मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी M.B.B.S. पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग,
निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे. सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया ह्या विषया बद्दल एक वेगळेच कुतूहल होते. डॉ. विक्रम मारवा हे सर्जरी ह्या विषयाचे प्राध्यापक होते. एक विषय तज्ञ व उत्कृष्ट शिक्षक देखील. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. प्रश्न-उत्तरे यांची देवाण-घेवाण करीत ते शिकवायचे. समजण्यास सोपे, चांगले व पद्धतशीर. परंतु सामान्य विद्यार्थ्याला तसे नापसंत असे. विषयाची एकाग्रता, लक्ष लाऊन ऐकणे, तत्पर असणे, विषयाची समज झालेली असावी, थोडेसे प्राथमिक वाचन. ह्या अपेक्षा विद्यार्थ्यावर एक प्रकारचा मानसिक दबाव निर्माण करीत होत्या. लक्ष नसणे, अवांतर विचार, वहीपेन्सीलीचा चाळा, नसत्या गोष्टींचा विचार मनांत चालणे, नजर चुकवुन इतर वाचन, आणि केंव्हा केंव्हा तर चक्क डूलकी घेणे, ह्या प्रकाराला आपोआप आळा बसत असे. केंव्हा प्राध्यापक कुणाला उप प्रश्न विचारतील, व तो मुलगा कसा तोंडघाशी पडेल हे सांगता येत नसे.
सर्व मुले त्यामुळे नेहमी सतर्क (अलर्ट ) असत.
वर्गातल्या मुलांचे लहान लहान ग्रुप्स केले होते. आमचा ग्रुप १० विद्यार्थ्याचा. सर्जरी विषय, प्राध्यापक विक्रम मारवा यांच्याकडे. आज ऑपरेशन थियेटरचा १ लाच दिवस. थियेटरचा एक अँटेन्डन्ट होता. आम्ही सारे त्या वातावरणांत नवखे. व तो अशिक्षित असून १५-२० वर्षाचा अनुभवी. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हलचाली, बोलण्याची तऱ्हा, सुचना करण्याची ठेवण, ही एखाद्या लेक्चररप्रमाणे भासत होती. आम्ही त्याक्षणी आमच्या विषय अज्ञानाला झाकून त्याच्या अरेरावी पद्धतीला थोडेसे वचकून होतो. थियेटरच्या बाहेरील वऱ्हान्ड्यात आम्ही जमा होताच तो आला व सूचना केली. सर्वानी आपली पादत्राणे काढून, थियेटरची घालावित. आतल्या खोलीतील थियेटरचे कपडे घालावे. डोके,तोंड झाकण्याचे मास्क बांधावे. ऑपरेशन थियेटर मधल्या कपाटातील वा ट्रालीवरील कोणत्याही वस्तूना स्पर्श करु नये. ह्या सुचना अती प्रभावी व खोचक पद्धतीने तो बोलून गेला. ऑपरेशन टेबल पासून एक फूट दुरीवर उभेराहून सर्व निरीक्षण करा हे सुचविले. आम्ही न बोलता, एकमेकाकडे बघीतले. सर्व त्याच्या सुचनेप्रमाणे केले. अर्थात त्या सुचना प्राध्यापकांच्या वा थियेटर इन्चार्जच्या असतील हे मान्य करीत त्याच्या वक्तीमत्वाकडे दुर्लक्ष केले. एक अतीशय गंभीर भयावह, मनाचा थरकाप उडवणारे ऑपरेशन थियेटरचे वातावरण होते. सर्वांचे पेहेराव, हेच प्रथम दर्शनी भयानक वाटत होते. सर्वांचे झाकलेले शरीर, फक्त लुकलुकणारे डोळे चमकत होते. बोलण्याचे आवाज येत नव्हते. हातवारे करुन सुचना दिल्या जात होत्या. निरनीराळ्या मशीन्स ठेवलेल्या. कांही चालू. वेगवेगळे आवाज येत. गँस सिलेंडरची ने आण दिसत होती. लाईटचे फोकस गरजेप्रमाणे टाकले जात होते. टेबलावर पेशंटला कव्हरकरून झोपवले होते.
