” सर, आपल्या इथे पेंटिंग सेक्शनचा राजेश हल्ली फार चिडचीड करायला लागला आहे.” सुपरवायझर गडहिरे सकाळी सकाळी तक्रार घेऊन आले होते.” अरे, मग तुम्ही त्याच्या चिडचीडीच कारण शोधायचा प्रयत्न करा .” ” नाही सर, तो नवीन मुलांना फार त्रास देतो. ” ” ठीक आहे, मला उद्या भेटा, आपण बघू.” आयएसओ. च ऑडीट असल्याने मी चर्चेला तिथेच विराम दिला.
ऑडीट सुरळीत पार पडलं, पण मनातून राजेश चा विषय काही जात नव्हता. नक्की काय कारण असाव? गेल्या काही दिवसापासून इतर कामगारांकडून देखील तक्रारी कानावर येत होत्या. कामच लोड वाढल्याने गेल्या सहा महिन्यापासून राजेशला दोन नवीन मुलं मदतीसाठी दिली होती.कामाच्या क्वालिटी बद्दल कुठली तक्रार नव्हती. मग चिडचीडीच कारण काय? कुठल्याही प्रश्नाचं मूळ कारण कळलं नाही तर, उपाय वरवरच होतो आणि प्रश्न तसाच राहतो.कधी कधी तो प्रश्न उग्र आणि गंभीर स्वरूप धारण करतो. काही तरी तातडीनकरायला हव होत. थोडी कुरकुर सोडली तर मधला काळ शांत गेला आणि विषय मागे पडला.
पुढे गणपती आलेत. राजेश १० दिवस सुट्टी घेऊन गावी गेला. दो हेल्पर्स पैकी निलेशन पुढाकार घेऊन स्प्रे पेंटिंगची अर्जंट काम चांगली सांभाळलीत – राजेशची गैरहजरी जाणवू दिली नाही. निलेश तसा बारावी पास होता पण गुण कमी असल्याने कुठे काम मिळत नव्हते म्हणून नाईलाजाने हेल्पर म्हणून लागला होता.राजेशही सुटीवरून परत आला. त्याच्या कानावर निलेशच कौतुक पडलं.वयान लहान आणि शिक्षणान पुढे असलेल्या निलेशमुळे त्याचं महत्त्व कमी होत होत. राजेशची चिडचिड आणिकच वाढली. मानसिक संतुलन बिघडू लागलं होत. गडहीरेंना त्याच्याशी संवाद साधण्यात यश मिळत नव्हतं.
दसरा आला. कंपनीत पुजेची तयारी चालू होती. मी आपल्या केबिन मध्ये महत्त्वाच्या टेंडर
वर काम
करात बसलो होतो. एवढ्यात गडहिरे घाई घाईन आलेत . ” सर, लवकर खाली चला. राजेशन निलेशला डोक्यात मारलं.” आम्ही धावतच शॉपफ्लोरला गेलो. कामगार क्षुब्ध होते. राजेशचा आरडा ओरडा चालू होता ” भेंxx, काल आलेली पोरं काय समजतात सोताला ..” कामगार क्षुब्ध होते – ” सर, याला पोलिसात द्या, हा खून पाडेल एखाद्या दिवशी कुणाचा. ” मी परिस्थिती वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. ” अरे,शांत व्हा.पहिले निलेशला डाक्टर कडे न्या. रक्त फार येतंय टाके घालायला लागतील- आणि गडहिरे तुम्ही राजेशला घेऊन वर जा मी आलोच “. संतापलेल्या कामगारांपासून राजेशला दूर नेणे आवश्यक होते.
दोन बुजुर्ग कामगारांना निलेश बरोबर डाक्टर कडे पाठवून मी केबिनमध्ये आलो.एव्हाना राजेश शांत झाला होता. ” सर, हे फार झालं, पोलिसात तक्रार करायलाच पाहिजे.” न राहवून गडहिरे म्हणाले. ‘ थांबा, मला आधी राजेशशी बोलू द्यात. काय रे पोलिसात जायचं का ? माझी ओळख आहे. लगेच आत घेतील.” ‘ नको सर, मी मारायला नको होत…. पण ही पोर ऐकत नाही. मला उलट बोलतात ” अजून ठुस ठुस शांत झाली नव्हती.” हे बघ, राजेश, निलेश ट्रेनी आहे. त्याला आपण पेंटिंग शिकवतो आहे कारण तू सुट्टीवर गेल्यावर काम थांबवून चालणार नाही, कुणी तरी पर्याय असायलाच हवा. ? तुझ्या कामाच्या गुणवत्तेत खोट नसेल तर दुसऱ्या कुणालाही तुझ पेंटिंगच देण्याचा प्रश्नाचं येत नाही.”
” असो, तुला राग आल्यानंतर आरडा ओरडा केला,शिव्या दिल्या किंवा मारलं की नेमका काय सध्या होत ? उलटी अजूनतेढ वाढत जाते. अरे, आपल्या जिभेवर सरस्वती वसते. त्याच जीभेनी आई बहिणीच्या शिव्या देणं बरोबर आहे का ?” “सर, काय करू, समजते पण कंट्रोल होत नाही”. न राहवून राजेश उत्तरला. ” बर, ते जाऊ दे. तुला पोलीस कम्प्लेंट नको असेल तर एक सोपी अट आहे. आज पासून कुणालाही शिवी द्यायची नाही, कंपनीत, घरी आणि बाहेर. दर महिन्याच्या शेवटी मला डोळ्यात बघून सांगायचे – “मी एकदाही शिवी दिली नाही” आणि १०० रुपये रोख बक्षिस घेऊन जायचे, समजा शिव्या देणं थांबवता आलं नाही, तरीही मला येऊन सांगायच.आणि कितीही शिव्या दिल्यात तरी शिक्षा म्हणून दंड द्यायचा – फक्त एक रुपया. कुणाचीही साक्ष- पुरावे नकोत.” शिक्षा ऐकून गडहिरे चक्रावालेत “सर, हे काहीतरीच. अशान हे डोक्यावर बसतील. याला सोडू नका.” ” यु डोन्ट वरी. मी जबाबदारी घेतो.” मी उत्तरलो.
महिना संपला. पगाराच्या दिवशी राजेश केबिनमध्ये आला.” सर, मी एकही शिवी दिली नाही- तरीही मला बक्षिसचे १०० रुपये नकोत. तुम्ही माझे डोळे उघडलेत . मी तुमच्या नजरेला नजर देऊ शकतो. थंक्यू. घरचे लोक पण माझ्यातला बदल बघून खुश आहेत.हेच माझं बक्षिस. थॅंक्यू.”
— पुरुषोत्तम आगवण
Leave a Reply