मी शाळेत असताना मला माझ्या समवयस्क मित्रांसोबत पैंजा लावून त्या जिंकण्याची वाईट सवय होती. एकदा चक्क मी माझ्या एका मित्रासोबत नववीला असताना एका मुलीला पटविण्याची पैंज लावली. ती मुलगी कोणी साधी-सुधी मुलगी नव्ह्ती. अष्टपैलू मुलगी होती. शाळेतील सर्वच गोष्टीत तिचा नंबर पहिला होता. अशा एक नंबर असणार्या मुलीला पटविण्यासाठी आपल्यालाही काहीतरी वेगळं करावं लागणार असा विचार माझ्या मनात आला. तिला पटवताना मला माझी प्रतिष्ठा ही सांभाळावी लागणार होती. त्यामुळे सर्वसामान्य टपोरी मुलासारखं मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त ही करू शकत नव्ह्तो. माझ्यात हिंमत नव्ह्ती असं नाही. हिंमत नको तिथे दाखविण्याचे आमच्यावर संस्कारच झालेले नव्हते, जे मला पुढे भोवले. तिचा जरा जास्तच विचार करायला लागल्यावर पैंज बाजूला पडली आणि मी खरोखरच तिच्या प्रेमात पडलो. मग काय ? मी माझं प्रेम तिच्याजवळ व्यक्त करण्यासाठी एक प्रेमपत्र लिहायला घेतल. नुसत प्रेमपत्र लिहून काही होणार नव्हत म्ह्णून माझ्या मनात विचार आला या पत्रात तिच्यावर लिहलेली एक कविताही असायला हवी. मग काय मी वयाच्या चौदाव्या वर्षी पहिली प्रेम कविता लिहली. ती खरोखरचं कविता होती की नाही हे मला अजूनही कळलेले नाही. पण स्वप्नातही कविता लिहण्याचा विचार न केलेला मी कविता लिहू लागलो. तिच्या आणि माझ्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता ती राजा भोज आणि मी गंगू तेली होतो. तिच्यावर प्रेम करणार्यांची नामावली ही बरीच मोठी होती ज्यात त्यावेळ्च्या अत्यंत हुशार मुलांच्या नावाचा समावेश होता. शाळेत ती भाषण करायला लागली की टाळ्यांचा पाऊस पडायचा त्या पावसात आमच्याही टाळ्यांचा समावेश असायचा. तेंव्हा माझ्या मनात विचार आला आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्त करणं म्ह्णजे स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा मारून घेण्यासारखे आहे. मग मी विचार करू लागलो, आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल ? मग मी स्वतःला वाचनाची गोडी लावून घेतली. ती गोडी भयंकर वाढली. मग मला काही दिवसांनी लिहण्याची हुक्की आली आणि मी स्वयंघोषित लेखक झालो. या सगळ्यात तिचं प्रेम आणि काही वर्षे ही मागे पडली. तिच्यावर लिहलेल्या कविता दिवाळी अंकात आणि वर्तमानपत्रात माझ्या छायाचित्रासह प्रकाशित झाल्या. त्यानंतर मी इतका मोठा झालो की मला माझ्यासमोर आता ती छोटी वाटायला लागली. मला वाटत होत की आता ती स्वतःच माझ्या प्रेमात पडेल पण तस काही झालं नाही. मी प्रेमात अपयशी ठरलो म्ह्णूनच बर्यापैकी कवी, लेखक, पत्रकार आणि संपादक होऊ शकलो नाही तर तिला मिळणार्या टाळया माझ्या वाट्याला कधीच आल्या नसत्या.
लेखक – निलेश बामणे.
Leave a Reply