ज्या भागावर शस्त्रक्रिया होणार होती, तेवढाच भाग दृष्य होता. आम्ही कुणाचेच भळभळा वाहणारे रक्त आजपर्यंत बघीतले नव्हते. तेथे आज चिरफाड बघणार होतो. अर्थात औषधांच्या माध्यमातून हे सर्व कांही शारिरीक यातना, क्लेश, त्रासारहीत होणार होते. रोग्यासाठी हे जाणीवेविणा घडणार होते. ही त्यातील समाधानाची बाब होती. ऑपरेशन थियेटर तर आम्हाला त्या क्षणी ‘ यमपूरी ‘ च असावी असे वाटत होते. जन्म मृत्युचा एक प्रकारे झगडा, द्वंद्व आम्ही बघणार होतो. समजणार होतो. आणि मृत्युच्या विळख्याची पकड त्या क्षणी तरी कशी ढिली केली जाते, हे महान शास्त्रीय ज्ञान घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. महान ज्ञान, परंतु तेथील मार्ग अर्थात ऑपरेशन थियेटरचे वातावरण मात्र आमच्या नवख्या मनाचा थरकांप उडवणारे, भयावह व अत्यंत गंभीर असल्याचे क्षणोश्रणी वाटत होते. सहकारी डॉक्टर, परिचारीका सर्व आल्या. ते आपआपल्या जागी ऑपरेशन टेबला भोवती स्थानापन्न झाले. आमची उत्सुकता, व एक प्रकारची मनाची धीर गंभीर पकड हे शिगेला पोंहचली होती. अनुभवाच्या एका वेगळ्याच दालनात आम्ही आज प्रवेश करणार होतो.
प्रमुख सर्जन प्राध्यापक आले,
“अरे भाई यहां इतना सन्नाटा क्यु ?. Why so Silence here. ? Enjoy Surgery. I want study the Subject Sincerely in a Joyful mood”.
मी मागे उभा होतो. माझ्याकडे बघत ते म्हणाले ” Yes Doctor ” ( प्राध्यापकांची ही पद्धत होती की ते विद्यार्थ्यालाही डॉक्टर संबोधीत बोलायचे) मी लगेच पुढे होत त्याना अभिवादन केले. ” Will you do one thing for us. ” मी चमकलो. ते Us अर्थात सर्वासाठी म्हणाले. मी त्यांच्या सुचनेची वाट बघत सकारात्मक हलचाली केल्या. “देखो आज न्युझीलंडके साथ आपना फायनल क्रिकेट मँच चल रहा है ना. I have forgotten my Transistor at home. Will you please get the same available here right now.” एकदम सर्वांमध्ये हस्याची लाट दिसून आली. सर्वांचे चेहरे फुलले. जणू प्राध्यापकानी आमची मने व आवड यांची एकदम पकड घेतली. आमच्यापैकी एकाच्या बँगमध्येंच त्यानी ट्रानझेस्टर आणलेला होता, तो बाहेर बँगेत होता. त्याने चटकन जाऊन तो आणला.
निर्माण होऊ बघत असलेल्या अशा गंभीर व भयावह वातावरणाला इतका नाट्यमय परंतु बहारदार ट्विस्ट मिळेल हे कुणालाही स्वपनांत देखील वाटले नसेल. तीन तासाचे मोठे ऑपरेशन ( Major Abdominal Surgery ) त्या दिवशी आम्ही सर्व विध्यार्थी बँचने अनुभवला.
विषयाच्या गंभीरतेबरोबर खेळातील कॉमेंटरी ऐकत, त्यावरच्या टिका टीपणी करीत, त्यामध्ये मोकळेपणाने
सहभाग घेत आनंद लूटला. वातावरण हे केंव्हाच गंभीर अथवा हलकेफुलके नसते. आम्ही ते आपल्या विचारांच्या ठेवणीमधून निर्माण करीत असतो. सर्जरी सारखा रुक्ष, तणाव निर्माण करणारा विषय, केवळ प्राध्यापकांच्या हसत खेळत फुलविण्याच्या कलेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करु शकला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply