20 ऑगस्ट 1900 हा ऑलिम्पिक सामन्यांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि अखेरच्या क्रिकेट सामन्याचा दुसरा आणि अखेरचा दिवस होता. पॅरिसमध्ये झालेल्या फ्रान्स विरुद्ध ग्रेट ब्रिटन अशा या सामन्यात ग्रेट ब्रिटनने 158 धावांनी विजय मिळवला. या दोन्ही राष्ट्रांचे प्रतिनिधित्व या सामन्यात एकेका क्लबाने केले होते. संपूर्ण देशातून एखाद्या मंडळाने निवडलेले हे संघ नव्हते. संक्षिप्त धावफलक : ग्रेट ब्रिटन 117 आणि 145; फ्रान्स 78 आणि 26. यानंतर ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कधीही क्रिकेट सामना झालेला नाही.
इतिहास घडविणारा एक कसोटी सामना 21 ऑगस्ट 2006 रोजी विधीवत् संपणे अपेक्षित होते. या सामन्याच्या ‘अंतिम’ निकालाने अनेक वाद-प्रतिवाद उभे केले. 20 ऑगस्ट 2006 हा ओवलवरील इंग्लंड-पाकिस्तान मालिकेतील अंतिम सामन्याचा चौथा दिवस होता. खेळाच्या दुसर्या सत्रात (उपाहार ते चहापान) पंच डॅरेल हेअर यांनी चेंडूचा आकार बदलविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याबद्दल (टॅम्परिंग) पाकिस्तानला पाच धावांचा दंड केला आणि चेंडू बदलला. चहापानादरम्यान पाकिस्तान व्यवस्थापनाने यावर खल केला आणि शेवटच्या सत्रात मैदानावर संघ न उतरविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी नंतर बदलला पण तोवर पंचांनी इंग्लंडला कसोटी बहाल करून टाकली होती. रात्री उशिरापर्यंत झालेल्या खलबतांनंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आंक्रिप) अधिकार्यांनी सामन्याचा निकाल बदलण्यास नकार दिला. नंतर ‘आंक्रिप’समोर झालेल्या सुनावणीत पाकिस्तानी संघाला टॅम्परिंगच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आणि कर्णधार इंझमाम-उल-हकवर खेळाची बदनामी केली म्हणून 4 एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली. आणखी दोन वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विनंतीवरून आंक्रिपने सामन्याचा निकाल बहालीवरून ‘अनिर्णित’ असा बदलला. थांबा. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सूचनेवरून (हा क्लब अत्यंत जुना आणि प्रतिष्ठित असून क्रिकेटच्या नियमांवर आजही त्याचेच राज्य आहे) पुढच्याच वर्षात आंक्रिपने सामन्याचा मूळ
निकाल पुनःस्थापित केला.
2008च्या हंगामात डॅरेल हेअर पंच म्हणून पुन्हा काम
करू लागले. 2010च्या हंगामातील इंग्लंड-पाकिस्तान मालिकेतील तिसरा सामना ओवलवर 18 ऑगस्टपासून सुरू झालेला आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply