ऑपरेशन एक्स ओव्हर
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अमीर अजमल कसाब याला आज फासावर लटकण्यात आले. पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ठीक ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबचा “हिशेब” करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषीत केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबर रोजी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने कसाबच्या फाशीची तयारी सुरू केली. त्यानंतर कसाबला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून पुण्याच्या येरवडा तुरुंगात मंगळवारी मध्यरात्री गुपचूपपणे नेण्यात आले. तिथेच सकाळी कसाबला फाशी देण्यात आली. कसाबच्या फाशीला “ऑपरेशन एक्स” असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. सुरक्षेसाठी ही गुप्तता पाळण्यात आली होती. सकाळी फाशी झाल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी कसाबला मृत घोषित केले. त्यानंतर ठीक ७ वाजून ४६ मिनिटांनी गृहमंत्र्यांना फोन करून “ऑपरेशन एक्स ओव्हर” असे कळविण्यात आले. त्यानंतर काही वेळाने ही बातमी जाहीर करण्यात आली.
काय होता कसाबचा गुन्हा ?
कसाब आणि त्याच्या नऊ साथीदारांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. कसाब आणि त्याच्या नऊ साथीदारांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. या कारवाईत ओंबळे शहीद झाले . अटकेनंतर कसाबची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये झाली होती. कोर्टात केस सुरू असताना कसाबला कडेकोट बंदोबस्तात आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. कसाबचा गुन्हा कोर्टात सिध्द केला. कोर्टाने कसाबला दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली . या शिक्षेवर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर कसाबने फाशीचे रुपांतर जन्मठेपेत व्हावे म्हणून सुप्रीम कोर्टात अर्ज केला. मात्र सुप्रीम कोर्टाने शिक्षा कायम ठेवली . निरपराधांवर गोळीबार करणार्या कसाबने फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. हा अर्जही फेटाळण्यात आला होता. ‘२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस व निष्पाप नागरिकांना ही खर्या अर्थाने श्रद्धांजली आहे’ अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली. कसाबला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. मात्र, आपली शेवटची कोणतीही इच्छा नाही असे कसाब म्हणाला. कसाबचे मृतदेह पाकिस्तानला दिला नाही. कसाबला २१ नोव्हेंबर रोजी फाशी देण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजीच घेण्यात आला. अजमल कसाब याला येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्येच दफन करण्यात आले.
ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो
छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताज पॅलेस, ओबेरॉय ट्रायडण्ट, कॅफे लिओपोल्ड, कामा हॉस्पिटल, छाबड हाऊस या भागांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते. हल्ल्याचे स्वरुप इतके भीषण होते की एनएसजीच्या कमांडोंना ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो ही मोहीम हाती घ्यावी लागली. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर रात्री सव्वा नऊच्या सुमारास दोन दहशतवादी घुसले. कसाबही त्यात होता. एके ४७ रायफलने त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पावणे अकरा पर्यंत दहशतवाद्यांचे हत्यासत्र सुरु होते. या गोळीबारात ५८ जण ठार झाले तर १०४ जखमी झाले. हे दहशतवादी सीएसटी स्थानकावरुन कामा हॉस्पिटलच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसचे तत्कालिन प्रमुख हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे हे अधिकारी त्या दिशेने धावले. कामा हॉस्पिटलच्या परीसरात कसाब आणि खान या दोघांशी झालेल्या चकमकीत हे तिघेही अधिकारी शहीद झाले. खानचा खात्मा झाला. आधी पोलिसांच्या जीपने आणि नंतर एका कारने पळ काढण्याचा प्रयत्न करणार्या कसाबला सह सब इन्सपेक्टर तुकाराम ओळंबे यांनी जिवंत धरले. या प्रयत्नात जखमी झालेल्या ओळंबे यांना वीरमरण आले.
कुलाबा येथील लिओपोल्ड कॅफे येथे झालेल्या हल्ल्यात काही परदेशी नागरीकांसह दहा जण ठार झाले. ताज पॅलेस येथे झालेला हल्ला सर्वात भीषण होता. ताजमध्ये सहा बॉम्बस्फोट झाले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हॉटेलमधून २०० जणांची सुटका केली. ताज आणि ओबेरॉय ट्रायडण्टला एनएसजी कमांडो, आणि सैन्याने वेढा घातला होता. एनएसजीचा तरुण कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन या हल्ल्यात शहीद झाला. छाबड हाऊसमध्ये झालेल्या चकमकीत एनएसजी कमांडो हवालदार गजेंद्रसिह शहीद झाले. ९ दहशतवादी ठार झाले. आयएसआयच्या देखरेखीखाली लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला. तय्यबाचा सदस्य असलेल्या डेव्हीड हेडली याने मुंबईतल्या टार्गेट्सची रेकी केली. आयएसआयचा मेजर इक्बालने हेडलीला या कामासाठी रसद पुरवली होती.
