नवीन लेखन...

एक अभिमानास्पद मित्र – डॉ. अब्दुल कलाम

एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या या अभिमानास्पद मित्राला अंत:करणापासून श्रध्दांजली.

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विशाल सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम मंचावर येऊन उभे राहिले आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. वातावरण चैतन्याने अक्षरशः भारून जाणे म्हणजे काय असतं हे प्रत्येकाने अनुभवण्यास सुरवात केली. मंचावरील सर्व मंडळी आसनांवर स्थानापन्न झाल्यावर व दीपप्रज्वलन, प्रास्ताविक इ. उपचार आटोपल्यानंतर कलाम साहेब बोलण्यास उभे राहणार एवढ्यात ध्वनिक्षेपण यंत्रणा अचानक बंद पडली आणि आयोजकांचे धाबे दणाणले व यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी धावपळ सुरु झाली. मी पहिल्या रांगेत बसलो होतो व सर्व घडामोडी मला अगदी जवळून बघायला मिळत होत्या. मला वाटलं, ते आयोजकांजवळ नाराजी व्यक्त करतील, पण तसं न घडता त्यांनी खाणाखुणा करून यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या माणसाचे स्वतःकडे लक्ष वेधले आणि ती कशी दुरुस्त करायची हे त्याला समजावून सांगितले. काही क्षणातच ध्वनिक्षेपण यंत्रणा सुरु झाली आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली. विलक्षण प्रेरणादायक असलेलं ते भाषण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात संपलं आणि राज्य मंत्री मंडळातील काही मंत्री व बारामतीतील अतिविशिष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी कलाम साहेब त्या परिसरातील अतिथीगृहाकडे रवाना झाले.

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मिटींग सुरु होण्यास काही मिनिटं राहिली असताना मी तिथे पोहोचलो. सभागृह अनेक अतिविशिष्ठ मंडळींनी गजबजून गेले होते. डॉ. कलामांना मी स्वतःची ओळख करून देऊन भेटीचा उद्देश सांगताच त्यांनी माझा हात धरून त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून घेतले. ‘तुमची मिटींग आटोपल्यावर आपण बोलू’ असं मी म्हणताच ते म्हणाले ‘या मिटींगपेक्षा आपल्या चर्चेचे विषय मला जास्त महत्त्वाचे वाटतात कारण त्यांचा संबंध थेट आपल्या शेतकरी बांधवांशी आहे.’ विजेच्या वापराशिवाय सिंचन, स्वयंपूर्ण खेडी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर मला अनेक प्रश्न विचारून ते थांबले नाहीत तर त्यावर तयार केलेल्या नोट्स तिथेच वाचून त्यांनी उपस्थित मंत्र्यांना काही प्रश्नही विचारले. संसद भवनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मी तयार केलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आराखडयावरही आमची चर्चा झाली. पाच मिनिटात संपेल असं वाटणारी चर्चा तब्बल वीस मिनिटे झाली तरी सुरूच होती. उपस्थितांमध्ये वाढू लागलेली अस्वस्थता बघून मी कलाम सरांचा निरोप घेण्याची तयारी करताच त्यांनी मला चहा घेण्याची व मान्यवरांच्या मिटींगमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी वस्तुस्थिती कथन करताना विलक्षण खिन्नतेने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता व डोळे पाणावले होते. भारतासारख्या देशाचा एक राष्ट्रपती किती संवेदनशील असू शकतो हे बघून मी थक्क झालो.

मिटींग संपल्यानंतर चर्चेनंतर उपस्थितांची फोटो सेशनसाठी लगबग सुरु झाली. आम्ही सर्वांनी फोटोसाठी पोझ दिली, पण कॅमेऱ्याने फोटो काढण्यास नकार दिला आणि आयोजकांना घाम फुटला. ग्रुपमध्ये माझ्या शेजारी उभे असलेले कलाम साहेब शांतपणे फोटो काढण्याची धडपड करणाऱ्या तरुणाकडे गेले, कॅमेऱ्याचं निरीक्षण करून त्याच्याशी काहीतरी बोलले आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये येऊन सुहास्य वदनाने उभे राहिले. त्यांचा विलक्षण साधेपणा व निगर्वीपणा बघून मी थक्क झालो असतानाच फोटो सेशन संपले व पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला.

ज्यांच्या भेटीने उभ्या आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना निर्माण व्हावी, ज्यांच्या विलक्षण प्रेरणादायी पण तितक्याच सध्या व्यक्तिमत्त्वाने भारून जावे, आदर्शांचा दुष्काळ पडलेल्या या देशात ज्यांचा आदर्श जिवापाड जपून एखादे महान कार्य उभे करण्याची प्रेरणा मिळावी असे थोर शास्त्रज्ञ, लेखक, कवी, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आज आपल्यात नसले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणादायक स्मृती आपल्या देशातील तरुणांना सतत प्रेरित करत राहतील. या महामानवाला माझी अंत:करणापासून श्रद्धांजली.

श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..