आणि ते बोलले ,” पेशंट गेला.”
“काय सांगता ?” सगळे नातेवाईक पेशंटजवळ आले आणि गोंधळ सुरु झाला. एकानं xxx भाऊंना फोन लावला . गोंधळात ऐकू येणार नाही म्हणून त्यानं आपल्या मोबाईलचा स्पिकर ऑन केला.
“भाऊ , तात्या गेलं गडया.” तो बोलला.
“काय सांगतोस ? कुठं झालं हे ?”
“xxच्या दवाखान्यातच की !”
” डॉक्टरनं काय इंजेक्शन बिंजेक्शन दिलं होतं काय ?”
“नाही ,त्यांनी पेशंट पुढं न्यायला सांगितलं होतं ….आम्ही निघणारच होतो तवर हे घडलं .”
“मग ठीक आहे . नाहीतर त्या डॉक्टरनं इंजेक्शन दिलं असतं आणि तात्याला काय झालं असतं तर मग त्या डॉक्टरचं काय खरं नव्हतं . त्याचा दवाखानाच ठेवला नसता जाग्यावर .”
ऐकून डॉक्टरांच्या अंगावर सर्रकन काटा आला . ते उठले . त्यांनी त्या प्रेताचे पाय धरले आणि मनातल्या मनात बोलले ,’ महाराज , लवकर गेलात बरं झालं . मी तुमच्या जीभेखाली गोळी ठेवल्यावर तुमचा जीव गेला असता तर माझाही जीव गेला असता . कर्ज काढून तुमच्यासाठी बांधलेला दवाखाना तोडून फोडून बंद पाडला असता तुमच्या माणसांनी आणि तुमच्याबरोबर वरही पाठवला असता कदाचित . मी आजपर्यंत रुग्णांना वाचवत होतो आज तुम्ही मला वाचवलंत
Very nice