कसाबचा लटकलेला मृतदेह पाहण्यासाठी जनता उतावीळ होती. असे असतानाही कसाबच्या फाशीला चार वर्षे लागावीत हे दुर्दैव आहे. खरे म्हणजे एवढे धडधडीत पुरावे असताना कसाबचा खटला दोन-चार महिन्यांत संपवून त्याला आतापर्यंत फासावर लटकवायला हवे होते. पाकिस्ताने आतापर्यंत दोन-तीन पुण्यतिथ्या साजर्या करायला हव्या होत्या. तरी पण आपले कर्तव्य पार पाड्ण्या करता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अभिनंदन. असेच न्यायालयीन सोपस्कार संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याच्या खटल्यातही पार पडले आहेत . त्यालाही आधी खालच्या न्यायालयाने, मग उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेदेखील फासावर लटकवण्याचाच निर्णय दिला.? हे महाशय तिहार तुरुंगात आरामात आहेत. संसदेवर हल्ला होऊन ११ वर्षे झाली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊनही सहा वर्षे उलटली. तरीही अफजल गुरू जिवंत आहे. पण राज्यकर्ते मतांसाठी हा दोरखंड हाती घेऊन दोरीवरच्या उड्या खेळत आहेत. अतिरेक्याला पोसणे म्हणजे देशाशी आणि देशातील जनतेशी केलेली प्रतारणाच आहे. आता तरी सरकारने ‘व्होट’ बँकेचा मोह सोडून देशातील जनभावना ओळखायला हवी. देशातील जनता उतावीळ झाली आहे. कोणतीही दया-माया न दाखवता, अर्ज-फाट्याची संधी न देता अफजल गुरूला फासावर लटकवा! आज..आत्ता..आणि ताबडतोब!!
अफझल गुरूबद्दल चुकीचा निर्णय घ्याल तर घातपात घडवू
अफझल गुरूच्या फाशीबद्दल जर काही चुकीचा निर्णय घ्याल तर देशभर घातपातांची मालिका घडवली जाईल, अशी धमकी फुटीरतावादी जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याने दिली आहे. जेकेएलएफचा संस्थापक मकबूल भट्ट याला फाशी देऊन केलेली चूक सरकारने पुन्हा केल्यास देशभर घातपात घडवले जातील, असे मलिकने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कसाबला फाशी दिल्यानंतर अफझल गुरूच्या फाशीची मागणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी केली होती.
‘सरबजीतला फाशी द्या’
कसाबच्या फाशीची प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटू लागली असून माजी क्रिकेटपटू इम्रान खान याचा पक्ष तेहरीक ए इन्साफ या पक्षाने पाकिस्तानच्या कैदेत असणारा भारतीय कैदी सरबजीत सिंग याच्या फाशीची मागणी केली आहे. मुलतानमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये पक्षाचे नेते निमूल्लाह खान यांनी ही मागणी केली. भारताने कोर्टाचा अंतिम निर्णय आल्यानंतर महिन्याच्या आत त्याची अमलबजावणी केली, आम्ही मात्र गेले आठ वर्षे ‘दहशतवाद्यांचे’ रक्षण करीत आहोत, असे खान म्हणाले.
अतिरेक्यांना फाशी द्यायलाच हवी होती
कसाबच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब करताच काहीजणांनी या फाशीला विरोध केला आहे. कसाबला फाशी देऊन ‘शहीद’ करू नका, या फाशीने दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढेल; असे मत विरोधक व्यक्त करत होते.
कसाबला फाशी दिली काय किंवा नाही दिली काय?, भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा धोका कमी होणार नाही. उलट कसाबला तुरुंगात ठेवले तर भविष्यात त्याच्या सुटकेसाठी अपहरणाचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय आपल्या सरकारने कसाबला तुरुंगात ठेवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला . कसाब शिंकला तरी बातमी होईल अशी आज परिस्थिती झाली होती. कसाबच्या सुनावणीला सतत प्रसिध्दी देणार्या माध्यमांना चाप लावण्यासाठी कायदेशीर चौकटीत प्रयत्न का केले नाहीत?
दहशतवादी कृत्याला मिळणारी अतिप्रसिध्दी ही दहशतवादाला खतपाणी घालते. पण आपल्या सरकारने तसेच प्रसारमाध्यमांनी २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्रीपासून आजवर ही चूक अनेकदा केली आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा वेग अद्याप खूप कमी आहे. भविष्यात २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संरक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करणे हे जास्त हिताचे आणि आवश्यक आहे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply